अमा अता अयडू
अमा अता अयडू (२३ मार्च १९४२). मूळ नाव क्रिस्तीना अमा अता अयडू. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झालेली, प्रशंसनीय साहित्यिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्त्व. तिच्या लिखाणातले आधुनिक आफ्रिकन लोकांच्या विरोधाभासी स्थितीबद्दल, विशेषतः आफ्रिकन महिलांच्या स्थितीबद्दलचे नवे दृष्टिकोन प्रसिद्ध आहेत. अयडूचा जन्म मध्य घानातील आबेडझी क्यियाकोर ह्याफॅटी गावातील एका राजघराण्यात झाला. त्या काळी आताचे घाना हे द गोल्ड कोस्ट ह्या औपनिवेशिक नावाने संबोधले जायचे. अयडूच्या उच्चस्तरीय राहणीमानातून आलेली मूलतत्वे तिच्या शैक्षणिक आणि इतर कारकीर्दीत दिसून येतात
तिचे शालेय शिक्षण केप कोस्टमधील वेस्ले गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आणि लेगॉनमधील घाना विद्यापीठात १९६१ ते १९६४ ह्या काळात तिने पुढील शिक्षण घेतले. विद्यापीठात असताना आयडूने विद्यापीठाच्या नाटक आणि लेखकांच्या कार्यशाळेत काम केले. येथे तिच्या पहिल्या दोन नाटकांचा आणि लघुकथांचा संग्रह तयार झाला. त्यानंतर तिने अनेक प्रकारच्या लिखाणास सुरुवात केली. त्याचबरोबर आयडू पश्चिम व पूर्व आफ्रिका आणि अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने देत असे. १९७४ ते १९७५ याकाळात फेल्प्स-स्टोक्सफंडच्या एथनिक स्टडीज प्रोग्रामच्या वॉशिंग्टन ब्युरोत सल्लागार-प्राध्यापक म्हणून तिने काम केले आहे. तिच्या लेखन कारकिर्दीसोबत तिने घानाच्या राजकारणातही भाग घेतला. १९८२ साली जेरीरा व्हलिंग्ज सरकारच्या अंतर्गत घाना येथे शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी तिने सांभाळली आहे.
अमा अता अयडूची साहित्य संपदा : नाटक – द डिलेमा ऑफ अ घोस्ट (१९६५), अनोवा (१९७०) ; कथा – नो स्वीटनेस हेअर (१९७०), द ईगल अँड द चिकिन्स (१९८६, बालकथा), द गर्ल हू कॅन अँड अदर स्टोरीस (१९९७), डिप्लोमॅटिक पौंड्स अँड अदर स्टोरीस (२०१२); कादंबरी – आवर सिस्टर किल्लजॉय; ऑर, रेफ्लेकशन्स फ्रॉम अ ब्लॅक – आईड स्क्विन्ट (१९७७), चैनजेस: अ लव्ह स्टोरी (१९९१); कवितासंग्रह – बर्डस अँड अदर पोएम्स (१९८७), अन अँग्री लेटर इन जानूअरी अँड अदर पोएम्स (१९९२) इत्यादी.
लेखिका म्हणून तिची पहिली नोंद द डिलेमा ऑफ अ घोस्ट नावाच्या एका प्रॉब्लेम प्लेने (एका समस्येवर आधारित असलेले नाटक) झाली. ह्या नाटकात घरी परतणारा एक घानाचा विद्यार्थी आपल्या आफ्रिकन अमेरिकन पत्नीला पारंपरिक आफ्रिकन संस्कृतीत पहिल्यांदा आणतो आणि त्याचे विस्तारित कुटुंब त्याला बंधनकारक वाटू लागते. ह्या कुटुंबाच्या कोंडीच्या वर्णनातून अयडूची विशिष्ट लेखनशैली दिसून येते. ज्यामध्ये ती परदेशात शिकणाऱ्या व राहणाऱ्या आफ्रिकन लोकांच्या निश्चयांची नैतिक तुलना करते. नो स्वीटनेस हेअर नावाच्या एका लघुकथासंग्रहात अयडूनी कथाकथन आणि कथाकथनेतल्या मौखिक परंपरेबरोबर प्रयोग केले. ह्या संग्रहातल्या कथा मोठ्याने वाचून सांगण्याच्या हेतूने लिहिल्या आहेत. आयडूची परदेशात स्थायिक असलेल्या आफ्रिकन लोकांवरील टीका, जी आधी द दिलेमा ऑफ अ घोस्ट मध्ये दिसून आली, ती परत तिच्या प्रायोगिक आवर सिस्टर किल्लजॉय; ऑर, रेफ्लेकशन्स फ्रॉम अ ब्लॅक – आईड स्क्विन्ट ह्या कादंबरीत मांडते. आवर सिस्टर किल्लजॉयच्या सीसी ह्या पात्राप्रमाणे अयडूने स्वतः कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठाची फेलोशिप जिंकली आणि मग घानाच्या केप कोस्ट येथे शिकवण्यासाठी परतली. त्यानंतर अयडूने अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि केन्यातील विविध ठिकाणी प्राध्यापकत्व स्वीकारले. त्यामुळे या कादंबरीतील काही भाग आत्मचरित्रात्मक असल्याच दिसून येते. कादंबरीतील प्रमुख पात्र सीसी हिच्या दृष्टिकोनातून अयडू स्वातंत्र्यानंतरही औपनिवेशिक विचारसरणीच्या मानसिक गुलामगिरीची नोंद घेते. घाना येथील सीसी नावाची एक तरुण स्त्री राज्य पुरस्कृत भेटींसाठी युरोपला प्रवास करते. तेथे तिची भेट औपनिवेशिक विचारांच्या युरोपियन लोकांशीच नव्हे तर स्थायिक आफ्रिकन लोकांशी देखील घडते. ह्या भेटींमध्ये सीसीला आफ्रिका आणि आफ्रिकन लोकांचे अवमूल्यन करणाऱ्या प्रबळ वैचारिक प्रवाहांचा प्रतिकार करावा लागतो.
अयडू तिच्या कथा आणि नाटकामधून महिलांच्या सामाजिक भूमिकेवर आणि जातीयवादी समाजातील व्यक्तींवर असलेल्या पाश्च्यात्य प्रभावाची टीका करते. अयडूच्या साहित्यिक कृती घानाच्या औपनिवेशिक इतिहासावर आणि घानाच्या नियो-कॉलोनीयल (नववसाहतवाद) वर्तमानकालाबद्दल स्पष्टपणे टीका करतात. ह्या कारणाने अयडूचे साहित्य पोस्टकॉलोनीयल (उत्तर वसाहतवादी) म्हणून वर्गीकृत केले जाते. पाश्चात्य शिक्षण आणि प्रभाव आफ्रिकन स्त्रियांना मुक्ती देतात हा युक्तिवाद अयडूनी तिच्या लिखाणातून अनेकदा नाकारला आहे. तिच्या कथा आणि कारकिर्दीतून तिने स्त्रियांच्या शोषणाकडे देखील आपल्या वाचकांचे लक्ष वळवले, जेथे युद्ध आणि बेरोजगारीने पतीविरहित झालेल्या स्त्रिया कुटुंबाचे प्रमुख म्हणून आपल्या बाळांना लहानाचे मोठे करतात.
अयडूला तिच्या साहित्यिक आणि सामाजिक राजकीय योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कॉमनवेल्थ लेखक पुरस्कार (१९९२) सर्वोत्कृष्ट पुस्तक, आफ्रिका (चैनजेस..२०१७) अशा पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अमा अता अयडूसेंटर फॉर क्रिएटिव्ह रायटिंग (अयडू सेंटर) ह्याचे उदघाटन आफ्रिकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ कॉम्म्युनिकेशन्स कोजो यांखा येथे करण्यात आले आहे. हे केंद्र पश्चिम आफ्रिकेमध्ये अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे. अयडूने तिच्या प्रत्येक लेखनकार्यात घानातील अत्याचार आणि असमानतेचे वर्णन व टीका केली आहे आणि घानातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.