अशोक नायगावकर
अशोक नायगावकर | |
---|---|
जन्म | डिसेंबर २९, इ.स. १९४७ वाई, सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
अपत्ये | प्राची आणि प्रज्ञा |
अशोक नायगावकर (डिसेंबर २९, इ.स. १९४७; वाई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आहेत.
नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर ते हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँक ऑफ बरोडा या बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली.
इ.स. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर होते. या संमेलनात ते म्हणाले होते,'महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.' उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल, असे ते म्हणतात. इस्त्रायल, कतार, डेट्राईट, दुबई, न्यूकॅसल, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक, बफेलो, लंडन, लॉसएंजेलिस, शिकागो, सिंगापूर, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून येत असत.
नायगावकर मंचावर उभे राहिले, की काहीतरी रंगतदार, मजेदार ऐकायला मिळणार या उत्सुकतेने श्रोतृवर्ग कान टवकारत असतो.
जीवन
लहानपणी गरिबीमुळे कष्टाचे दिवस होते. त्यांची आई जी कामे करत असे, तिच्यात ते तिला मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे त्यांनी अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र.के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. ते सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे. योगी पुरुष बाबुराव कुळकर्णी हे त्यांचे आध्यात्मिक गुरू आहेत असे मानले जाते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते इ.स. २०१० पासून सदस्य आहेत.
कविता
अशोक नायगावकर ह्यांनी. प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.
नायगावकरांचे कवितासंग्रह
- वाटेवरच्या कविता (सप्टेंबर, इ.स. १९९२)
- कवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)
पुरस्कार आणि सन्मान
- दापोली येथे ७ ते ९ डिसेंबर, इ.स. २०१२ या काळात भरलेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- कै. भाई फुटाणे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन २७ आणि २८ मार्च २०२० या काळात फलटण जि. सातारा येथे झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने या संमेलनाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची संमेलनाचे अध्यक्ष होते..
संदर्भ
- ^ कवितांच्या गावा जावे हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.