अरुण कशाळकर
पं. डाॅ. अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. अरुण कशाळकरांचे वडील ॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. अरुण कशाळकर हे गायक पं. उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधू. त्यांचे दुसरे भाऊ विकास कशाळकर हेही गायक आहेत.
अरुण कशाळकरांनी पंडित राजाभाऊ कोगजे आणि पंडित राम मराठे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आग्रा घराण्याच्या संगीताची तालीम बबनराव हळदणकरांकडून घेतली. पं.गजाननराव जोशी यांच्याकडेही अरुण कशाळकर अनेक वर्षे संगीतसाधना करीत होते.
अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे. आग्रा घराण्याच्या गायकीवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या मैफिलीत 'नोमतोम, 'बोल'. 'ताना' या आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा अनुभव येतो.
कशाळकरांनी 'रसदास' या टोपणनावाने काही बंदिशी रचल्या आहेत. '"स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या सुमारे १५० बंदिशी संग्रहित आहेत.
'विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य' या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेटसमकक्ष पदवी मिळवली आहे. त्यांनी अनेकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. अरुण कशाळकर हे संगीताच्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे शिक्षक आहेत. रवींद्र परचुरे, विशाल मोघे, मुकुल कुलकर्णी हे त्यांचे काही प्रमुख शिष्य.
एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अरुण कशाळकर हे पणजी येथे कला ॲकॅडमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या शाखेचे प्रमुख होते.
कशाळकरबुवा एकेकाळी बँकेत नोकरी करत असत. ते सध्या (२०१६ साली) मुंबईत मुलुंड येथे राहतात. ते अनेकदा सिंगापूर आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. ते सिगापूरच्या मंदिरांमधून संगीताच्या कार्यशाळाही भरवतात.
अरुण कशाळकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- वयाच्या १३व्या वर्षी शास्त्रीय गायनाच्या खुल्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक.
- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही उपाधी.
- काशी विद्यापीठाकडून संगीतरत्न ही उपाधी (मार्च २०१०).
- उज्जैनच्या महाराष्ट्र संगीत समाजाकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान.
- भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून "Impact of Gharana based Training and Successful Techniques to impart Quality Music Education" या विषयावरील संशोधनासाठी फेलोशिप.
- संगीत शिक्षक पुरस्कार (दादर-मुंबई).
- स्वरसाधना पुरस्कार (मुंबई).