अशोक रानडे
डॉ. अशोक दामोदर रानडे (जन्म : पुणे, २५ नोव्हेंबर, इ.स. १९३७; - ३० जुलै, इ.स.२०११) हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व मराठीतील गंथलेखन, नाटक-चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, कित्येक थिमॅटिक कार्यक्रम देणारे रानडे सतत अध्यापन, लेखन आणि संगीताच्या विश्वातील एकेका संकल्पनेचा वेध घेण्यात गुंतलेले असत.
जीवन
अशोक रानडे यांना मुळात साहित्यात रस होता. मात्र त्यांनी वडिलांच्या आग्रहापोटी बीएला अर्थशास्त्र घेतले. नंतर एल्एल्बी केले(१९६०). साहित्याची ओढ असल्याने मराठी वाङ्मयात एमए केले(१९६२). मग इंग्रजी साहित्य खोलात जाणून घ्यायचे म्हणून पुन्हा इंग्रजीत एमए केले (१९६४). डॉक्टरेटचा अभ्यास डॉ. रा.भा. पाटणकरांकडे चालू असताना दोनतीनदा विषय बदलले. ध्वनिसिद्धान्तावर संशोधन करीत असतानाच 'शेक्सपिअरच्या नाटकांमधील संगीत' यावर पीएच. डी. करावी, असाही आग्रह झाला.
वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताचे शिक्षण चालू होते. पंडित गजाननराव जोशी (१९४८-५८), पंडित प्रल्हाद गानू (१९५८-६२), पंडित लक्ष्मणराव बोडस (१९६२-६६), या साऱ्यांकडे रानडे यांनी अनेक वर्षे ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, पतियाळा या घराण्यांची तालीम घेतली. प्रो. बी.आर. देवधर यांच्याकडे आवाजाच्या आणि कंठसंगीताच्या तंत्रज्ञानाचा (Voice Culture) अभ्यास केला (१९७०-७४). शास्त्रीय संगीताच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून ’हा व्यवसाय म्हणून करायचा नाही’ असा त्यांचा दृष्टिकोन होता; मैफली आणि कार्यक्रम करण्यातच अडकून पडायचे नाही, गाण्याचा व्यवसाय करण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्या करायच्या नाहीत.
मुंबईच्या आकाशवाणी केंद्रात अशोक दा. रानडे यांनी १९६३ ते ६६ या काळात नोकरी केली. आणि नंतर १९६७ ते १९६८ या काळात ’सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड एकॉनॉमिक्स’मध्ये त्यांनी अर्थशास्त्र शिकविले. १९६८मध्ये ते मुंबई विद्यापीठात युनिव्हर्सिटी म्युझिक सेन्टरचे संचालक झाले. तेथे ते १९८३पर्यंत होते; त्यानंतर पुण्याच्या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज या संस्थेत ते Archives and Research Center for Ethnomusicology या शाखेचे एका वर्षासाठी सहसंचालक झाले. १९८४पासून ते १९९३पर्यंत अशोक दा. रानडे हे मुंबईच्या ’एन्सीपीए’ (नॅशनल सेन्टर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स)मध्ये उपसंचालक म्हणून काम करीत होते.
स्वतः जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी गळयात घोटवून घेतलेले डॉ. अशोक दामोदर रानडे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताला आपल्या सौदर्यशास्त्रीय दृष्टीने मोठया उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईत एन.सी.पी.ए.त (नॅशनल सेन्टर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स), महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लावणी महोत्सव आयोजित होत असतो. त्यात लावणीवरची कार्यशाळा नेहमी आयोजित व्हायची. या कार्यशाळेत अशोक रानडे बैठकीच्या लावणीचे मर्म उलगडून सांगायचे. डॉ. अशोक रानडे यांनी लोकसंगीताला जी सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली ती निश्चितच अजोड अशी आहे.
भारतीय संगीताचे आदिम संगीत, लोकसंगीत, धार्मिक संगीत, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत असे वर्गीकरण करून त्यामागची शक्तिस्थाने शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशोक रानडे यांनी केला. त्यांनी मुंबई विद्यापीठात संगीत विभागाची स्थापना करून त्या विभागाची सतत प्रगती घडवून आणली. आकाशवाणी, एन.सी.पी.ए., चव्हाण केंद्र अशा संस्थांमधून महत्त्वाच्या पदांवर काम करीत असताना, अशोक रानडे यांनी आयुष्यभर संगीतसेवा आणि नाट्यसेवा केली.
अशोक दा. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके(मराठी १०, इंग्रजी १३)
- परंपरा आणि आविष्कार (२०१०)
- पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश (सहलेखक - चैतन्य कुंटे) (२०१८) : या कोशा तग्रीक, लॅटिन, इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्कॉटिश, डॅनिश अशा दहा भाषांतील संज्ञांचा समावेश आहे.
- भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ (१९९५)
- भाषण व नाट्यविषयक विचार (२००१)
- मला भावलेले संगीतकार (२०१०)
- लोकसंगीतशास्त्र (१९७५)
- संगीत विचार आणि हिंदुस्तानी संगीत (२००९)
- संगीताचे सौदर्यशास्त्र (१९७१)
- स्ट्राव्हिन्स्कीचे सांगीतिक सौदर्यशास्त्र (१९७५)
- हिंदी चित्रपट गीते (२०१०)
- Essays in India Ethnomusicology (1998)
- Hindi Film Songs : : Music Beyond Boundaries (2006)
- Hindustani Music (1997, first reprint 2002, second 2005)
- Indology and Ethnomusicology: Contours of Early Indo-British Relationship (1992)
- Keywords and Concepts: Hindustani Classical Music (1990)
- Maharashtra: Art Music (1989)
- Music and Drama (1991)
- Music Contexts: A Concise Dictionary of HIndustani Music (2006)
- On Music and Musicians of Hindoostan (1984)
- Perspectives on Music: Ideas and Theories (2008)
- Reflections on Musicology and History, With reference to Hindustani Music (2001)
- Some Hindustani Musicians-The Lit the Way (2011)
- Stage Music of Maharashtra (1986)
वृत्तपत्रांतील सदर लेखन
अशोक दामोदर रानडे हे महाराष्ट्र टाइम्समध्ये ’किरणांची सावली’ या नावाचे, आणि लोकसत्तामध्ये ’संगीत संगती’ नावाचे सदर लिहीत असत.
रानड्यांचे संगीत दिग्दर्शन/संयोजन
- एक झुंज वाऱ्याची (प्रायोगिक नाटक)
- देवाजीने करुणा केली (नाटक)
- अशोक रानडे यांनी ’रसिक रंगा’ या नावाने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात काही बंदिशी रचल्या आहेत.
- शोनार बांगला (नाटक)
रानडे यांनी केलेले संगीतविषयक थिमॅटिक कार्यक्रम (एकूण २०)
- कलागणेश%
- गायकीचे वळण (२०००)
- गीतिभान% (२००७)
- चंद्रभैरवी(२००५)
- त्रिभंग ते अभंग (१९९५)
- देवगाणी% (१९९१)
- नाट्यसंगीताची वाटचाल (१९८४)
- नाट्यसंगीताचे मराठी वळण (१९९४)
- बैठकीची लावणी% (१९८९)
- मानापमानातील गाणी (१९८६)
- रंगबसंत (१९९३)
- रचना ते बंदिश (१९९७)
- राधा (१९९५)
- रामगाणे% (२००९)
- सकलांचे सोयरे
- संगीतरंग (१९९२)
- संचित% (२००४)
- संतांची वाटचाल% (२००७)
- सावन (१९८८)
- स्वरचक्र(१९९३)
% : या सर्व कार्यक्रमांच्या सीडीज निघाल्या आहेत.
अशोक दा. रानडे यांना मिळालेले पुरस्कार
- 'चतुरंग परिवारा'चा जीवनगौरव पुरस्कार
- भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा कलादान पुरस्कार