अर्देशर बरझोरजी तारापोर
लेफ्टनंट कर्नल अर्देशर अदी बरझोरजी तारापोर (१९ ऑगस्ट, १९२३:मुंबई, महाराष्ट्र - १६ सप्टेंबर, १९६५:चाविंडा, पाकिस्तान) हे भारतीय लष्करातील परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.
पूर्वजीवन
तारापोर यांच्या पूर्वजांना युद्धातील कामगीरीबद्दल शिवाजी महाराजांकडून गुजरातमधील तारापूर व आसपासची शंभर गावे मिळाल्याची आख्यायिका आहे. अर्देशर यांचे आजोबा हैदराबाद येथे स्थलांतरित झाले व तेथे त्यांनी निझामाच्या सैन्यात नोकरी पत्करली.
अर्देशर तारापोर यांना वयाच्या सातव्या वर्षी पुण्यातील सरदार दस्तूर बॉइझ बोर्डिंग स्कूल येथे पाठविण्यात आले. १९४०मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते हैदराबाद संस्थानच्या सैन्यात दाखल झाले. गोलकोंडा येथे प्रशिक्षण घेउन झाल्यावर त्यांना बंगळूर येथे पाठविण्यात आले. नंतर ते हैदराबादच्या ७व्या पायदळात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.
हैदराबाद
तारापोर यांना पायदळात तैनात केले गेल्याने ते नाखूष होते. त्यांना चिलखती दळात भरती व्हायचे होते. एके दिवशी सरावादरम्यान त्यांनी चुकुन सैनिकांच्या जवळ पडलेला सुरूंग पटकन उचलून घेउन दूर भिरकावला व अनेकांचे प्राण वाचविले. ही घटना हैदराबाद सैन्याच्या सेनापती मेजर जनरल अली इद्रूसनी पाहिली. त्यांनी जखमी झालेल्या तारापोर यांची विचारपूस केली असता तारापोर यांनी आपल्याला चिलखती दळात पाठवायची विनंती केली. इद्रूस यांनी या विंनतीला मान देउन तारापोर यांना पहिल्या हैदराबाद शाही सर्व्हिस लान्सर्समध्ये पाठविले.
तारापोर यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान पश्चिम आशियाच्या रणांगणात कामगिरी बजावली होती.
हैदराबाद मुक्तिसंग्रामादरम्यानच्या ऑपरेशन पोलो या मोहीमेत तारापोर हैदराबादल लान्सर्समधून द पूना हॉर्स या भारतीय सैन्याच्या चिलखती दळाविरुद्ध लढले होते. नंतर तारापोर पूना हॉर्सेसमध्येच दाखल झाले.
परमवीर चक्र
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान लेफ्टनंट कर्नल तारापोर यांच्या पूना हॉर्स चिलखती दळातील तुकडीने चाविंडाच्या लढाईत भाग घेतला होता. यात तारापोर यांची तुकडी सियालकोट परिसरातील फिल्लोरा गावावर चालून गेली. तारापोर यांच्याकडे उजव्या फळीची कमान होती. फिल्लोरा आणि चाविंडाच्या मध्ये वझीरवालीकडून चालून आलेल्या मोठ्या पाकिस्तानी चिलखती सैन्याने भारतीयांवर प्रतिहल्ला चढवला. भयानक मारा होत असतानाही तारापोर यांनी आपली व्यूहात्मक जागा सोडली नाही व आपल्या मागे असलेल्या पायदळाचे शर्थीने संरक्षण केले. तारापोर यांचा रणगाडा शत्रूच्या थेट माऱ्यात होता व त्यावर अनेक तोफगोळे पडून तारापोर व त्यांचा चमू जखमी झाला तरीही तारापोर यांनी पराक्रमाची शर्थ करीत नेट लावून धरला. त्यांचे शौर्य पाहून चवताळलेल्या पूना हॉर्सनी पाकिस्तान्यांचा प्रतिहल्ला मोडून काढला व त्यांचे साठ रणगाडे उद्ध्वस्त केले. तारापोरांच्या रणगाड्यावर पडलेल्या एका गोळ्याने त्यास भीषण आग लागली व त्यातच तारापोर यांचा मृत्यू झाला. पूना हॉर्सने पुढे चाल करीत वझीरवाली, जस्सोरण आणि आसपासचा प्रदेश काबीज केला.
तारापोर यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारतीय सैन्याचा सर्वोच्च बहुमान दिला गेला.