अभंग
अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हे एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।
तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३व्या शतकातील नामदेव-ज्ञानेश्वरांपासून ते १७व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी अभंगरचना केली आहे. संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराज केवळ या दोन संतांचे अभंग ४००० च्या वर असून यात निरनिराळे विभाग करण्यात आलेले आहेत. कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे माहात्म्य सांगितले जाते. आधुनिक काळातही केशवसुतांपासून मर्ढेकर-करंदीकर व त्यापुढच्या पिढीतील दिलीप चित्रे व अरुण कोलटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. अभंगाचे वृत्त वापरून सामाजिक सुधारणेची व सत्यधर्माची शिकवण देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड लिहिले. तेही अभंगाचेच वेगळे रूप होय. प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वासाठी भक्तिमार्ग या माध्यमातून अभंगाचे रूप खुले करून दिले. कीर्तनामध्ये अभंगांद्वारे जनप्रबोधन केले जाते. रामदासांचे अभंग श्रीराम विषयक आहेत. जसे: समुदाय काय सांगों श्रीरामाचा अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी
महानुभाव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तिमुद्रा असे म्हणले आहे.(लीळाचरित्र ४२४.) इतिसासाचार्य राजवाडे यांनी अभंगांचे १. प्रतिष्ठा २. उष्णिग ३. सुप्रतिष्ठा ४. बृहती व ५.जगती असे काही भेद सांगितले आहेत.
प्रसार
अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत तामिळनाडूत चांगलाच प्रसार झालेला आहे.[१] भारताच्या दक्षिण भागात कन्नड आणि तेलुगू भाषेतही अभंग आढळून येतात. पुधील गयक अभंग गायनासाठी प्रसिद्ध आहेत. सुंदरा स्वामीगल, प्रख्यात मृदुंगवादक नारायणस्वामी आप्पा, रामदोस स्वामी (दोस स्वामीगल), तुकाराम राव आणि टी. एस. वेंकोबा नाईग. तसेच अरुणा साईराम, ओ. एस. अरुण, रंजनी-गायत्री भगिनी आणि तुकाराम गणपती महाराज हे ही प्रसिद्ध आहेत.
पुस्तके
अभंग विषयक अनेक पुस्तके आहेत.
- अभंग आस्वाद पुस्तक माला - श्रीवामनराज प्रकाशन
- अभंगशतक - श्रीवामनराज प्रकाशन
बाह्य दुवे
- संत एकनाथ Archived 2013-06-19 at the Wayback Machine.
- नामदेवाचे अभंग Archived 2011-08-14 at the Wayback Machine.
- ^ "सांगतो ऐका : बहरला अभंग तंजावुरी". Loksatta. 2020-08-09. 2021-05-05 रोजी पाहिले.