अविनाश पोईनकर
अविनाश पोईनकर हे कवी, लेखक, मुक्तपत्रकार व आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रात कार्य करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे अध्यापक पदविका व पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांचा जन्म १४ ऑक्टोंबर १९९१ रोजी झाला असून भटक्या-विमुक्त वंचित समूहातून ते येतात. २०१७ साली त्यांचा ‘उजेड मागणारी आसवे’ हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला. ‘विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाड्मय’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. ते ‘जागृत’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. त्याद्वारे महाराष्ट्रातील आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात आदिम कोलाम व माडिया समुदायासोबत त्यांचे हक्क, अधिकार, कायदे व धोरणांची अंमलबजावणी करण्यात जमिनिस्तरावर कार्यरत आहेत. आदिम आदिवासी समूहाच्या मुलभूत जल-जंगल-जमीन प्रश्नांवर अभ्यासक व संशोधक म्हणूनही त्यांनी लेखन करून अहवाल प्रकाशित केले. या समुदायात संविधानिक मुल्यांची जाणीव जागृतीसह रुजवणूक व्हावी या हेतूने त्यांचे काम कायदेविषयक साक्षरतेत महत्वपूर्ण ठरले. पेसा-वनाधिकार कायद्यांची अतिदुर्गम भागात करत असलेली अंमलबजावणी व ग्रामसभा सक्षमीकरण यातून या समुदायातील स्थानिक नेतृत्व विकासाला गती देण्यात त्यांचे योगदान आहे. अविनाश पोईनकर हे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो राहिलेले आहेत. त्याअंतर्गत ग्रामपरिवर्तक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील घाटकुळ हे गाव राज्यात आदर्श व स्मार्ट ग्राम म्हणून प्रत्यक्ष कार्यकर्तृत्वाने त्यांनी पुढे आणले आहे. आदिम आदिवासी संस्कृतीचे संशोधन, शिक्षण, रोजगार तसेच हक्क व अधिकार या मुद्यांना घेऊन सामाजिक जागरूकतेसाठी ते सक्रिय आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित युरोपीय देशातील इनलैक्स शिवदासानी सामाजिक फेलोशीप, साधना साप्ताहिक संयोजित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती, पुणे विद्यापीठ व ग्रंथालीची अरुण साधू अभ्यासवृत्ती, नॅशनल फौंडेशन फॉर इंडियाची पत्रकारिता फेलोशिप, कोरो इंडियाची समता फेलोशिप प्राप्त असून मागील दशकभरापासून भटके-विमुक्त व आदिम आदिवासी समुदायात सामाजिक जागरूकतेसाठी जमिनीस्तरावर सक्रिय आहे. विदर्भ साहित्य संघाचा वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, राजुरा भूषण पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे.