अभीप्सा
पूर्णयोग आणि अभीप्सा
पूर्णयोगी श्रीअरविंदांनी ऊर्फ अरविंद घोष यांनी Aspiration ला अभीप्सा हा शब्द दिला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फान्सा यांनी प्रतिपादित केलेल्या पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये अभीप्सा (Aspiration), नकार (Rejection) आणि समर्पण (Surrender) या त्रिसूत्रीस अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अभीप्सा म्हणजे काय
- श्रीअरविंदांच्या मते 'अभीप्सा' म्हणजे ईशशक्तीला केलेले आवाहन. सर्वोच्च शक्तीने आपल्यापर्यंत यावे म्हणून हे आवाहन असते. ती दिव्यतेला दिलेली साद आहे.
- अभीप्सा ही स्थिर, अखंड, दक्ष आणि नित्य दिव्यासारखी प्रकाशित हवी. तिला बुद्धी आणि भावना यांची सोबत हवी. बुद्धीने अभीप्सा ज्ञानमार्गी बनते. भावनेने अभीप्सा भक्तिमार्गी होते. बुद्धीने सतत व्यष्टीला आणि समष्टीला शोधीत राहावे. स्वभावाला आणि अभ्यासाला यत्नशील राखण्यात बुद्धी हे ईश्वरी वरदान आहे. त्यामुळे अकारण क्षुद्र ताठरपणा आपल्यात येत नाही. समृद्ध अभीप्सा अध्यात्म विकासाला पोषक ठरते. अभीप्सेचे वैशिष्टय असे आहे; अभीप्सा शब्दांवर अवलंबून नसते. शब्दांच्या साहाय्याशिवाय अभीप्सा कार्य करते. अभीप्सा मौनातही खुलते आणि बोलण्यातून व्यक्त होते. मात्र अभीप्सेचे श्रद्धेवाचून अडत नाही. अश्रद्ध अभीप्सा बाळगू शकतात. ईश्वरावर श्रद्धा नसलेले जगाच्या कल्याणाकरिता झटतात. त्यांच्या तळमळीत श्रद्धा असते. म्हणून ते जरी देवाला विसरले तरी देव त्यांना विसरत नाही. या साऱ्यात अभीप्सा अंतज्र्योतीसारखी आहे. निसर्गालासुद्धा अभीप्सा आहे. मात्र एक निश्चित, अभीप्सा प्रयत्नांनी मिळवावी लागते.
- अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंतःकरणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.[१]
- परम साहसाची आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते. ‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.[२]
संदर्भ
- auromarathi.org