अल्टामाउंट रोड
अल्टामाँट मार्ग किंवा अल्टामाउंट रोड हा दक्षिण मुंबईतील खंबाला हिलवरील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला, पेडर रोडला जवळपास समांतर असलेला रस्ता आहे. हा रस्ता वळण घेऊन पेडर रोडला जिथे मिळतो तो नाका 'केम्प्स कॉर्नर' म्हणून प्रसिद्ध आहे. सदर मार्गाचे नामकरण एस.के. बरोडावाला मार्ग असे करण्यात आले आहे. मात्र तेथील स्थानिक लोक, टॅक्सीवाले वगैरे सामान्य जनता या मार्गास अल्टामॉंट/अल्टामाउंट मार्ग म्हणूनच ओळखतात.
नावाची व्युत्पत्ती
ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे. हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ नाही, पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता. हा बंगला १८६५ साली रु.१००० भाड्याने दिला गेल्याचा उल्लेख आहे.[१]
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे
या रस्त्यावर इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिका या देशांच्या वकिलाती आहेत. या रस्त्याशी संलग्न अशा कारमायकल मार्गावर बेल्जियम, चीन आणि जपान या देशांच्याही वकिलाती आहेत.
याच रस्त्यावर उभ्या राहिलेल्या 'अँटीलिआ' या उद्योगपती मुकेश अंबाणी यांच्या २७ मजली घरामुळे हा रस्ता इ.स. २०१० सालानंतर नावारूपाला आला आहे. या रस्त्यावर बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनचा अधिकृत निवास आहे.
संदर्भ
- ^ जेम्स डग्लस. Glimpses of Old Bombay पान ४७.