अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये
विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन वाद्ये विकसित केली जात आहेत. तसेच प्रचलित वाद्यांमध्ये आवश्यक बदल होऊ लागले आहेत. आपल्या वाद्यसंस्कृतीमध्ये परंपरागत चालत आलेली अनेक वाद्ये आहेत. ज्या त्या काळात संबंधित वाद्यांना विशेष महत्त्व असे. त्यांना त्याकाळचे प्रमुख वाद्य म्हणूनही ओळखले जायचे. संस्कृतीचा एक घटक म्हणून त्यांचा अभ्यास केला जायचा. मात्र, आज अशी वाद्ये काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागली आहेत. संगीतप्रेमी मंडळी अशा वाद्यांचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज परंपरागत किंवा प्राचीन वाद्यांचे अस्तित्व केवळ सांस्कृतिकोश आणि वस्तुसंग्रहालये इत्यादी ठिकाणीच राहिल्याचे पाहायला मिळते.
सर्वांत जुन्या वाद्यांना प्राथमिक वाद्ये असे म्हणले जाते. वाद्यांच्या इतिहासानुसार प्राथमिक वाद्ये ही प्राचीन आहेत आणि आजही जगातील वेगवेगळ्या भागांतील आदिवासी जमातींत ती प्रचारात आहेत. आद्य प्राचीन संस्कृतीत प्रचारात असलेल्या पण आज नष्ट झालेल्या वा परिष्कृत रूपात अस्तित्वात असलेल्या अशा दोन्ही प्रकारांतील वाद्यांची गणना प्राचीन या सदराखाली करता येईल. पहिल्या वर्गात जास्त वाद्ये आघाती व घनवाद्ये आहेत. निरनिराळ्या जमातींच्या नृत्यप्रसंगी त्यांचा वापर होत असावा. खुळखुळणारी, हलवून वाजविण्याची (वाळक्या शेंगा, भोपळे वगैरेंसारखी वाद्ये), घर्षणाची (करकऱ्यासारखी) एकमेकांवर आपटून वाजविण्याची (करताल, चिपळ्या यांसारखी), हाताने आघात करून वाजविण्याची (निरनिराळ्या आकारांचे ढोल, किंवा खंजिऱ्यांसारखी), काठ्यांनी वाजविण्याची (नगारा, ताशा यांसारखी) लयवाद्ये आणि निरनिराळ्या स्वरांत लावलेल्या लाकडी पट्ट्यांची, दगडी तुकड्यांची, घंटांची, झायलोफोन (आजही प्रचारात असलेले), मारिंबा, सांसा, पियेनचिंग यांसारखी स्वरवाद्ये, किसोर ओंबी, नांगा यांसारखी मूळ धनुष्यापासून निघालेली ततवाद्ये आणि तोंडाने किंवा नाकाने फुंकून वाजविण्याची, जिव्हाळीची, हरतऱ्हेची सुषिर वाद्ये प्राथमिक वाद्यांत होती. काही अद्यापही रुढ आहेत. आदिमानवाच्या संगीताच्या प्राथमिक गरजा या वाद्यांमुळे पुऱ्या होत असाव्यात. वेदकाळात भूमिदुंदुभी हे प्राचीन वाद्य प्रचारात होते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=yllaoRTSqvO1nCYYIFvMYbYkhCnMTWVcSx4gX03APVdVcmhDH7y4cw==[permanent dead link] ची कॅश आहे. 22 Oct 2009 01:07:02 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती