Jump to content

अमरकोश

अमरकोश ऊर्फ नामलिंगानुशासन हा अमरसिंह कवीने तयार केलेला संस्कृत शब्दसंग्रह (thesaurus) आहे. इंग्रजीप्रमणेच संस्कृतमध्ये नामे पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा आणि नपुंसकलिंग यांपैकी एका वा अधिक लिंगांत असतात. या कोशात संस्कृतभाषेतील समानार्थी नामे त्यांच्या लिंगांसह येतात. ही नामे सुमारे १५०० श्लोकात रचली आहेत.

रचनाविशेष

अमरकोशाचे उद्दिष्ट समानार्थी नामांची शब्दांची माहिती देणे हे असल्याने ती माहिती देण्यासाठी समानार्थी शब्दांचे अर्थाच्या व लिंगाच्या आधारे गट करण्यात आले असून प्रत्येक गटातील शब्दांची लिंगे सांगण्यासाठी काही कॢप्त्या योजण्यात आल्या आहेत.

  • सामान्यतः शब्दाच्या लिंगानुसार होणाऱ्या रूपभेदानुसार शब्द दिले आहेत. उदा० विसर्ग म्हणजे पुल्लिंग, आकारान्त म्हणजे स्त्रीलिंग आणि अनुस्वारान्त म्हणजे नपुंसकलिंग.
  • काही ठिकाणी इतर शब्दाच्या साहचर्याने म्हणजे तो शब्द इतर कोणत्या शब्दांसोबत दिलेला आहे त्यानुसार त्या शब्दाचे लिंग कळते.
  • काही ठिकाणी त्या शब्दाचे लिंग विशेषत्वाने शब्द वापरून स्पष्ट केले आहे.

लिंगांमधील भेद स्पष्ट करून सांगण्यासाठी क्रमाने येणाऱ्या शब्दांत द्वन्द्व समासाचा वा एकशेष वृत्तीचा वापर करण्यात आलेला नाही.

शीर्षकांचा वापर

संस्कृत भाषेतील जे शब्द तीनही लिंगांत वापरण्यात येतात त्यांचे स्पष्टीकरण देताना त्रिषु (तिन्हींत) असे पद वापरण्यात आले आहे. जे शब्द स्त्रीलिंगात आणि पुल्लिंगात अशा दोन्ही लिंगांत वापरण्यात येतात त्यांचे स्पष्टीकरण देताना द्वयोः असे पद वापरण्यात आले आहे. जिथे शब्द तिन्ही लिंगांपैकी दोन लिंगांत वापरण्यात येतो तिथे ज्यात तो वापरण्यात येत नाही त्याचे निषेधार्थक पद (उदा. अस्त्री = स्त्रीलिंगाव्यतिरिक्त) योजून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्यांच्या शेवटी तु हे पद येते किंवा ज्यांच्या सुरुवातीला अथ हे पद येते त्या शब्दांचा आधीच्या शब्दांच्या लिंगांशी संबंध नसतो.

अमरकोशाचे विभाग

अमरकोशाचे तीन विभाग आहेत. त्यांना काण्ड अशी संज्ञा आहे.

  1. स्वर्गादिकाण्ड
  2. भूम्यादिकाण्ड
  3. सामान्यकाण्ड

अमरकोशावरील टीकाग्रंथ

अमरकोशावर ४०पेक्षा अधिक टीकाग्रंथ आहेत. उदा०

  • अमरकोषपञ्जिका तथा पदार्थकौमुदी (नारायणशर्मा)
  • अमरकोषमाला (परमानंद)
  • अमरकोषव्याख्या (राघवेन्द्र)
  • अमरकोषव्याख्या (रामशर्मा)
  • अमरकोषोद्घाटन (अमर-कोष-उद्घाटन) - भट्टक्षीरस्वामी
  • अमरकौमुदी (नायानंद रामचंद्र)
  • अमरपदपरिज्ञात (मल्लिनाथ)
  • अमरबोधिनी (मुकुन्दशर्मा)
  • अमरविवेक (महेश्वर)
  • अमरवृत्ति (रामस्वामी)
  • काशिका (काशीनाथ)
  • क्रियाकलाप (आशाधर)
  • गुरुबालप्रबोधिनी (मञ्जुभट्ट)
  • त्रिकाण्डचिंतामणि (रघुनाथ चक्रवर्ती)
  • त्रिकाण्डविवेक (रामनाथ)
  • बालबोधिनी (गोस्वामी)
  • बुधमनोहर (महादेवतीर्थ)
  • मुग्धबोध (भरतमल्लिक तथा भरतसेन)
  • वैषभ्यकौमुदी (रामप्रसाद)
  • व्याख्याप्रदीप (अच्युतोपाध्याय)
  • व्याख्यासुधा अथवा रामाश्रमी(भानुजिदीक्षित द्वितीय)
  • शब्दार्थसंदीपिका (नारायण विद्याविनोद)
  • सारसुंदरी (मयुरेश विद्यालङ्कार)
  • सुबोधिनी (नीलकंठ)
  • (अपूर्ण यादी)

लेखक

असे म्हणतात की अमरसिंह कवी हा राजा चंद्रगुप्ताच्या नवरत्नांपैकी एक होता. हा राजा अमोघवर्षाच्या(?) काळात होता असे समजले जाते.<ref>[१]/ref>

पुढील संस्कृत श्लोक वाचा -

कवेरमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला।
आच्चन्द्रतारकंस्थेयान्नामलिङ्गानुशासनम्॥

अर्थ- अमरसिंहकवीची सुनिर्मळ अशी ही कृती व्याकरणाच्या नियमांनी बद्ध व कायम टिकणारी आहे.

अमरकोशाच्या मुद्रावृत्त्या

बाह्य दुवे

संदर्भ