Jump to content

अरुण श्रीधर वैद्य

जनरल अरुण श्रीधर वैद्य (२७ जानेवारी, इ.स. १९२६; अलिबाग, महाराष्ट्र - १० ऑगस्ट, इ.स. १९८६; पुणे, महाराष्ट्र) हे भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र पुरस्कार मिळाला. नंतर इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची महाराष्ट्रात पुणे येथे ह्त्या केली.

हत्या

भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट, इ.स. १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचा अंगरक्षकही सोबत होता; व तोही पाठीत व मांड्यांत गोळ्या लागून जखमी झाला. खलिस्तान कमांडो फोर्स या अतिरेकी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली व सुवर्णमंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी वैद्यांना मा‍रल्याचा दावा केला. काही काळात वैद्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले. इ.स. १९८९ मध्ये सुखदेव सिंग आणि हरजिंदर सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ९ ऑक्टोंबर, इ.स. १९९२ रोजी या दोघांना फाशी देण्यात आले.