अस्मितादर्श (त्रैमासिक)
अस्मितादर्श हे औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे एक त्रैमासिक आहे. दलित साहित्य, दलित चळवळीला एक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य 'अस्मितादर्श'ने केले. गंगाधर पानतावणे यांनी हे त्रैमासिक सुरू केले. डिसेंबर १९६७ ला 'अस्मितादर्श'चा पहिला अंक प्रकाशित झाला. मजकूर गोळा करण्यापासून ते प्रुफ तपासण्यापर्यंत व अंक छापून आल्यावर त्याला रॅपर चिकटवून त्यावर पत्ते टाकण्यापर्यंत सर्व कामे पानतावणे हे एकट्याने करत.[१]
अस्मितादर्श सूची
डॉ. मीरा खांडगे यांनी डिसेंबर १९६० ते २००७ या ४० वर्षांत प्रसिद्ध झालेल्या 'अस्मितादर्श' मासिकाची एक सूची (प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन, पुणे) केली आहे. ही सूची अतिशय तपशीलवार आहे. सूचीचे विषयवार व लेखकवार असे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात ललित, कांदबरी, कथा, नाटक, एकांकिका, कविता, ग्रंथाचा अनुवाद, आत्मकथन, निर्मिती प्रक्रिया, भाषाविषयक, व्यक्तिविषयक, वैचारिक लेखन इत्यादी सर्व लेखन प्रकारांची तपशीलवार नोंद केली आहे, तर दुसऱ्या भागात लेखकांची सूची आहे.
'अस्मितादर्श' हे वाङ्मयाबरोबरच वैचारिक व्यासपीठ असल्यामुळे 'अस्मितादर्श' साहित्य संमेलनातील उद्घाटकांपासून ते अध्यक्षांपर्यंत सर्वांच्या भाषणांची यादीही या ग्रंथात दिलेली आहे. याशिवाय येथे संमेलनातील परिसंवाद, मुलाखती, टीपाटिप्पण्या यांचीही सविस्तर नोंद घेतलेली आहे. सूची तयार करताना रेखाटने, छायाचित्रे यांचीसुद्धा दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे दलित साहित्य, दलित चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसंबंधात संशोधन करणाऱ्या अभ्यासकाला एकत्रितपणे माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी हा सूचिग्रंथ उपयुक्त झाला आहे.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी