Jump to content

अल्ला‍उद्दीन हसन बहामनी

अल्लाउद्दीन हसन बहामनी (मराठी लेखनभेद: अल्ला‍उद्दीन हसन बहमनी) ऊर्फ हसन गंगू (जन्मदिनांक अज्ञात - इ.स. १३५८) हा बहामनी सल्तनतीचा संस्थापक आणि पहिला राज्यकर्ता होता. याने ३ ऑगस्ट, इ.स. १३४७पासून इ.स. १३५८ सालापर्यंत बहामनी सल्तनतीवर राज्य केले.

सुरुवातीचे जीवन

पर्शियन इतिहासकार फरिश्ता ह्याच्या मते हसन हा सामान्य अफगाण दिल्लीचा रहिवासी होता आणि गंगू नावाच्या एका ब्राह्मण ज्योतिषाची जमिन तो कसायचा.[] ही जमिन नांगरताना हसनला खजिना सापडला आणि तो आपल्या मालकाच्या - गंगूच्या - स्वाधीन केला. गंगू ज्योतिषी हसनच्या ह्या प्रामाणिकपणावर खूश झाला. गंगूने आपले दिल्लीच्या राजदरबारातील वजन वापरून त्याची रदबदली बादशाहाकडे केली आणि एक एक पायरी वर चढत हसन लवकरच दिल्लीच्या बादशाहाचा दख्खनेतील सरदार बनला.

इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. हसनने आपल्या घराण्याला आपल्या उपकारकर्त्याचे नाव दिले आणि पुढील १५० वर्षे दख्खनच्या प्रांतावर सत्ता गाजवणारे बहामनी (ब्राह्मणीचा अपभ्रंश) घराणे उदयास आले. गुलबर्गा ही बहामनी घराण्याची पहिली राजधानी ठरली.

कारकीर्द

हसन गंगूने इ.स. १३५१ पर्यंत आजुबाजूचा सगळा प्रदेश तिथल्या वतनदारांना सन्मानाने वागवून दिल्लीच्या बादशाहाच्या अधिपत्याखालून आपल्या काबूत आणला. इ.स. १३५७ मध्ये त्याने ह्या प्रांताची ५ इलाख्यांमध्ये किंवा तरफांमध्ये विभागणी केली. प्रत्येक विभागाला एक तरफदार हा प्रशासक नेमून दिला.

पुढील काही दशकांमध्ये बहामनी घराण्याच्या १८ राजांनी ह्या प्रांतावर राज्य केले. चौल, दाभोळ, इलिचपूर (सद्याचे अमरावती), दौलताबाद किंवा देवगिरी, बिदर, गुलबर्गा ह्यासारखी शहरे भरभराटीस आली.

संदर्भ

  1. ^ "बॉंबे प्रेसिडेन्सी गॅझेटियर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)