Jump to content

अन्वर जलालपुरी

अन्वर जलालपुरी(६ जुलै, १९४७, जलालपूर, उत्तर प्रदेश, भारत, २ जानेवारी, २०१८) हे उर्दू शायर होते. त्यांचे उर्दू, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते.

शिक्षण

त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी १९६८ मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच अवध विद्यापीठातून उर्दू विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवली. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून अदिब-ए-कामिल ही पदवी मिळवली. पुढे जलालपूर मधील नरेंद्रदेव इंटर कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

साहित्यातील योगदान

त्यांनी अनेक गजला लिहिल्या.शायरीमधून समाजात शांतता आणि बंधुभाव नांदावा, असा संदेश त्यांनी दिला. भारतातील 'गंगा-जमनी' संस्कृतीचे ते पुरस्कर्ते होते. १९६३ पासून तरुण वयातच त्यांनी मुशायऱ्यांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्षे विविध ठिकाणी मुशायऱ्यांचे मंच संचालन केले म्हणजेच नाझीम म्हणून काम केले. मीर, मिर्झा गालिब आणि इकबाल या शायरांचा त्यावर प्रभाव होता. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्य संग्रहाच्या आणि भगवद्गीतेच्या उर्दू अनुवादासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. भगवद्गीतेचा उर्दू अनुवाद त्यांनी देवनागरी आणि उर्दू दोन्ही लिप्यांमध्ये छापून घेतला. कुराणाच्या तिसाव्या परिच्छेदाचा सुद्धा त्यांनी अनुवाद केला.

शिक्षणातील योगदान

उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष असताना अभ्यासक्रमात इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान, गृह विज्ञान यांचा समावेश करून त्यांनी हा अभ्यासक्रम आधुनिक बनवला.

दूरचित्रवाणी, चित्रपटातील योगदान

अकबर द ग्रेट या दूरचित्रवाणी मालिकेसाठी त्यांनी संवादलेखन आणि गीतलेखन केले. देढ इश्किया या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती.

पुस्तके

त्यांनी सुमारे २० पुस्तके लिहिली. त्यापैकी काही:

  • रहराऊ से रह्नुमा तक
  • उर्दू शायरी में गीता
  • उर्दू शायरी में गीतांजली
  • अपनी धरती अपने लोग
  • खुशबू की रीश्तेदारी
  • जागती आंखे
  • खारे पानियो का सिलसिला

पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (२०१८) मरणोत्तर
  • यश भारती हा उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला.
  • उत्तर प्रदेश उर्दू अकादमीचा पुरस्कार
  • मध्य प्रदेश उर्दू अकादमीचा पुरस्कार
  • मीर अकादमीचा पुरस्कार
  • हिंदी साहित्य संमेलनाचा पुरस्कार
  • बझ्म-ए-उर्दू अदब पुरस्कार

सदस्य

ते खालील समित्यांचे सदस्य होते.

  1. उत्तर प्रदेश हाज समिती
  2. उत्तर प्रदेश उर्दू अकादमी
  3. उर्दू-अरेबिक-पर्शियन विद्यापीठ अकादमी
  4. उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष

संदर्भ यादी

[]

  1. ^ अन्वर जलालपुरी यांच्या रचना
  2. ^ अन्वर जलालपुरी यांची मुलाखत [१].