अमृतवेल (कादंबरी)
अमृतवेल | |
लेखक | वि.स. खांडेकर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाउस |
प्रथमावृत्ती | १९६७ |
चालू आवृत्ती | २२वी |
पृष्ठसंख्या | १६० |
आय.एस.बी.एन. | 8177666282 |
अमृतवेल ही वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे.
वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं!"
अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई,.नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!
एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.
दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या पी.एच.डी च्या प्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं संभाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचा सल्ला देतात. विलासपूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंपॅनियन ची गरज हवी आहे, असं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आपली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासपुरास जावयास तयार होते.
विलासपूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचं तिला लक्षात येतं. वसुंधरा देवदत्ताचा विषय चुकूनही नंदासमोर काढत नसे. कॉलेजात पाहिलेली हसतमुख वसु आता तापट, चिडचिडी आणि दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाणारी यांत्रिक बाहुली झालेलं पाहून नंदा बुचकळ्यात पडली.वसुची लहानगी मुलगी मधुरा वारंवार फिट्स येण्याच्या त्रासाने त्रस्त आहे. तिच्या बाबांना म्हणजेचं देवदत्ताला ती राक्षस म्हणून संबोधते.
पालिकडच्याच बंगल्यात देवदत्त राहत असे.एके दिवशी ती त्या बंगल्यात न राहवल्याने जाते.तिथलं भव्य खाजगी वाचनालय पाहून ती आनंदून जाते.जहागिरदारांची पाहुणी म्हणून तिला कोणीही अडवत नसे.तिथल्या पुस्तकांत तिला देवदत्ताने लिहिलेली त्याची नोट्स सापडतात.त्या नोट्स वाचून तिला देवदत्ताच्या ज्ञानाची प्रचिती येते.देवदत्ताला चंचल नावाच्या हरिणीशी बोलताना ती ऐकते.या जगात मला दोनच मित्र आहेत चंचल बेटी,एक तू आणि दुसरा मृत्यु".तिथेच नंदा आणि देवदत्ताची ओळख होते.देवदत्ताची वेगळी बाजू पाहून नंदा अचंबित होते.देवदत्त आणि वसु मधील वादाचे कारण नक्की काय होतं,याचा शोध ती घेऊ लागते.देवदत्ताशी तिचे बोलणे वाढत जाते.वसु या गोष्टीमुळे नंदाचा तिटकारा करू लागते.कालांतराने वसुही तिला तिची बाजू सांगते.देवदत्ताचे वडील आणि आई यांचे रहस्य उलगडल्यावर आतापर्यंत धूसर असलेलं भीषण सत्य तिला दिसू लागत.कोणी एक कोणाचा दोषी नसून सर्वच या गुंत्याला कारणीभूत आहेत,हे नंदाच्या लक्षात येते.नंदा हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करते.
मी कथानक अगदी मोजक्या शब्दात वर मांडलं आहे.कादंबरी वाचताना पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.या कथेचा संपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे.अनपेक्षित असे रहस्य वाचकांना अचंबित करून सोडते.तसेच यातील पात्रे माणसाच्या स्वभावाचे विविध पैलूंचं दर्शन घडवतात.यातील लहानमोठी सर्वच पात्रे आपलीशी वाटतात, विचार करायला भाग पाडतात. विलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी, गड अश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात.हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्या सर्वच संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धत दिसून येते.शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवेल असं कथानक यात रचलं आहे.लालित्यपूर्ण भाषा खासकरून संभाषण आणि अलंकारांनी नटलेलं निसर्गवर्णन हे या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.