आंद्रे मारी द शेन्ये
शेन्ये, आंद्रे मारी द (३० ऑक्टोबर १७६२ – २५ जुलै १७९४). थोर फ्रेंच कवी. जन्म गलाटा, इस्तंबूल (तुर्कस्तान) येथे. त्याचे वडील तेथे फ्रेंच कॉन्सल होते. आई ग्रीसमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या एका प्रतिष्ठित घराण्यातली एक बुद्धीमान स्त्री होती. शेन्येचे शिक्षण पॅरिसला झाले असले, तरी आईच्या प्रभावाखाली त्याने प्राचीन ग्रीक काव्याचा अभ्यास केला. फ्रेंच सैन्याच्या स्ट्रॉसबर्ग लष्करी तळावर अल्पकाळ नोकरी केल्यानंतर लंडनच्या फ्रेंच राजदूतावासात त्याने सचिव म्हणून काम केले. दरम्यान फ्रेंच राज्यक्रांतीला आरंभ झाला होता.
आरंभी ह्या क्रांतीला त्याचा पाठिंबा असला, तरी पुढे घडत गेलेल्या अनेक घटनांनी तो अस्वस्थ झाला आणि वृत्तपत्रांत काही लेख लिहून ही अस्वस्थता त्याने प्रकट केली.त्याचे हे लेखन राज्याविरोधी आहे हा आरोप ठेवून त्यातूनच त्याला अटक करण्यात आली आणि पॅरिस येथे त्याला देहान्त शासन देण्यात आले.
त्यानंतर पुढे पंचवीस वर्षांनी त्याच्या कविता प्रसिद्ध झाल्या (१८१९). फ्रेंच स्वच्छंदतावादाचा प्रमुख प्रतिनिधी लामार्तीन (१७९० – १८६९) ह्याचा मेदितासियाँ पोएतीक हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होण्याआधी फक्त एक वर्ष शेन्येच्या कविता प्रकाशित झाल्या होत्या.
अभिजाततावादाचे ठळक संस्कार जरी शेन्येवर झालेले होते, तरी तरुण स्वच्छंदतावाद्यांना तो आपला समानधर्मी वाटावा, अशी काही वैशिष्ट्येही त्याच्या कवितेत होती. त्याच्या वीरमरणामुळे त्याच्याभोवती एक वलयही निर्माण झालेले होते. त्याच्या हयातीत ‘ल् सॅर्मां द्यु ज द् पोम ’(Jeu de paume) व ‘इम्न स्युर लांत्रे त्रियोंफाल दे सुईस रेव्होल्ते द्यु रेजिमां द् शातोव्हिय’ ह्या दोनच कविता प्रसिद्ध झाल्या होत्या.
ग्रीक भावकवितेचे संस्कार झालेल्या फ्रेंच कवितेतून नव्या चैतन्याचा प्रत्यय कसा येतो, हे त्याच्या अनेक कवितांतून अनुभवास येते. त्याच्या काही कविता (इयांब) त्याने तुरूंगात असताना लिहिल्या. ह्या कवितांतून न्याय आणि स्वातंत्र्य ह्या मूल्यांचा त्याने उत्कटपणे उद्घोष केला. मानवी सदसद्विवेकबुद्धीचा आवाज त्यांतून उमटलेला दिसतो. लँ व्हांसियाँ या काव्यात त्याने आपले साहित्यविषयक विचार मांडले आहेत. छंदोरचनेत त्याने काही बदल घडवून आणले. अठराव्या शतकातील अभिजाततावादी व स्वच्छंदतावादी सर्वश्रेष्ठ फ्रेंच कवी म्हणून तो गौरविला जातो.