आंतोन चेखव
आंतोन चेखव | |
---|---|
ओसिप ब्राझ याने रंगविलेले चेखवचे व्यक्तिचित्र (इ.स. १८९८) | |
जन्म नाव | आंतोन पावलोविच चेखव |
टोपणनाव | (१) व्ही (२) अंतोशा चेखोन्ते |
जन्म | जानेवारी २९, इ.स. १८६० तागानरोग, रशिया |
मृत्यू | जुलै १५, इ.स. १९०४ बाडनवायलर, जर्मनी |
राष्ट्रीयत्व | रशियन |
कार्यक्षेत्र | डॉक्टर, कथाकार, नाटककार |
साहित्य प्रकार | लघुकथा, नाटक |
प्रभाव | लिओ टॉल्स्टॉय |
प्रभावित | आर.के. नारायण |
वडील | पावेल येगोरोविच चेखव |
आई | येवगेनिया चेखव |
पुरस्कार | रशियन अकॅडमी ऑफ सायन्सचे १८८८ सालचे पुश्किन पारितोषिक |
जागतिक कीर्ती लाभलेला, श्रेष्ठ रशियन कथाकार व नाटककार. आंतोनचा जन्म दक्षिण रशियातील टॅगनरॉग येथे इ.स. १८६० साली झाला. त्याचे आजोबा एका जमीनदाराच्या पदरी नोकर म्हणून दास्यात काम करीत होते. त्यांच्या कमाईतून पैसे साठवून त्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची दास्यातून मुक्तता करून घेतली. नंतर आंतोनचे वडील पॉवेल यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. त्यांना एकूण सहा अपत्ये झाली पैकी आंतोन तिसरा. वडिलांच्या दुकानाचे लवकरच दिवाळे वाजल्याने शाळेत शिकत असतांनाच आंतोनला शिक्षणासाठी व कुटुंबासाठी पैसे कमावणे भाग पडले. त्यामुळे आंतोनला स्वावलंबन व जबाबदारीची जाणीव लवकर आली.
१८७९ साली शिष्यवृत्ती मिळ्वून आंतोन वैद्यकीय शिक्षणासाठी मॉस्को येथे गेला. पैसे मिळविण्यासाठी त्याने मासिकातून विनोदी कथा लिहिण्यास सुरुवात केली. त्याला १८८४ साली वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाली परंतु त्याने डॉक्टर म्हणून व्यवसाय केला नाही. लेखक म्हणून आपण लोकप्रिय आहोत हे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो लेखनाकडे वळला. नवा काळ (रशियन : नोवाया व्रेम्या) नावाच्या वृत्तपत्रात तो नियमीतपणे लिहू लागला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याला क्षय रोगाची बाधा झाली. त्याने बरीच वर्षे त्याबद्दल आपल्या कुटुंबियांना काही कळु दिले नही. १८९७ नंतर त्याच्या क्षयाची तीव्रता वाढत गेल्यामुळे तो नंतरच्या काळात आरोग्य केंद्रातच राहू लागला. फ्रान्स देशातील नीस या शहरात तो दीर्घकाळ वास्तव्य करून होता. तेथे फ्रान्सच्या विरुद्ध जर्मनी ला काही मदत केल्याच्या आरोपावरून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिल्या गेली. लवकरच हे आरोप खोटे असल्याचे लक्षात आल्याने त्याला निर्दोष सोडण्यात आले. १९०४ साली वयाच्या ४४ व्या वर्षी काळाने त्याला गाठले.
चेखव वर लिओ टॉल्स्टॉय या महान लेखकाचा काही काळ (१८८६ - १८९०) प्रभाव होता. आंतोनचे पहिले उपलब्ध नाटक प्लेटॉनोव (मरणोत्तर १९२३ साली प्रकाशन) त्यानंतर इवानोव (१८८७), द वुड डेमन (१८८९), द सी गल (१८९६), अंकल वान्या (१८९९), द थ्री सिस्टर्स (१९०१), द चेरी ऑर्चर्ड (१९०४) ही त्याची प्रसिद्ध नाटके. लघु कथा या प्रकारात आंतोनला मोठेच नाव मिळाले. त्याने ३०० च्या वर लघु कथा लिहिल्या, त्यातील द सर्जरी, अ शॅमेलियॉन, अ डेड बॉडी, मिझरी, द कोरस गर्ल या कथा विशेष गाजलेल्या आहेत. १८८६ ते १८९० या काळात चेखवचे प्रकाशित झालेले चारही कथासंग्रह अतिशय गाजले. द डुएल (१८९१) व वॉर्ड नंबर सिक्स या कथाही विशेष गाजलेल्या आहेत. त्याच्या लिखाणात मानवी मनाचे आकलन, खोल आणि सूक्ष्म दुःखाची जाणीव, सामाजिक विसंगती, अन्याय हे चित्रण करण्यासाठी विनोद, संयमी व उत्कट नाट्यमयता आहे.