आकारमान
प्रत्येक वस्तू काही जागा व्यापते. प्रत्येक वस्तूला लांबी-रुंदी-उंची (खोली) अशा तीन मिती असतात. घन, गोलाकार यासारख्या नियमित भौमितिक वस्तूंचे आकारमान गणिती सूत्र वापरून काढता येते. दगडासारख्या अनियमित आकाराच्या वस्तूचे आकारमान काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.
विस्थापन पद्धती
वस्तूचे आकारमान काढण्यासाठी बऱ्याचदा वापरली जाणारी पद्धत म्हणजे विस्थापन पद्धती. एखादी वस्तू द्रवात बुडवली असता, ती स्वतःच्या आकारमानाइतका द्रव बाजूला सारते. आर्किमिडीजच्या या सिद्धांताचा उपयोग करून ज्या वस्तूचे आकारमान काढायचे आहे, अशी वस्तू द्रवाने भरलेल्या भांड्यात पूर्ण बुडवतात. त्या वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाचे आकारमान मोजतात. मात्र द्रवापेक्षा कमी घनता असलेल्या व घेतलेल्या द्रवात विरघळणाऱ्या पदार्थांचे आकारमान या पद्धतीने काढता येत नाही. विस्थापन पद्धतीने आकारमान मोजण्यासाठी उत्सारण पात्र किंवा मोजपात्र वापरतात. द्रव म्हणून बहुधा पाण्याचा उपयोग करतात.