अभय बंग
अभय बंग | |
---|---|
जन्म | सप्टेंबर २३, इ.स. १९५० वर्धा, महाराष्ट्र |
निवासस्थान | शोधग्राम, गडचिरोली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम.बी.बी.एस., एम.डी., एम.पी.एच |
प्रशिक्षणसंस्था | जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, अमेरिका |
पेशा | वैद्यकीय |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९८५ पासून |
जोडीदार | राणी बंग |
अपत्ये | आनंद, अमृत |
वडील | ठाकुरदास |
आई | सुमन |
पुरस्कार | महाराष्ट्रभूषण |
संकेतस्थळ http://www.searchgadchiroli.org/ |
अभय बंग (सप्टेंबर २३, इ.स. १९५० - हयात) हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
बालपण
अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
उच्च शिक्षण
त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
वैयक्तिक आयुष्य
डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे दोघेही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते. त्या दोघांनी प्रेमविवाह केला. डॉक्टर राणी बंग यांच्या घरून यास विरोध होता परंतु शेवटी त्यांना लग्नासाठी घरून परवानगी मिळाली. डॉक्टर झाल्यावर वर्ध्याजवळच्या कान्हापूर आणि महाकाळ या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती. परंतु सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून चेतना विकास ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले. त्यांना दोन मुले असून मोठ्याचे नाव आनंद आणि छोट्याचे अमृत आहे. विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
कार्य
१. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :-
"अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते. अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. २. नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-
३. स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन :-
अमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर लॅनसेट मध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ अशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली. ४. सिकल सेल अनिमियावरील संशोधन
५. इ.स. १९८८ साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
संशोधन
रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर ४ रुपये नसून १२ रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला. अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी अभय बंग प्रसिद्ध आहेत. पी जी.आय. मध्ये प्रथम क्रमांक मिळवूनही त्यानी पी.जी.आय. सोडली याचे कारण त्यांना तेथील संशोधनात 'सामाजिक संबंध' सापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यानी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर 'लोकांसोबत संशोधन' हे अभय बंग यांचे सूत्र आहे.
ब्रेथ काउंटर
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि लॅन्सेटमध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या पुढे मोजू न शिकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
कोवळी पानगळ
गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर डॉ. अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला "कोवळी पानगळ" हा शोधप्रबंध खूप गाजला होता. हा शोधप्रबंध 'लॅन्सेट' या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला होता. या शोधप्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आपले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
प्रभाव
'गांधीजी', 'लोक' आणि 'विज्ञान' ह्या अभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंगांवर प्रभाव आहे. "लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले प्रश्न घेऊन जाऊ नका, लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायचा प्रयत्न करा" हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूप लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यापूर्वी ती अनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची अमेरिकन लोकांची जिद्द त्यांना प्रभावित करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग पतिपत्नींची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजावून देताना उपयोग करतात.
प्रकाशित साहित्य
पुरस्कार
डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
- २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
- २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
संदर्भ
- शोध आरोग्याचा - 'कार्यरत' (पुस्तक), १९९७ मॅजेस्टिक प्रकाशन - लेखक - अनिल अवचट
- 'माझा साक्षात्कारी हृदयरोग (पुस्तक), राजहंस प्रकाशन, जानेवारी २००२ - लेखक - अभय बंग
- खरेखुरे (लेखसंग्रह), युनिक फीचर्स, २००६, संपादक सुहास कुलकर्णी, ' डॉ. अभय - डॉ. राणी बंग', लेखक श्रुती पानसे, पाने ११ ते १९
बाह्य दुवे
- ’सर्च’चे अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-02-25 at the Wayback Machine.
- एम.एच-३१ संकेतस्थळावरील अभय व राणी बंग यांच्यावरील लेख
- 'रिअल हीरोज' जीवनगौरव पुरस्कार Archived 2012-01-21 at the Wayback Machine.
- निर्माण २.२ मध्ये शिक्षणाबद्दल अभय बंग यांचे मत
अभय बंग यांचे लेख
- जीवनाचा मार्ग कसा निवडू Archived 2010-05-24 at the Wayback Machine.
- आदिवासी व स्वराज Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- महात्म्याशी भेट Archived 2010-05-24 at the Wayback Machine.
- तरुणाईचे दिवस - दादा धर्माधिकारी सोबत Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- मोजक्यांना वैद्यकीय शिक्षण का सर्वाना आरोग्य स्वराज Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- दारूमुक्तीसाठी नव्या धोरणाकडे Archived 2010-05-24 at the Wayback Machine.
- शिक्षणाचे जादुभरे बेट Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- सेवाग्राम ते शोधग्राम Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- दारूविषयी आधुनिक पाश्चात्त्य Archived 2010-05-25 at the Wayback Machine.
- मुख्यमंत्र्यांना दारूविरोधात पत्र Archived 2010-05-24 at the Wayback Machine.
- धान्यापासून दारू - शेतकऱ्याच्या विकासाचा भ्रम आणि विकासाची मृत्युघंटा Archived 2016-03-04 at the Wayback Machine.