Jump to content

अरुण कांबळे

अरुण कांबळे
धर्मबौद्ध
चळवळदलित चळवळ
संघटना दलित पँथर्स
प्रभाव भीमराव रामजी आंबेडकर
अपत्ये

अपरांत कांबळे

आशुतोष कांबळे

अरुण कृष्णाजी कांबळे (जन्म : करगणी-सांगली जिल्हा, १४ मार्च १९५३; - हैदराबाद, २० डिसेंबर २००९) हे दलित चळवळीचे लढाऊ नेते " नामांतर लढा" व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे, बौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून झटणारे अग्रणी नेते आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता.

सुरुवातीचा काळ

जीवन

प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली सांगली जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी जीवन शिक्षण मंदिर, दिघंची या शाळेत शिक्षक होते. करगणी येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीतही स्वतःला झोकून दिले.

प्रा. अरुण कांबळे माईसाहेब आंबेडकर आणि नानासाहेब गोरे यांसोबत

शेवटी शेवटी ते विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत ते प्राध्यापक व फुले-आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. प्रा. कांबळे यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वावर होता. चतुरस्र व्यासंगी, सडेतोड भाषा आणि प्रबळ वक्तृत्व यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्याचा विवाह आंतरजातीय असल्याकारणाने त्यांना जातीय संघर्षांना तोंड द्यावे लागले.

राजकीय कार्य

एम.ए.करत असतानाच त्यांचा दलित चळवळीचे नेते राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्याशी संबंध आला. १९७३-७४ च्या काळात त्यांनी दलित पॅंथरची अधिकृतपणे स्थापना केली. दलित पॅंथ या संघटनेपासून त्यांनी आंबेडकरी चळवळीपर्यंतचा प्रवास केला. राजकारणात अग्रेसर असणारे कांबळे आपल्या स्फोटक आणि प्रभावी वक्तृत्वाने दलित चळवळीचा केंद्रबिंदू बनले. या संघटनेला त्यांनी वैचारिक बैठक दिली. काही वर्षांनी त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. मागास वर्गासाठी आरक्षण आणि सवलती देण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंगयांच्याकडे प्रयत्न केला. १९८४ सालच्या मंडल आयोग अंमलबजावणी परिषदेचे ते निमंत्रक होते.

दलित पॅंथरमधील दिवस

१९६८-७० या काळात ‘दलित पॅंथर्स’च्या सर्जनशील तरुणांनी जेव्हा तत्कालीन प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला आणि त्याचबरोबर साहित्यातील सारस्वतांना सर्वंकष आव्हान दिले, तेव्हा अरुण कांबळे फक्त १५ वर्षांचे होते. त्या बंडाचा त्यांच्यावरचा संस्कार मात्र अगदी प्रखर होता. महाराष्ट्राच्या साहित्याचा आणि राजकारणाचा बाज कायमचा बदलून टाकण्याची जिद्द बाळगणाऱ्या पॅंथर्सना पहिल्या दशकातच आपल्या घट्ट रुतलेल्या हितसंबंधांच्या व्यवस्थेने विस्कळीत करून टाकले. आणीबाणीनंतर जनता पक्षाने आणि विशेषतः त्यांच्यातील समाजवादी मंडळींनी काही पॅंथर्सना जवळ केले. अरुण कांबळे तेव्हा पंचविशीत होते आणि त्यांच्याकडे दुर्दम्य आशावाद होता. आपण पॅंथर्सना पुन्हा तीच चित्त्याची झेप घ्यायला प्रवृत्त करू शकू, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. तसे पाहिले तर अरुण आणि ‘सीनिअर पॅंथर्स’ यांच्यात वयाचे फार अंतर होते असे नाही; पण तरीही विस्कळीत झालेले दलित नेते आणि साहित्यिक, राजकीय व सांस्कृतिक व्यासपीठावर तसे एकदिलाने एकत्र आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांतच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर

मात्र सर्व दलित नेते, त्यांचे समर्थक समाजवादी आणि कॉम्रेड्स एकत्र आले आणि त्या चळवळीने अरुण कांबळे यांच्या दलित एकजुटीबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या.

जनता दलातील दिवस

जनता पक्षाच्या कारकीर्दीत चरणसिंग यांनी ‘मंडल आयोग’ स्थापन केला होता. परंतु त्याचा अहवाल पूर्ण व्हायच्या आतच जनता सरकार गडगडले. सर्वानाच अनपेक्षित वाटेल, असा इंदिरा गांधींचा त्यानंतरच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. साहजिकच जनता पक्षाच्या आधारे उभे राहिलेले गट व नेते एकदम मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. खुद्द अरुण कांबळे यांच्याही स्वतःबद्दलच्या त्या स्थानाविषयीच्या प्रतिमा उंचावल्या होत्या, आणि समाजात आपल्या विचारांनी व कृतीमुळे अर्थपूर्ण परिवर्तन आणता येईल, असे त्यांना वाटू लागले होते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे जनता सरकारचा प्रयोग फसल्यावर जी अनेक माणसे पुन्हा स्वतःच्या राजकारणाचा शोध घेऊ लागली त्यात प्रा. कांबळे होते. साधारणपणे एक दशकभर मंडल आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळला गेला होता. विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आकस्मिकपणे तो अहवाल अंमलात आणला जाईल, असे घोषित केले. त्या घोषणेलाही संदर्भ होता तो विहिंप व लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या रथयात्रेचा. अयोध्येला ‘त्याच जागी’ म्हणजे बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याचा निर्धार करून योजलेली ती यात्रा हे विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सत्तेला आव्हान होते. त्या यात्रेच्या राजकारणाला शह देण्यासाठी म्हणून मंडल अहवाल बासनातून बाहेर काढायचा निर्णय व्ही. पी. सिंग यांनी केला होता; परंतु अनेक जणांना व्ही. पी. सिंग यांच्यात नव्या युगाचा ‘मसिहा’ आढळला. दुर्दम्य आशावादी असलेल्या अरुण कांबळेंनाही मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत सामाजिक क्रांतीची बीजे आढळली.

वाङ्‌मयीन क्षेत्र

अरुण कांबळे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्याबरोबर
अरुण कांबळे यांच्याबरोबर मंगेश पाडगावकर

अरुण कांबळे यांनी आपली भीमगर्जना मात्र कायम चालूच ठेवली होती. ती गर्जना महाराष्ट्रव्यापी झाली ती ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ या कांबळेंच्या प्रबंधरूपी पुस्तकामुळे. त्यांच्या व्यासंगाचा पुरावा म्हणजे त्यांनी जेव्हा याविषयीचे लेखन केले तेव्हा डॉ. आंबेडकरांचा ‘रिडल्स इन हिंदुइझम्’ हा ग्रंथ कांबळेंनी वाचलाही नव्हता. कांबळे यांचे ते लेखन १९८२ सालचे. तो वाद वेगळ्या स्वरूपात पुन्हा १९८७ भडकून उठला होता. खरे म्हणजे, आपल्या राजकारणाचे आधुनिक रामायण सुरू झाले ते रथयात्रेनंतर म्हणजे १९९० सालापासून; परंतु राम आणि कृष्ण आपल्या सांस्कृतिक राजकारणात १९८२ पासूनच लुडबुड करू लागले होते. असेही म्हणता येईल की भारतीय राजकारणात ‘रामराज्य’ येणार आणि सर्व विचारसरणींमध्ये उलथापालथ होणार याचा अंदाज कांबळेंना अगोदरच लागला असावा. विजय तेंडुलकरांनी अरुण कांबळेंमधील ‘व्यासंगी बंडखोरी’ पूर्वीच ओळखली होती. त्यांनी ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’ या पुस्तकावर टिप्पणी करताना म्हणले होते, ‘‘या छोटेखानी पण वैचारिक पुस्तकाचे मी स्वागत करतो. मराठीत जेव्हा विद्वत्ता सिद्ध करायची असते तेव्हा ४०० ते ५०० पानांचा ग्रंथ लिहावा लागतो. रामायणावर तर तो हजार पानांचाही होऊ शकला असता; पण अरुण कांबळे यांनी ते केवळ ७०-७५ पानांत सिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या परिच्छेदा-परिच्छेदातून संशोधनाची तळमळ असल्याचे दिसून येते. एकही वाक्य निराधार नाही.. आणि आवेश आहे; पण तो मैदानी किंवा सनसनाटी माजविण्यासाठी आलेला नाही.. हे पुस्तक हा एक सत्याचा शोध आहे आणि तसा शोध ज्या समाजात होत नाही तो समाज मेलेला असतो. अरुण कांबळे यांच्यासारखी माणसे या समाजाची आशास्थाने आहेत.’’

ह्या एकूण रगाड्यात सांगलीची असलेली नाळ मात्र त्यांनी कधीच तुटू दिली नाही. मातोश्री शांताबाईंच्या माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकाचे तसेच मी कृष्णा या त्यांच्या वडिलांच्या आत्मकथनाचे प्रकाशन त्यांनी केले होते. प्रा. अरुण कांबळे यांनी महाराष्ट्रातील साहित्याला आणि राजकारणाला जातीयतेचा जो करकचून विळखा पडला आहे, तो आपल्या हयातीत निदान सैल व्हावा आणि शक्यतो पिढ्या-दोन पिढ्यांच्या येत्या काळात ही विषमता पूर्णपणे दूर व्हावी म्हणून अथकपणे प्रयत्न करणार एक व्यक्तिमत्त्व.केवळ उग्र आंदोलन, प्रक्षोभक कविता आणि स्फोटक भाषणे करून लोकांचे वैचारिक प्रबोधन होत नाही हे अरुणने जाणले होते. त्यांच्या व्यासंगाला धार होती ती परिवर्तनाच्या तीव्र इच्छेची. परंतु महाराष्ट्राला अशीच ‘निवांत विचारवंतां’ची एक दीर्घ परंपरा आहे.

या ‘आर्मचेअर इंटेलेक्च्युअल्स’ना वाटते, की ‘उदात्त विचार’ आणि ‘प्रगल्भ चिंतन’ केले, की समाजाला योग्य दिशा मिळेल. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरा अर्थातच कृतिशील विचारवंतांची. अरुण कांबळेंना त्यांचे स्वतःचे लेखन-चिंतन करताना हा कृतिशीलतेचा वारसाच उपयोगी पडला. कृतिशील आणि विचारशील अशी प्रकृती असणाऱ्यांची एक अडचण असते. त्यांना प्रस्थापित विचारवंतांना कोंडीत पकडून आपला विचार पुढे न्यायचा असतो. त्यामुळे प्रचलित वैचारिक वातावरणातील सर्व प्रवाह माहीत असणे आवश्यक असते. शिवाय आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे यावर पकड असावी लागते. त्यामुळे सर्व पूर्वसूरींचे विचार आणि आपली विचारधारा (या ठिकाणी आंबेडकरी विचार) यात क्रांतिकारक काय हे सिद्ध करायचे असते. ते करण्यासाठी जे ‘इंटेलेक्च्युअल अ‍ॅक्रोबॅटिक’ कौशल्य लागते ते कांबळे यांच्याकडे होते. ज्यांना ते कौशल्य संपादन करता येत नाही त्यांना, अशा ‘अ‍ॅक्रोबॅट्स’बद्दल हेवा वाटतो. तसा कांबळे यांच्याबद्दल हेवा वाटणाऱ्यांमध्ये ‘दलित इंटेलेक्च्युअल्स’ही होते; परंतु एकूणच पॅंथर्स, त्यांचे कवी, पुढारी आणि विचारवंत यांच्यातील कलह केव्हा ‘तात्त्विक’ असतात आणि केव्हा ‘व्यक्तिगत’ असतात हे अजून त्यांनाच निश्चित ठरविता आलेले नाही. त्यामुळेच रिपब्लिकन वा पॅंथर एकजुटीचे प्रयत्न गेली ३० वर्षे सफल झालेले नाहीत. अरुण कांबळे त्यामुळेही अस्वस्थ असत.

प्रभावी वक्तृत्वाचा ठसा

अरुण कांबळे भाषणाला उभे राहिले की सगळे संदर्भ पुराव्यानिशी त्यांच्या जिभेवर असायचे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चळवळीतले कार्यकर्ते दुखावले जायचे तरीही सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जीवंत संबंध असणारा, सहज संवाद साधू शकणारा नेता म्हणूनच त्यांची ओळख होती. कॉलेजात शिकवतानाही विद्यार्थ्यांना ते आपल्या विषयाबाहेरचे अनेक सांस्कृतिक-सामाजिक संदर्भ देऊन त्यांच्या जाणिवांच्या कक्षा विस्तारायचे. विद्यापीठातल्या एका सेमिनारमध्ये उदय रोटे नावाच्या विद्यार्थ्याने आपला पेपर अतिशय प्रभावीपणे सादर केला. त्यानंतर जेवणाच्या वेळेत एकजण येऊन कांबळेंना म्हणाला, 'हा रोटे आपल्यापैकीच आहे ना?' तेव्हा कांबळेंनी लगेच जवळच असलेल्या आपल्या एका विद्यार्थ्याला जवळ बोलवून विचारणाऱ्याला सांगितले, 'हा अभिजीत देशपांडे. हाही आपल्यापैकीच आहे.' ही एकच आठवण त्यांची जातजाणीव कशी पठडीबाहेरची होती, हे सांगायला पुरेशी आहे.

शेवटचा काळ

अरुं कांबळे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक न्यायाचे राजकारण मंडलवादानंतरही फार पुढे गेले नाही. उलट ज्या ‘रामायणातील संस्कृती संघर्षांवर’ त्यांनी वादळ माजवून दिले त्याच वादातील धर्मवादी व प्रतिगामी प्रवृत्तींनीच राजकारणात जम बसविला. शेवटचे काही दिवस अरुण कांबळे राजकारणात आणि साहित्यसृष्टीत असून नसल्यासारखे होते. त्यातच त्यांचा गूढ मृत्यू झाला.[]

मृत्यू

हैदराबादच्या हुसेनसागर तलावात गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आहे. बुद्धांनी दुःखाच्या पलीकडे जा असा संदेश जगाला दिला. याच तलावात अरुण कांबळे मृतावस्थेत सापडले. दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य तसेच नामांतर आंदोलनातील अग्रणी नेते विचारवंत प्रा. अरुण कांबळे यांचा हैदराबादच्या हुसेन सागर परिसरात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन मूव्हमेंटसह अनेक संघटनांनी केली होती. ते बेपत्ता झाल्याची बातमी सांगलीत येऊन धडकली तेव्हापासून त्यांचा मित्र परिवार अस्वस्थ होता. ८८ वर्षांच्या त्यांच्या मातोश्री त्यांची महिनाभर सांगलीत वाट पहात होत्या.तेव्हा भाऊ चंद्रकांत हेही सांगलीत होते.

अरुण कांबळे यांच्या मृत्यूची बातमी सायंकाळी येथे येऊन धडकली,. तेव्हा सारेच शोकाकुल झाले. ते तातडीने मुंबईला रवाना झाले. प्रा. संपत गायकवाड म्हणाले, की अरुण यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा कणा मोडून पडला आहे. ते खंदे दलित कार्यकर्ते होते. शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा त्यांनी आयुष्यभर जोपासली. प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, की शून्यातून उभा राहिलेले अरुण अचानक निघून गेले. त्यांनी ही चळवळ आणखी पुढे नेली असती. प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, की अत्यंत हुशार, अत्यंत प्रतिभावान असलेल्या अरुण कांबळे यांच्याकडे लेखनाची अद्वितीय गुणवत्ता होती. त्यांच्याकडे बौद्धिक आणि सांस्कृतिक उंची होती.[]

चळवळीत तरुणांना प्रेरणादायी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. अरुण कांबळे यांचे नाव सर्वांत पुढे आहे. त्यांचा मृतदेह बेवारस स्थितीत सापडला. त्यांचा मृत्यू नसून हत्या असावी, असा संशय रिपब्लिकन मूव्हमेंटचे संयोजक नरेश वाहणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारतर्फे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक पाठवावे, असेही पत्रकात नमूद आहे.

त्यांच्या पश्चात दोन्ही मुले अपरांत, आशुतोष, पत्नी प्रा. अवनी कांबळे, बहीण प्रा. मंगला तिरमारे आणि आई शांताबाई कांबळे,भाऊ प्राचार्य चंद्रकांत कांबळे असा परिवार आहे.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धर्मांतराची भीमगर्जनासंशोधनप्रतिमा प्रकाशन१९९६
वाद-संवादवैचारिकप्रतिमा प्रकाशन१९९६
चिवर [][].ललितआशय प्रकाशन१९९५
युगप्रवर्तक आंबेडकर[]वैचारिकआशय प्रकाशन१९९५
रामायणातील संस्कृतिसंघर्ष[]सांस्कृतिक संशोधनपॅंथर् प्रकाशन१९८२,१९८७
चळवळीचे दिवसआत्मकथनआशय प्रकाशन१९९५
अरुण कृष्णाजी कांबळे[]काव्यसंग्रहसंकल्प प्रकाशन१९८३
मुद्रा काव्यसंग्रह प्रा. अरुण कांबळॆ स्मारक न्यास २०१०

इतर लेखन कार्य

  • आंबेडकर भारत हे अनियतकालिक सुरू केले.
  • बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता पत्रातील लेखांचे केलेले संपादन
  • सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या 'दक्षिण महाराष्ट्र' या साप्ताहिकातून स्तंभलेखन

भाषणे

  • प्राध्यापक अरुण कांबळे यांचे पनवेल येथील भाषण[].
  • प्राध्यापक अरुण कांबळे यांचे पंढरपूर येथील भाषण[]
  • प्राध्यापक अरुण कांबळे यांचे अमरावती येथील भाषण[]
  • प्राध्यापक अरुण कांबळे यांचे परभणी येथील भाषण[१०]
  • दलितांवरील माहितीपट (मुंबई:डॉ.अरुण कांबळे यांचा धारावी तील दलितांशी संवाद)[११].

संदर्भ

  1. ^ "आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय!". 2010-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रा.अरुण कांबळेंच्या निधनाने सांगलीवर शोककळा". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-02 रोजी पाहिले.
  3. ^ "चिवर part-1". 2011-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-03 रोजी पाहिले.
  4. ^ चिवर part-2 [permanent dead link]
  5. ^ a b युगप्रवर्तक आंबेडकर[permanent dead link]
  6. ^ Arun Krushnaji Kamble - poetry by Prof.Arun Kamble[permanent dead link]
  7. ^ Prof. Arun Kamble's Speech at Panvel
  8. ^ Prof. Arun Kamble's Speech at Pandharpur
  9. ^ Prof. Arun Kamble's Speech at Amaravati
  10. ^ Prof. Arun Kamble's Speech at Parbhani
  11. ^ "Mumbai's Way: Il buddismo negli slum. Visita a Daharawi con il Dr. Arun Kamble". 2012-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे