अशोक चिटणीस
अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आहेत. ते ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक होते. एम.ए.च्या वर्गात शिकत असताना अशोक चिटणीसांनी त्यांनी लिहिलेली ‘पखांमधले गीत संपले’ ही पहिली कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशनच्या कांदंबरी लेखन स्पर्धेसाठी पाठवली होती. त्यावेळी या स्पर्धेत अण्णा भाऊ साठे, मधु मंगेश कर्णिक, माधव कानिटकर, श्री.ज. जोशी, श्रीपाद काळे इत्यादी दिग्गज लेखक-मंडळी होती. दोनशे कांदंबऱ्यामधून ‘पखांमधले गीत संपले’ ही कादंबरी दुसरी आली. जयवंत दळवी यांच्या चक्र कादंबरीला पहिला क्रमांक मिळाला.
त्यांच्या साप आणि शिडी या कथेला १९७२ साली आचार्य अत्रे कथालेखन स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले होते. ‘नवयुग’मधून ही कथा प्रसिद्ध झाली होती. १५०० कथांमधून हिची निवड झाली होती.
अशोक चिटणीस यांची २७हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांच्या एकाहून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी त्यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे पुस्तक केवळ सतरा दिवसांत आणि स्वरांकित हे पुस्तक फक्त सहा दिवसांत लिहून पूर्ण केले.
अशोक चिटणीस यांचे कथाकथनाचे ५६०हून अधिक कार्यक्रम झाले आहेत.
अशोक चिटणीस यांनी लिहिलेली पुस्तके
- आनंदयात्री (कादंबरी, प्रकाशन दिनांक १६ एप्रिल, १९८१); किमान दोन आवृत्त्या
- कर्मयोगी उद्योजक (चरित्र)
- कीर्तिवंत धन्वंतरी (शब्दचित्रणे)
- कोसबाडच्या टेकडीवरून (अनुताई वाघ यांचे आत्मचरित्र, लेखांकन - अशोक चिटणीस)
- जगावेगळ्या (देशोदेशींच्या अद्वितीय महिला); किमान तीन आवृत्त्या
- पखांमधले गीत संपले (कादंबरी. चिटणीसांच्या या पहिल्या कादंबरीला दुसरा क्रमांक मिळाला होता.)
- पन्नास निबंध (सहलेखक - मुरलीधर गोडे). किमान ९ आवृत्त्या
- महाराष्ट्र कोहिनूर मनोहर जोशी (चरित्र). हे पुस्तक लिहिण्यासाठी १९९६ ते २००२ अशी सहा वर्षे लागली.
- प्रतिभावंत गीत - संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्राचे शब्दांकन) [१]
- प्रिय दीदीस
- संवाद संवादकांशी (निवेदकांच्या शब्दचित्रणे असलेल्या, सदरलेखनांचा संग्रह, सहलेखिका - डॉ. शुभा चिटणीस)
- साप आणि शिडी (कथासंग्रह, किमान तीन आवृत्त्या))
- स्वरांकित (२३ गायकांची शब्दचित्रणे)
पुरस्कार
- कोमसापचा चरित्र-आत्मचरित्र लेखन विषयक अरुण आठल्ये स्मृति विशेष पुरस्कार (कोमसाप संमेलन, २००७-०८)