Jump to content

अभिव्यक्तिवाद

अभिव्यक्तिवाद (Expressionism/एक्सप्रेशनिझम): कोणत्याही विषयाचा कलावंताला जो अंतःप्रत्यय येतो, त्याची प्रामाणिकपणे केलेली सारमय अभिव्यक्ती. एकाच कलाविषयाचा अंतःप्रत्यय भिन्नभिन्न कलावंतांना भिन्नभिन्न प्रकारे येऊ शकतो. तो अंतःप्रत्यय कलाविषयाच्या इंद्रियगोचर वास्तविक स्वरूपाहून वेगळा असू शकतो. हे वेगळेपण व्यक्त करण्याकरिता वास्तविक विषयाचे चित्रण वा आविष्कार वास्तविकापासून दूर गेलेला असतो. या आविष्कारात मूळ स्वरूप अंशतः असते, किंवा बदललेले असते, वा त्यात भर पडलेली असते, किंवा तो आविष्कार पुष्कळदा विपरीतही असतो. हा भेद वा दूरत्व वा अधिक भर वा वैपरीत्य किंवा वैलक्षण्य कलावंताच्या अंतःप्रत्ययाला मूर्तिमंत करतो. कलाविषयाच्या वास्तविक स्वरूपाला तो पूर्णतः बाजूला सारत नाही.  वास्तविक विषयाचा उत्कट भावनात्मक प्रत्यय कलारसिकाला येऊन तो कलाविष्कार त्यास पटतो. अशा प्रकारची अभिव्यक्तिवादी आविष्करणे चित्रकलेप्रमाणेच मूर्तिकला, वास्तुकला, संगीत व ललित साहित्य यांतही आढळून येतात.