Jump to content

आगरी बोलीभाषा

Agrees, or Salt Cultivators of Salsette


आगरी ही आगरातले आगरी, गवळी, कुणबी शेतकऱ्यांची, खारवी, भोई यांची बोलीभाषा आहे.

आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. जसे आगर पिकविणारा तो आगरी. मुळात आगर म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई आणि रायगड, रत्‍नागिरी ह्या जिल्हयांचा प्रदेश आहे. जसे दक्षिण कोकणाला 'तळ कोकण' म्हणतात तसेच उत्तर कोकणाला आगर (अपरांत) म्हणतात. या आगरातील मूळ भूमिपुत्र म्हणजेच आगरी, गवळी, कुणबी, कराडी, वाडवळ, कुपारी, कुंभार ह्या शेतकरी व कोळी, खारवी, भोई, भंडारी ह्या दर्यावर्दी जातींचा समूह म्हणजे आगरी समाज.

आगरी समाज आणि भाषा

आगरी समाजाची वस्ती मुंबई शहर , मुंबई उपनगर , रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे, रत्‍नागिरी, नाशिक ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.उर्वरित कोकणात ह्यांची वस्ती तुरळक आहे.

आगरी ही एक जात समजली जाते. या जातीतील माणसे आगरी बोली बोलतातच, शिवाय आगरातील


या समाजांत आगरी बोली बोलतात.

तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या ह्या संमिश्र बोलीस आगरातील बोली - ‘आगरी बोली' म्हणजे संयुक्तिक वाटते.

ही आगरी बोली खाडी-समुद्राकाठची असल्याने हीत उच्चार-स्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे. तर अलिबागकडे त्यामानाने स्पष्ट आहे. आगरी बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते.

मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे, तर नवी मुंबईतील ही बोली कोळी बोली मिश्रित अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते. इगतपुरी तालुक्यातील २८ गावांत तसेच रायगड जिल्ह्यातील म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील १८ गावांमध्ये आगरी लोकांची वस्ती आहे.

आगरी बोली ही घाटावरील कुणब्यांच्या भाषेहून बरीच भिन्न आहे. दोन आगरी पुरुष एकमेकांशीं झपाटयानें बोलत असतां अपरिचित पांढरपेशास त्यांच्या बोलण्याचा उलगडा चटकन होत नाही. आगरी बायका बोलूं लागल्या तर त्यांचे बोलणें समजू घेण्याच्या कामांत त्या पांढरपेशाची त्रेधाच उडते. त्यांच्या भाषेंत विशेष पुढीलप्रमाणें आहेत.

व्याकरण

१. वर्णः - ( १ ) 'ग' च्या ठिकाणीं मूर्धन्य 'ज' चा प्रयोग करितात.(हा कुठला ज? दॆवनागरीत दोनच ज आहेत, तालव्य ज आणि दंततालव्य ज़. हा मूर्धन्य ज कुठून आणला?) उ. जेला-गेला. 'जेला हें रूप 'गेला' ह्या रूपापेक्षां मूळ धातू जो 'जा' त्याशीं अधिक मिळतें आहे. ह्याप्रमाणेंच 'घ' च्या ऐवजीं मूर्धन्य 'झ' (पुन्हा तेच .ऋ, ट, ढ, द, ढ, ष आणि ळ ही अक्षरे मूर्धन्य आहेत. - ऋटुरषाणां मूर्धा-) योजितात. उ. 'झेतलें' = 'घेतलें'; 'झ्या' = 'घ्या'. पण 'क' 'ख' च्या ऐवजी 'च' 'छ' यांचा प्रयोग करीत नाहींत. (२) 'ड' च्या बद्दल 'र' ची योजना करितात. उ., 'उराला' उडाला आणि कधीं कधीं, 'र' च्या ऐवजीं 'ड' योजितात. उ. 'वाडा' = वारा; 'आगरी'. 'लय' मोठा वाडा आला नी वारा उरून जेला' = ' फार मोठा वारा आला आणि वाडा ( गुरांचा गोठा रानांत बांधितात तो) उडून गेला. ' (३) कधीं कधीं 'र’ च्या ठिकाणीं 'ल' ऐकूं येतो. 'उ०' मुलगा लरतो'- ' मुलगा रडतो'! [१]


२ नामें:- ( २ ) गोंड=भोसकूं, कुंपणांत पाडलेली वाट. उ० टोणग्यांनीं वंईत तीन गोंड पाडले=कुंपणांत तीन भोसकीं पाडून वाटा केल्या. ( २ ) 'हेतू' = आठवण, स्मरण. उ०, 'त्या कामाची मला हेतू राहिली नाहीं, असा हेतू शब्दाचा स्त्रीलिंगी प्रयोग आठवण ह्या अर्थी योजितात. ( ३ ) 'अदावत’ – अडचण उ. 'हें शेत घेतां, पण त्यांत लय अदावत आहे' म्ह. अडचण आहे. गांडीवाटेंत दगड, ओहोळ, झाडें, किती तरी अदावत!

आ ग री लो कां चीं कां हीं आ ड नां वें. = (१) नाईक, भोईर, थळे, डांगरे, मुठे, मेहेर, शेणे, कराळे, डाइरे, जोगले,तोकडे,वेखंडे,म्हात्रे,कामणकर, गोडे, ठाणगे,कु‍‍थे,घरत,ठोंबरे,पाटिल डाके,डाकी, कडवे,गावंड चोगले,मोकल, वाकडे,भगत,शिंगोळे इ. (२) यांखेरीज इतर जातींची आडनांवें त्यांच्यांत आढळतात तीं:-पोवार, जाधव,जोशी,ठाकुर, मोहिते, महाडिक, घोरपड, इ. धंद्यावरून व गांवावरून आडनांवें आहेत तीं:-भोपी, माळी, भगवत, इरमाळी, म्हसकर, कोंडिलकर, खारकर, वावेकर, मुंबईकर इ.

आ ग री लो कां ती ल कां हीं नां वें. - पुरुषांचीः- हशा, उंद्र्या. हेंद्य्रा, झावऱ्या, बेंडया, चांग्या, बामा, गोमा, चाया, पोशा, धाया, दुंद्या,बेंमट्या,कान्हा,धोंडू, नागु,आलू हसू,धोदर्या,चिंदू,कचर इ . बायकांचीं:- बाळकी, मुढी, नामी, धाकली काळी, पोशी इ. (वि. विस्तार पु. ४३. अं.९)


३. सर्वंनामें:-( १ ) देशीं 'म्यां' ह्या तृतीयेच्या रूपाऐवजी 'मी' सर्वनामास तृतीयेचा 'नीं' प्रत्यय जोडून 'मिनीं' असें रूप साधितात. उ० 'मिनीं काय केलें?' सदरहूप्रमाणें 'तूं' याचें रूप 'तुनीं' असें योजितात. (२ ) 'मी' सर्वनामाची चतुर्थी 'मना' अशी योजितात. उ०, 'मना माहीत नाही' 'मना काय ठाऊक?' आपली लहान मुलेंहि ' मना खाऊ दे' असेंच म्हणतात. हें 'न' आणि 'ल' याच्या अभेदाचें उदाहरण आहे. लिंब, निंब; लहाना = लाना = नाना (गुजराती); 'लवणें = नवणें (हिंदी); ‘नमन’ (संस्कृत). (३) ‘काय’ ह्या सर्वनामास, द्वितीया, व चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय 'ला' तृतीयेचा प्रत्यय 'शीं' व षष्ठीचा प्रत्यय 'चा' लावून त्या त्या विभक्तींची रपें उपयोजितात. मात्र काय यांतील 'का' अक्षरास ऱ्हस्वत्व देतात. उ०, 'कयाला’ = कशाला, 'कयाशीं' = कशाशीं ' कयाचा' 'कयाचीं' 'कयाचें = कशाचा, कयाची, कशाचें, इ. प्रचलित मूळरूपांतहि, 'का' सऱ्हस्वत्व देऊन 'क' ह्या ऱ्हस्व अक्षराची योजना झाली अहे. 'ऐशी विद्या कशाला' 'ऐशी बाईल काशाला' 'कासया धरियला हय तो तुवां? वगैरे पद्यें सर्वश्रुत आहेत. तेथें 'काय' यांतील 'का' दीर्घच राहिला आहे. पण प्रचलित भाषेंत त्यास ऱ्हस्वत्व देऊन 'काशाला' इ. रूपें योजितात. त्याप्रमाणें 'कायाला' 'कायाशीं' 'कायाचा' अशीं रूपें न करितां कयाला, कयाशीं, कयाचा, अशीं रूपें आगरी उपयोजितात. मराठींत दोन दीर्घ अक्षरें एकत्र आलीं असतां एकास विशेषतः पहिल्यास ऱ्हस्वत्व देण्याचा स्वाभाविक जो प्रचार आहे त्यास अनुसरूनच 'का' स येथें ऱ्हस्वत्व आलें आहे. ( ४ ) 'कर्ता' (किती) हें संख्यानामवाचक प्रश्नार्थक सर्वनाम वापरतात, तें मराठींतील 'किती'पेक्षां संस्कृत 'कति' शीं अधिक मिळतें आहे. उ०, 'किती दिवस लागतील, ' 'किती दिवस लागतील? किती चुना मळला? = किती चुना मळला, (५) 'बिसरा = दुसरा. उ. 'बिसरा उपाय काय?' –दुसरा उपाय काय? 'बिसरा' पासूनच बिसरून = दुसरून = दुसऱ्यानें, पुन्हां असें अव्यय सिद्ध झालें आहे. येथें 'दु. ' च्या ठिकाणीं 'बु' व्हावयाचा. पण 'बु' पालटून 'बि च होतें.

४. क्रियापदें:- ( १ ) 'सांग' धातूच्या भूतकाळाचें रूप साधतांना शिष्ट भाषेंतील मध्यंतरींचा 'त' आदेश न योजितां, धोपट मार्गाचें रूप 'सांगलें असें योजितात. उ. मिनीं सांगलें' = मी सांगितलें. मागणें यांचे 'मांगलें', (हिदी 'मंगना'). उ०, त्यानें मांगलं म्हणून मिनीं दिलं. आपली मुलेंहि प्रथम बोलूं लागलीं म्हणजे मी 'करलें असेंच धोपट मार्गाचें रूप योजितात. प्याला, प्यायला ह्या रूपांच्या ऐवजीं 'पिला असें रूप पी धातूपासून सिद्ध करितात. उ०, बैल पाणी पिला. ( २ ) कांहीं क्रियापदांचे अर्थ देशावर माहीत नाहीत. उदाहरणार्थ, (अ) हिलगणें = अडकणें, अडकून, राहाणें. उ०, 'गवताची मोळी जाळींत । हलगली (अडकली). हें क्रियापद उर्दूंत व हिंदीत प्रसिद्ध आहे, पण देशी मराठींत नाहीं. (आ) पोगळणें = सुटणें, मोकळा होणें, विस्कळित होणें उ०, 'गवताचा थारा पोगळला' - सुटला, विस्कळित झाला. ( इ ) कलणें, ( कळणें) = दिसणें. उ०, झाडावर जांबळें आहेत म्हणतां पण मला कलत नाहींत, (मला दिसत नाहींत, माझ्या नजरेस येत नाहींत). (ई) ओरडणें – हाक मारणें, बोलावणें. उ०, 'दादा तुला ओरडतात' = हाक मारतात. ( उ ) 'बोलणे' = उत्तर करणें. उ. मिनीं सांगले लौकर ये; तो बोलतो ( उत्तर करतो) काम आट पून येईन.

५. अव्ययें:- (१) 'पासून' याची योजना 'पेक्षा' याच्या ऐवजी व रितात. उ०, 'बाजारी खोबरेलापासून नारळाचें तेल लय नामीं' = बाजारी खोबरेलापेक्षां नारळाचें तेल फार चांगलें. 'काळ्यापासून लाल्या जवाद तलख = काळ्यापेक्षां लाल्या अधिक तलख. ( २ ) बिसरून = दुसरून, दुसऱ्यानें पुन्हां. वर सर्वनामांमध्ये 'बिसरा' पहा. (३) मंग = मग, नंतर उ०, 'मी भाकर खाईन, मंग गुरांमागें जाईन.

घर, तर, मर इत्यादी शब्दांतील प्रथम 'अ' स्वराप्रमाणें 'मगा ह्यांतील पहिल्या 'अ' स्वरास ओढून दीर्घत्व देऊन उच्चारण्याचा परिपाठ मराठींत आहे. येथें तें दीर्घत्व 'अ’ ला ओढून न देतां त्यावर अनुस्वार देऊन साधिलें आहे.

शब्दार्थ

१)निंगुत :- आत्ताच २)कला :- कशाला ३)त्यापाक :- ते पहा ४)मना :- मला ५)आणशी :- घेवुन ६)कख्र :-कुठे ५)आस:-आई ६)डोखरी आस:-आजी ७)उंबय :-मुंबई ८)आजु :- आजोबा ९)बासना वट :- भांडी घास १०)कवटा :-अंडी ११)यस्कार :- लहान परिपुर्ण न झालेल्या बेट वनस्पतीचे कुंपन १२)पेरकुट :-निवडुंग १३)झे:-घे १४)जेला :-गेला १५)तयाशीं :-तेथे १६)आयांशी :-येथे १७)आठवार :- लग्न न झालेला १८)नववार :-लग्न झालेला १९)सोर चिट्टी दिली :- पति पत्निच्या नात्यातुन मुक्त होणे १९)डोकरा :-वृद्ध माणूस २०)तलंग :- अंडी देणारी कोंबडी २१)तिगस्ता :- तीन वर्षा पूर्वी 22) आया :- ईकडे 23) तया :- तिकडे


आगरी बोलीची गोरी

माजे आगरी बोलीन  हाये मदावानी गोरी

आगरी बोलीची गोरी, चला चाखू थोरी थोरी ll धृ ll

गोर शबदांचं धन, वारवरिलांचं देनं

वारवरिलांचं देनं, मोप दाटलं भाषेन

आगरीन बोलाला रं नका लाजू पोरा पोरी  ll १ ll

आगरी शबूद हे मोती, कसं व्हटावर येती

कसं व्हटावर येती, जसं झांजूर वाजती

कालजाचा ठाव झेती, कसं घुसती जिवारी   ll २ ll

आपले म्होरचे पिऱ्हीला, वारसा यो चालवला

वारसा यो चालवला, सांगा आगरीन लिवाला

जापू आपले बोलीला, इथं कनाची रं चोरी   ll ३ ll

शब्दांचे मोती हार, आगरीचा शिनगार

आगरीचा शिनगार, सात समिंदरा पार

नयी पिऱ्ही जपतिया  कोनी कारु नका खोरी  ll ४ ll

आता खावाला पिवाला, कथा कविता लिवाला

कथा कविता लिवाला, गोर गानी ही गावाला

आख्खे जगान दावाला, चला बोलू रं आगरी  ll ५ ll

                                - श्याम माळी, बदलापूर

हे सुद्धा पहा

आम्चा आगरी दादूस


  जाम राबतो शेतान, राज करितो सागरी      

आम्चा आगरी दादूस  हाये लाखान यो भारी


तसा दिसतो करक,  पन आतमंदी गोर

खातो मटान मावरा   ना सनाला गोर धोर

कंदी रेतीचे धंद्यावं, कंदी करी मासंमारी

आम्चा आगरी दादूस  हाये लाखान यो भारी


नय हुन्डा कवा झेत,  देवी मानी नवरीला

नेमी पोराचे समान,  आमी मानितो पोरीला

देवावानी पूजितो रं  आमी घरांची डोकरी

आम्चा आगरी दादूस  हाये लाखान यो भारी


जेल्या जमिनी आमच्या  तया कंपन्या झयल्या

कती लोखांना अयांशी आता मिलाला खायाला

आमी पोसू उपऱ्यांना  फिरवू थाटान गारी

आम्चा आगरी दादूस  हाये लाखान यो भारी


येकीरा आमची आये   हाये भरोसा आमचा

हाये जाम अबिमान  हिंदू आगरी जातीचा  

आग्रेसर ऱ्हावू आमी , नय फिराचो मगारी

आम्चा आगरी दादूस  हाये लाखान यो भारी

  • आगरी समाज
  1. ^ http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36