Jump to content

आंत्वान मेये

आंत्वान मेये ह्यांचा जन्म मूलें येथे ११ नोव्हेंबर १८६६ मध्ये झाला. ते फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ होते. सुप्रसिद्ध स्विस भाषाशास्त्रज्ञ  फेर्दिनां द सोस्यूर यांचे शिष्य होते. आर्मेनियमपासून सुरुवात करून सर्व इंडो-युरोपियन विषयांचा अभ्यास केला. १९०६ मध्ये ‘कोलेझ्य द फ्रांस’ मधील मीशेल ब्रेआल यांच्या जागी, त्यांची निवड झाली. सामान्य भाषाशास्त्र आणि इंडो-युरोपियन हे त्यांचे खास विषय असून त्यांत त्यांनी विपूल संशोधन केलेले आहे. ग्रीकलॅटिन भाषांचे इतिहास, प्राचीन इराणी व्याकरण, स्लाव्हिक भाषांचा तौलनिक अभ्यास, आर्मेनियन इ. विषयांवरील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध असून, इंडो-युरोपयिन भाषांच्या तौलनिक अभ्यासावरचा त्यांचा १९०३, इं. शी. इंट्रोडक्शन टू द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द इंडो-युरोपयन लँग्वेजीस हा ग्रंथ आजही प्रमाणभूत मानला जातो.

सामान्य भाषाशास्त्रावरील त्यांचे महत्त्वाचे लेख दोन खंडांत प्रसिद्ध झालेले असून त्यांनी एकंदर २४ ग्रंथ, ५४० संशोधनपर लेख, शेकडो ग्रंथपरीक्षणे आणि इतर पुष्कळ लेखन केलेले आहे. कठीण विषय सोपा आणि आकर्षक करून सांगण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. शातोमेयां येथे त्यांचे निधन झाले.