Jump to content

अशोक पवार

आमदार अशोक रावसाहेब पवार

आमदार शिरूर हवेली मतदार विधानसभा संघ
कार्यकाळ
२००९ – २०१४
कार्यकाळ
२०१९ – विद्यमान

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
पत्नी सौ.सुजाता पवार ( जिल्हा परिषद सदस्या )
निवास शिरूर
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.ashokpawar.in

शिरूर-हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार आहेत. पवार हे २००९ ते २०१४ पर्यंत शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार होते, तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सुमारे ४१,००० मताधिक्याने विजयी होऊन ते शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते स्वतः एक वकील असून त्यांचा कायदे, समाजकारण, राजकारण याचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते चेरमन आहेत.

परिचय

त्यांचे तीर्थरूप रावसाहेब (दादा) पवार यांचा सामाजिक कार्याचा वारसा लाभला आणि त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. अशोक पवार यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. अशोक पवार हे प्रथमतः पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. पुढे घोडगंगा सहकारी कारखान्यात निवडणुका झाल्यानंतर चेरमन म्हणून पद प्राप्त झालं. अजितदादा पवार व शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे राजकारणात मोठे यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. घोडगंगा सहकारी साखर कारखाना सर्वांगाने मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत. सर्वसामान्य राजकारण्यांपेक्षा आगळंवेगळं आणि नाविन्यपूर्ण काम करण्याची त्यांची हातोटी या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर गाजली. सरकारी योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबरीने मोठा संघर्ष त्यांनी पत्करला. इनोव्हेटिव्ह वर्क या संकल्पनेला साकारण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. टू चेंज सिस्टिम अँड टू इम्प्रूव्ह सिस्टीम हे त्यांच्या कार्याचे ब्रीद म्हणता येईल.

शैक्षणिक पात्रता

  • B.sc. (Agri ) LL.B.

राजकीय कार्यकाळ

  • २००९ ते २०१४ - आमदार शिरूर हवेली मतदार विधानसभा संघ
  • २०१९ - आमदार शिरूर हवेली मतदार विधानसभा संघ ( विद्यमान )

राजकीय प्रवासाची प्रेरणा – वडिलांचे सामाजिक कार्य

रावसाहेब पवार यांनी नेहमीच राजकारणापेक्षा माणसांना मोठे करण्यावर कायम भर दिला. जातीधर्माच्या चौकटी समाजातील जनमानसावर आपली पकड घट्ट करून होत्या अश्या काळात प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी परिसरामध्ये बहुजन समाजातील बांधवांसाठी आणि वैचारिक प्रवाह बदलण्यासाठी मोठे कार्य उभे केले. जोपर्यंत सर्व समाजातील लोक राजकारणात सक्रीय होणार नाहीत तोपर्यंत समानतेचे तत्त्व पूर्णतः रुजण्यासाठी अधिक वेळ लागेल अशी त्यांची भूमिका होती. सर्व जातीधर्माच्या बांधवांसाठी त्यांनी व्यक्तिशः उपक्रम हाती घेतले. त्यांच्या दूरदर्शीपणाच्या अनेक घटना आणि प्रसंग शिरूर परिसरामध्ये आजही चर्चिले जातात. एक बहुजन समाजाचा मुलगा बापूसाहेब थिटे यांना पंचायत समितीत संधी त्यांनी मिळवून दिली. त्याकाळात धनगर समाजातील नुकतंच पुढे आलेल्या सरपंच पोपटराव गवडे यांना पुढे आणण्यासाठी सायकल वरून त्यांच्या गावाला गेले व या मुलाला मला द्या म्हणून मागणी केली. त्याला पंचायत समितीत मी तिकीट मिळवून देईल असा विश्वास दिला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे पंचायत समिती सदस्य पद मिळवून दिलं. पोपटराव कोकरे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी रावसाहेब दादा इंदिरा गांधी पर्यंत गेले आणि तिकीट मिळवून दिलं व ते आमदार झाले. अशाप्रकारे त्यांनी अनेक माणसे राजकारणामध्ये उभी केली. त्यांनी केलेल्या या मुलभूत कार्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसत आहेत. घोडधरणाचा राईट कॅनॉलसाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला व यामुळे चौदा गावे सुजलाम-सुफलाम झाली. या १४ गावांमधून आता सुमारे ०५ लाख मेट्रिक टन ऊस निर्माण होतो आहे. त्याचप्रमाणे चासकमान धरणाचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर तालुका खरेदी विक्री संघ रावसाहेब दादांनी उभा केला. शिरूर तालुक्यात लोकांना राहण्यासाठी अडचण होती. त्यावर उपाय म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांकडून सरकारी जमिनी नाममात्र किमतीत मिळवली व ग्रामीण भागातील नागरिकांना शंभर रुपये एवढी नगण्य रक्कम भरून चार गुंठे जागा मिळवून दिली. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. अत्यंत जवळून जनसामान्यांसाठी आपल्या वडिलांची तळमळ आणि अविरत कार्य हेच अशोक पवार यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. वडिलांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी देखील मोलाचा हातभार लावला. अशा दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाचा मुलगा म्हणून लोकांच्या अशोक पवार यांच्याकडून अशाच अपेक्षा होत्या. त्यातूनच लोक आग्रहास्तव राजकारणात ते पुढे सक्रीय झाले.

विकासातील नाविन्यपूर्ण योगदान

कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यास आधुनिकता, अभ्यास आणि व्यवस्थापन यांची जोड देण्याचा अशोक पवार यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच विविध क्षेत्रामध्ये असंख्य नाविन्यपूर्ण कामे मर्यादित कालावधीत ते पूर्ण करत असतात ज्याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. त्यांनी केलेली कामे ही महाराष्ट्रामध्ये नावाजली जाऊन त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.

२००९ ते २०१४चा कार्यकाळ

सन २००९ ते २०१४ मध्ये नागरिकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकीची संधी मिळाली. या कार्यकाळात अत्यंत नावीन्यपूर्ण, चिरंतन आणि स्थायी विकासाचे कार्य अशोक पवार यांनी आपल्या मतदार संघात केले. रेशनिंगची बायोमेट्रिक पद्धत, आरोग्य सेवेत विशेष योगदान, वीज व्यवस्थापन, शुद्ध पेयजल पुरवठा, नागरिकांशी थेट संपर्क, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न, गाळयुक्त शेती गाळ मुक्त धरण, स्वच्छतेचे अनेक कामे त्यांनी पार पाडली त्यातून घडून आलेल्या मतदारसंघाच्या विकासामुळे नागरिकांच्या मनात आजही त्यांचे स्थान अढळ आहे आणि म्हणूनच २०१९ मध्ये नागरिकांनी पुन्हा अशोक पवार यांच्या बाजूने कौल दिला.

रेशनिंगचे बायोमेट्रिक पद्धतीने वाटप

आलेगाव पागा येथील नागरिकांच्या तक्रारीवरून रेशनिंगच्या होणारा काळाबाजाराला रोख लावण्यासाठी रेशनिंग सिस्टीमचा संपूर्ण अभ्यास अशोक पवार यांनी केला व रेशनिंगचं चावडीवाचन सुरू केलं. त्यातून मोठा भ्रष्टाचार निदर्शनास आला. अनेक दुकानदारांनी याला विरोध केला. त्यामुळे जीआर तयार करून घेतला व रेशनिंगच्या कारभारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम पुढे आणली. सुरुवातीला पाच गावांची परवानगी मिळवून हा उपक्रम प्रायोगिक पद्धतीवर राबविला. त्यामध्ये यश मिळाल्यावर संपूर्ण राज्यभर याला परवानगी मिळाली.

वीज व्यवस्थापन

आपल्या २००९ ते २०१४ या कार्यकाळात पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी 2808 नवीन ट्रांसफार्मर बसवून दिले. जे पूर्वी साठ वर्षात केवळ ११०० ट्रान्सफार्मर होते. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरसाठी पूर्वी प्रमाणे वर्गणी काढणे बंद झाले आहे. ट्रांसफार्मर बसवण्यातील दिरंगाई दूर झाली. २००९ ते १४ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना ३०,००० वीजजोड दिले.

गरिबांसाठी आरोग्यसेवा

गरिबांसाठी प्रत्येक हॉस्पिटल मध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवाव्या लागतात. ही माहिती अशोक पवार यांनी उघड करून हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ८५ हजारांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांचे सर्व उपचार चारिटेबल हॉस्पिटल मोफत करते. तसेच ज्या रुग्णांचे उत्पन्न १६०००० पेक्षा कमी असेल अशा रुग्णांच्या बिलामध्ये ५० टक्के सवलत मिळते. या कार्यामुळे आजपर्यंत रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत झाली आहे.

शुद्ध पेयजल : सर्वांचा अधिकार : गावोगावी आर.ओ. शुद्धीकरण केंद्र

दूषित पाण्यामुळे नागरिकांना वारंवार आजारांना सामोरे जावे लागत होते. म्हणूनच हजारो नागरिकांना घरगुती जलशुद्धीकरण मशीन देण्यात आल्या. यातून ८० टक्के आजारांचे उच्चाटन झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.‌

शासन निधी वाचविला

आपला मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात भरीव योगदान दिले आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, ग्रामीण सोयीसुविधा याबरोबरच रेशनिंग व रॉकेल वाटपामध्ये सुरू होत असलेली बायोमेट्रिक पद्धत सर्वप्रथम त्यांनी सुरू केली आहे. यातून महाराष्ट्र शासनाला हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना शासनाने महाराष्ट्रभर राबविल्या आहे.

नागरिकांशी थेट संपर्क : जलद कार्य

घराघरापर्यंत पोहचून जनतेशी असणारी बांधिलकी जपत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न - एस.टी.स्टॅंडची मोठी दुरवस्था होती अनेक ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे खूप हाल असत, अंगणवाड्यांची खूप दुरावस्था झाली होती त्यामुळे अंगणवाडीत शिकायला कोणी जात नसे, मतिमंद मुलींच्या शाळेची सुद्धा दुरावस्था झाली होती, सभागृहे खराब अवस्थेत होती या सगळ्यांवर उपाययोजना करणे महत्त्वाचे होते. यासाठी शासन आपल्या दारी आणि जनता दरबारात हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. या उपक्रमातुन जनतेचे प्रश्न तिथल्यातिथे सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ८३ हजार ६१७ दाखले व प्रलंबित प्रकरणे सोडवली. शिरूर एसटी स्टॅंड आणि कित्येक वर्षे रखडलेले काम पूर्ण केले. अंगणवाड्यांची दुरुस्ती व विकास, मतिमंद मुलींच्या शाळेची दुरुस्ती, १२२ सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण केले.

गाळयुक्त शेती – गाळमुक्त धरण

धरणांत साठलेला गाळ साफ झाला आणि शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारी रॉयल्टीही माफ झाली - एकाच कार्यातून दुहेरी प्रश्न कौशल्यपूर्ण पद्धतीने सोडविला. धरणांमध्ये अतिरिक्त गाळ साठल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊ शकत नव्हता. त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. परिणामी गरजेच्या वेळी धरणे आणि पाणीसाठे कोरडे पडत. यावर उपाय म्हणजे गाळ साफ करणे. यात गाळासाठी शेतकऱ्यांना लागणारी रॉयल्टी माफ करवून घेतली. यातून शेतकऱ्यांना पोयटा, गाळ मोफत मिळू लागला, धरणातील खोली वाढल्यामुळे पाणीसाठा वाढू लागला व शासनाचा धरणातील गाळ काढण्याचा खर्चदेखील वाचला. इतर ठिकाणांसाठी हा प्रयोग देखील राज्य शासनाने स्वीकारला.

स्वच्छता - आरोग्य

कचरा सांडपाण्याची सुव्यवस्था निर्माण झाली - आरोग्य संवर्धनाला गती मिळाली... कचरा आणि सांडपाणी आरोग्यास अतिशय धोकादायक असते. त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास आरोग्यास हानी होऊ शकते. उरळीकांचन येथे कित्येक वर्ष वाहणाऱ्या आणि नागरिकांचे आरोग्य बिघडवणाऱ्या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच अनेक ठिकाणी गटारी मध्ये केरकचरा साठल्यामुळे अत्यंत गलिच्छ वातावरण निर्माण झाले होते. या नाल्याचे योग्य व्यवस्थापन करून हा प्रश्न सोडवला.

पाऊस आला की रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते रस्तेबांधणी झाल्यावर निकृष्ट दर्जाचे खडी व मुरूम असल्यास लगेच तुटायचे. या सगळ्याचा नागरिकांना त्रास व्हायचा त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले होते यावर उपाययोजना म्हणून रस्ते बांधणीच्या वेळेस उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ते सुंदर होऊन सुंदर शहर नागरिकांना पाहायला मिळाले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेले रस्ते हे अधिक काळ टिकू लागले... प्रायोगिक तत्त्वावर केलेले हे काम राज्यभर उपयोगात आणले गेले.

व्यक्तिगत कौशल्य

लोकनेते आमदार अशोक बापू पवार हे अत्यंत उच्चशिक्षित, अभ्यासू आणि कार्यकुशल आमदार असून प्रत्येकाच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने कार्य करतात. अनेक रुग्णांना व्यक्तिगत रित्या दखल घेऊन मोठी मदत मिळवून दिली व पद, प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचा एक नवा आयाम लोकांसमोर आणला. नागरिकांसाठी सदैव आणि थेट उपलब्धी आणि सामान्य राहणी तसेच उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण सर्वसामान्यांना सहज आकर्षित करून घेणारा आहे. यामुळे लोकांच्या समस्या ते मोकळेपणाने सांगू शकतात आणि व्यवस्थापकीय गुणांमुळे मर्यादित कालावधीत त्या सोडविल्याही जातात.

वर्तमान कार्य

केलेल्या भरीव विकास कामांमुळे 2019 मध्ये शिरूर-हवेली मतदार संघात नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुन्हा अशोक पवार यांना संधी दिली. सर्व स्तरांमधून त्यांना भक्कम पाठिंबा लाभला. नावीन्यपूर्ण कार्य, प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून कौशल्यपूर्ण पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची पद्धत, संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे विशेषतः युवकांचा त्यांना भरभरून पाठिंबा लाभला. मतदार संघात पुढे कोणती कार्य केली जातील. विकास कशाप्रकारे घडवून आणला याबद्दल त्यांचे प्रतिपादन अत्यंत अभ्यासपूर्ण असेच आहे. यात प्रामुख्याने पुढील मुद्द्यांना त्यांनी प्राधान्य दिले.

  • वाघोली येथील कचरा पिण्याचे पाणी व सांडपाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य.
  • शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गाच्या रुंदीकरणात टपऱ्या गेल्याने विस्थापित झालेल्या टपरी धारकांसाठी भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मानस.
  • मुंबईतील एसआरए योजनेत परप्रांतीयांना घरे दिली जातात. त्याच धर्तीवर वाघोली, लोणी, काळभोर, उरळीकांचन व इतर ठिकाणी गरिबांसाठी सदनिका बांधण्याचा प्रयत्न करणार.
  • पी.एम.आर.डी.ए. अंतर्गत धोरणात्मक निर्णय घेऊन बांधकामे घरे नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार.
  • शिरूर-हवेली मतदारसंघात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षांसाठी सर्व सुविधायुक्त केंद्र उभारण्याचा संकल्प.
  • फक्त हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र पणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थापना करणार.
  • वीजवाहक तारा जीर्ण झाल्याने अपघात शॉर्टसर्किट होऊ शकतो म्हणूनच जुन्या तारा व खांब बदलण्यास प्राधान्य.
  • धरणे उभारताना अनेक गावांच्या जमिनीवर प्रकल्पग्रस्तांसाठी राखीवचे शेरे पडले आहेत. पुनर्वसन पूर्ण झाल्याने हे शिकते तातडीने हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
  • छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ व इतर तीर्थक्षेत्रांच्या सुशोभीकरण व भाविकांसाठी सुविधा देण्याचा मानस.

इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी निवडणुकीसाठी भर दिला असून आपले शब्द खरे करून दाखवण्यासाठी ते सातत्याने कार्यशील आहेत.

संदर्भ