अशोक पत्की
अशोक पत्की (जन्म : ऑगस्ट २५, इ.स. १९४१) हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत.
‘नाविका रे वारा वाहे रे’ हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय.
अशोक पत्की मुंबईतल्या कांदेवाडीत रहात, सध्या त्यांचे निवासस्थान माहीम येथे आहे. त्यांच्या धाकट्या भगिनी मीना पत्की याही गायिका आहेत.
'यमुनाजळी' या गाण्याला दुसरी लोकप्रिय होऊ शकेल अशी चाल लावण्याचे धारि़ष्ट्य फक्त अशोक पत्कींचेच. मूळ चाल दादा चांदेकरांची.
अशोक पत्की यांनी लिहिलेल्या व गीतबद्ध झालेल्या कविता
- अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
- तू सप्तसूर माझे : तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा । गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
- राधा ही बावरी हरीची : रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते... राधा ही बावरी हरीची
शीर्षकगीते
दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अशा अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : -
- अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबऱ्यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते, अधांतर
- अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
- अभिलाषा : आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा । स्वप्नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा
- अस्मिता : सावलीही अशात हसते, ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत... अस्मिता
- अवघाचि संसार : मन माझे मोरपिशी स्वप्न जणू । ... अवघाचि हा संसार
- आभाळमाया : जडतो तो जीव, लागते ती आस । ... आभाळमाया
- गोट्या : बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत । कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?
- जिवलगा : खुणावते आडुनिया एक मोरपिशी स्वप्न-सय... कधी येशील येशील जिवलगा जिवलगा
- तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले । कवडसे हवेसे उधळीत आले
- बंधन : नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते । वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
- मानसी : कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी । साऱ्यासख्या सजणींचे मन मानसी... मानसी
- मोगरा फुलला : दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला । आज अशी मी मला गवसले - मोगरा फुलला
- या सुखांनो या : तांबडं फुटलं आभाळ भरलं । मायेचं सुखही त्यातच दडलं । ... या सुखांनो या
- सोनियाचा उंबरा : सोनियाच्या उंबऱ्यात प्रकाशाची उधळण | तुम्हांसाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण ।
- वादळवाट : थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले । ... कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
- आम्ही सारे खवय्ये : आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे । ... आम्ही सारे खवय्ये
- तुला पाहते रे : हाक देता तुला, साद जाते मला । ... तूच माझा आरसा, तुला पाहते रे
- अग्गंबाई सासूबाई : चांदण्या रातीला प्रीतीचा सागर फेसाळ उधाळला । ... करवली सूनबाई, अग्गंबाई सासूबाई
- माझा होशील ना : नको चंद्र तारे, फुलांचे पसारे । ... मला साथ देशील ना, माझा होशील ना
- येऊ कशी तशी मी नांदायला : लगबग लगबग सासूबाई बघ बघ । ... ठेऊ कशी तशी मी रांधायला, येऊ कशी तशी मी नांदायला
- अग्गंबाई सूनबाई : उंबरठा हा सासरचा ओलांडून आलीस तू । ... मीच तुझी आई, अग्गंबाई सूनबाई
अशोक पत्की यांचे अन्य लेखन
- ’सप्तसूर माझे‘ (आत्मचरित्र) प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
अशोक पत्की यांना मिळालेले पुरस्कार
- वि.वि.द. (विष्णु दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार (१९-१२-२०१७)
- ब्राह्मण जागॄती सेवा संघातर्फे समाजभूषण पुरस्कार (ऑक्टोबर २०१७)
- नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)