Jump to content

अर्जुन सिंग



अर्जुन सिंग (नोव्हेंबर ५,इ.स. १९३० - मार्च ४, इ.स. २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९५७ ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९८० ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री तर मार्चइ.स. १९८५ ते नोव्हेंबर इ.स. १९८५ या काळात पंजाब राज्याचे राज्यपाल होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

ते इ.स. १९८५ मध्ये पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांच्यावर राजीव गांधी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री आणि दूरसंचारमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.ते इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून परत एकदा मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते जून इ.स. १९९१ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये मनुष्यबळविकासमंत्री होते. डिसेंबर इ.स. १९९४ मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष पी.व्ही. नरसिंह राव यांना जबाबदार ठरवून अर्जुन सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना बेशिस्तीच्या कारणावरून काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. पुढे मे इ.स. १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते नारायणदत्त तिवारी यांच्याबरोबर अर्जुन सिंग यांनी तिवारी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अर्जुन सिंग-तिवारी यांचा नवा पक्ष आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही.इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतः अर्जुन सिंग यांचा सतना लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे फूलसिंग बरय्या यांनी पराभव केला.

पी.व्ही. नरसिंह राव काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून सप्टेंबर इ.स. १९९६ मध्ये पायउतार झाल्यानंतर अर्जुन सिंग आणि नारायणदत्त तिवारी काँग्रेस पक्षात परतले.पुढे इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुन सिंग यांचा मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सरताज सिंह यांनी पराभव केला. त्यानंतर अर्जुन सिंग राज्यसभेचे सदस्य झाले.इ.स. २००४ मध्ये काँग्रेस पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर अर्जुन सिंग यांनी मे इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ पर्यंत मनमोहन सिंह सरकारमध्ये परत एकदा मनुष्यबळविकासमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.मे इ.स. २००९ नंतर मात्र प्रकृतीच्या कारणावरून अर्जुन सिंग यांचा समावेश मंत्रीमंडळात केला गेला नाही.