Jump to content

अलाहुएला प्रांत

अलाहुएला' हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या उत्तर भागात आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस हेरेदिया प्रांत, आग्नेयेस सान होजे प्रांत, ईशान्येस पुंतारेनास तर पश्चिमेस ग्वानाकास्ते प्रांत आहेत.

अलाहुएला प्रांताचा विस्तार ९,७५७ किमी असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ८,८८,५७१ होती. हा प्रांत डोंगराळ आहे. कोर्दिलेरा सेंत्राल दि कोस्ता रिका ही पर्वतरांग या प्रांतात उत्तर-दक्षिण आहे. येथे पोआस ज्वालामुखी आणि व्होल्कान अरेनाल यांसह अनेक जागृत ज्वालामुखी आहेत.

नावाची व्युत्पत्ती

या प्रांताला अलाहुएला नदीचे नाव दिलेले आहे.

अर्थव्यवस्था

शेती हा अलाहुएलाचा मुख्य व्यवसाय आहे. येथे ऊस, मका आणि भाताची शेती होते तसेच अननस, केळींचा बागाही आहेत. प्रांताच्या दक्षिण भागात कॉफीचे मळे आहेत. काही भागांमध्ये पशुपालन होते. गेल्या दोन दशकांत येथे पर्यटन व्यवसाय वाढीला लागला आहे. मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे ज्वालामुखी तसेच निसर्गातील इतर ठिकाणे पाहण्यास येतात.

प्रशासन

या प्रांताचे प्रशासकीय केंद्र अलाहउएला येथे आहे. हा प्रांत पंधरा कांतोनमध्ये विभागलेला आहे. हे कांतोन १११ जिल्ह्यांमध्ये विभागलेले आहेत.