आंद्रेई इव्हानोव्ह
आंद्रेई इव्हानोव्ह सुप्रसिद्ध एस्टोनियन – रशियन लेखक. एक लोकप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा जन्म एस्टोनियामधील एका रशियन कुटुंबात झाला. स्वतःला रशियन साहित्यिक परंपरेचा भाग म्हणून पाहत असला तरीही तो एस्टोनियाला त्याचा मूळ देश मानतो. ट्यलन पेडगॉजिकल विद्यापीठातून (आताचे ट्यलन विद्यापीठ) तो भाषा विषयात पदवीधर झाला. पदवी प्राप्त केल्यावर त्याने व्लादिमीर नाबोकोव्ह या भाषा तज्ञाच्या भाषिक कार्यावर प्रबंध लिहिला. शिक्षक म्हणून त्याने काही काळ कार्य केले. नंतर तो स्कॅन्डिनेव्हियाला गेला आणि बरीच वर्षे डेन्मार्कमध्ये हिप्पी समाजामध्ये वास्तव्यास राहिला. या जीवनानुभवानंतर त्याने लेखनाला सुरुवात केली. दरम्यान अनेक भाषांवर प्रभुत्व मिळविले. लेखन मात्र त्याने रशियन भाषेत केले आहे. इव्हानोव्ह याची साहित्य संपदा – कादंबरी – हनुमान्स जर्नी टू लोलँड (२००९), अ हॅंडफुल ऑफ डस्ट (२०११),बिझार (२०१३), हार्बिन मॉथ्स (२०१३), कन्फेशन ऑफ अ ल्यूनाटिक (२०१५), द इनहेबिटंट्स ऑफ द क्युरियस सेमट्री ; लघु कथा – सिंडर्स, कोपेनहेगन, माय डॅनिश अंकल ; कविता – अ नाईट इन सेंट – क्लाऊड्स इत्यादी.
हनुमान्स जर्नी टू लोलँड, अ हॅंडफुल ऑफ डस्ट, बिझार, कन्फेशन ऑफ अ ल्यूनाटिक या कादंबऱ्यांमध्ये त्याने स्कॅन्डिनेव्हियामधील अनुभव ग्रंथित केले आहेत. यामधील हनुमान्स जर्नी टू लोलँड ही कादंबरी अतिशय लोकप्रिय कादंबरी आहे. ट्यलन या शहरामधील मधील एक रशियन एस्टोनियन माणूस (कथाकार) आणि दुसरा भारतीय (नायक) यांच्या डेन्मार्कमधील निर्वासितांच्या छावण्यातील दैनंदिन जीवनाचे वर्णन या कादंबरीत आले आहे. ह्या कादंबरीचे एस्टोनियन,जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी मध्ये भाषांतर केले गेले आहे.
हार्बिन मॉथ्स ही त्याची दुसरी प्रसिद्ध कादंबरी. एस्टोनियामध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वात उल्लेखनीय तसेच भावनिकदृष्ट्या भुरळ पाडणाऱ्या पुस्तकांपैकी एक असा लौकिक या कादंबरीला प्राप्त झालेला आहे. दोन महायुद्धांदरम्यान एस्टोनियात वास्तव्यास असलेल्या रशियन स्थलांतरितांना समर्पित या ऐतिहासिक कादंबरीत इव्हानोव्हने एस्टोनियातील स्थानिक रशियन बुद्धिजीवी लोक आणि रशियन फॅसिस्ट पक्षाच्या सदस्यांच्या जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांचा अंदाजे वीस वर्षांचा इतिहास या कादंबरीत अंतर्भूत केलेला आहे. रशियाच्या निर्वासितांच्या १९१९ मध्ये सुरू झालेल्या निर्वासनापासून पुढे १९२० च्या संपूर्ण दशकातील घडामोडींचा आढावा घेत १९४० मध्ये सोव्हिएतच्या बाल्टिक राज्यांत झालेल्या विस्तारासोबत ही कादंबरी संपते. या त्याच्या कादंबरीने अनेक महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार प्राप्त केले आहेत. दोनदा रशियन बुकर पुरस्कारासाठी नामांकन तर नोव्हाया स्लोव्हेस्टनॉस्ट साहित्यिक पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. २०१३ मध्ये त्याने रशियन स्थलांतरितांच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कादंबऱ्यांची एक मालिका सुरू केली; ज्याचा पहिला भाग हार्बिन मॉथ्स ही कादंबरी होती. इव्हानोव्हची सर्वात अलिकडील द इनहेबिटंट्स ऑफ द क्युरियस सेमट्री या कादंबरीला या मालिकेतला पुढचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याची ही आतापर्यंतची सगळ्यात दीर्घ कादंबरी आहे.
इव्हानोव्हची लघु कथा ‘सिंडर्स’ यातील मुख्य पात्र इव्हानोव्हच्या साहित्यविश्वाचा मुख्य हेतू स्पष्ट करते. आयुष्य हे एका खोलीतून दुसऱ्या खोलीकडे जाणे, एका गाडीमधून दुसऱ्या गाडीकडे जाणे, एका आगगाडीतून दुसऱ्या आगगाडीकडे जाणे आणि एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याशिवाय इतर काहीही नसते. कायम फिरतीवर असणे, हीच सामान्य स्थिती आहे. ही स्थिती त्याच्या साहित्याचा स्थायीभाव ठरतो. हा विषय त्याने आपल्या स्कॅन्डिनेव्हियन जीवनानुभव असलेल्या कादंबरी मालिकेत मांडला होता. डेन्मार्कच्या निर्वासित छावण्यांमधील एस्टोनियामधील नागरिक नसलेल्या आणि रशियन अल्पसंख्यक सदस्य म्हणून ओळख असलेल्या साहसी नायकाचे जीवनवर्णन त्याने या मालिका कादंबऱ्यांमध्ये केले आहे.
त्याच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्याला पुढील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले – रशियन साहित्य पुरस्कार (२००९ आणि २०१०), युरी डॉल्गोरुकी फाऊंडेशन पुरस्कार (२००९), रशियन बुकर पुरस्कार (२०१०), ट्यलन विद्यापीठ साहित्य पुरस्कार (२०११), एस्टोनियन कल्चरल एंडोव्हमेंटचा रशियन लेखक पुरस्कार (२००९. २०११,२०१३), एन.ओ.एस. साहित्य पुरस्कार (२०१३), ऍन्युअल एस्टोनियन कल्चरल एंडोमटचा रशियन लेखक पुरस्कार (२०१६), एस्टोनियन राष्ट्रीय संस्कृती पुरस्कार (२०१६), ट्यलन विद्यापीठ साहित्य पुरस्कार (२०१६), ट्यलन विद्यापीठ साहित्य पुरस्कार (२०१८), एस्टोनियन कल्चरल एंडोव्हमेंट रशियन लेखक पुरस्कार (२०१९).
२०१३ पासून तो एस्टोनियन राइटर्स युनियनचा सदस्य आहे. गेल्या दहा वर्षांत इव्हानोव्हने दहापेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रभावी पराक्रम केला आहे. जवळजवळ सर्वच भटक्या, स्थलांतरित, राज्यविहीन आणि इतर समाजबाह्य लोकांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न तो करतो. आंद्रेई इव्हानोव्ह ट्यलन येथे पत्नी व एका मुलासह सध्या वास्तव्यास आहे.