आचार्य व्यासाचार्य संदीकर
हैदराबाद मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक. जन्म १९२६ मृत्यू १९९६. औसा तालुक्यातील किल्लारी बोरफळ, कुरंगळा आधी गावांमध्ये जाऊन संघटन व प्रबोधन.
जन्म व बालपण
व्यासाचार्य बाळाचार्य संदीकर यांचा जन्म औसा येथे मार्च १९२६ मध्ये झाला. युवा अवस्थेत ते मुक्ती लढ्यात ओढले गेले. महाराष्ट्र परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. बॉम्ब तयार करणे, बंदूक चालवणे यांचे रीतसर प्रशिक्षण त्यांनी घेतले होते.
हैदराबाद मुक्ती संग्रामातील सहभाग
मुक्ती लढ्याच्या शेवटच्या टप्प्यात चळवळ प्रभावीपणे राबवण्यासाठी सोलापूर व बार्शी येथे कार्यालय सुरू करण्यात आली. बाबासाहेब परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील माणिक ऑइलमध्ये बॉम्ब तयार करण्याचे केंद्र सुरू करण्यात आले. त्याची जबाबदारी श्री व्यासाचार्य संदीकर आणि सहकार्यांवर देण्यात आली. या ठिकाणी प्रत्येक दिवशी दीडशे ते दोनशे हात बॉम्ब तयार करण्यात येत असत व हातबॉम्ब रजाकरांच्या विरोधातील चळवळीसाठी पुरवण्यात येत असत.
चिंचोली कॅम्प
येडशीच्या डोंगरात जुलै १९४७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चिंचोली कॅम्पमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभरावर युवकांना मुक्ती लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत होते, या ठिकाणी व्यासाचार्य संदीकर यांनी युवकांना बॉम्ब तयार करणे व तो फेकणे यासंदर्भातील प्रशिक्षण दिले.
या कॅम्प वरील प्रशिक्षकांनी मुक्ती संग्रामाच्या अखेरच्या टप्प्यात अंजनगाव, धामणगाव, जामखेड या भागातून येणारी निजामी फौज रोखण्यासाठी रस्त्यावर मायनिंग करून तारपेलो बॉम्ब पुरून ठेवून चारशे फुटावरून स्फोट घडवून रस्ता उडवून टाकला. रस्ता उध्वस्त झाल्याने निजामी फौज पुढे जाऊ शकली नाही. १९४७ मध्ये लातूरच्या टाऊन हॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. हा बॉम्ब व्यासाचार्य संदीकर यांनी तयार केला होता.
खादी चळवळीसाठी कार्य
भारत स्वतंत्र झाल्यानंतर व्यासाचार्य संदीकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने स्वतःला खाली चळवळीत वाहून घेतले. औसा या ठिकाणी कागद कारखाना व खादी उत्पादन केंद्र सुरू केले, यामुळे शेकडो हातांना रोजगाराची संधी मिळाली.
हैदराबाद मुक्ती संग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते: चरित्र व कार्य भाग एक, प्रकाशक - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था औरंगाबाद, यातील जयंत संदीकर यांनी लिहिलेला लेख.