Jump to content

अनुराधा वैद्य

अनुराधा शशिकांत वैद्य (जन्म : इ.स. १९५५; - २४ ऑगस्ट, इ.स.२०१६) या एक मराठी लेखिका होत्या.

त्यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात हिरीरीने काम केले होते. घरात एकूण ७ भावंडे, म्हणजे २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. शिक्षण संपल्यासंपल्या अनुराधा यांचे लग्न डॉ. गणपतराव वैद्य आणि इंदिराबाई वैद्य यांचा मुलगा शशिकांत वैद्य यांच्याशी झाले आणि मग त्या लग्न, संसार, शेती-भाती, गुरे-ढोरे, प्राणी आणि शिवणकला, पाककला, गायन इत्यादींत रमल्या. शाळा-कॉलेजात खरे तर लेखनाची सुरुवात होते, पण अनुराधा वैद्यांची लिखाणाची सुरुवात वयाच्या ३५व्या वर्षी झाली. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद, जळगाव, पुणे आकाशवाणीसाठी लेखन करायला सुरुवात केली.

जयपुर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी यांच्या त्या मावशी लागतात.

वैद्य कुटुंबाचा औरंगाबादच्या खडकेश्वर भागात एक एकरात बंगला होता. तिथे बंगल्यात वैद्यमंडळी हौसेने शेती करत असत. मग त्यांनी बाग तयार केली. त्या दरम्यान शेळी, कुत्री, मांजरी असे विविध प्रकारचे प्राणी पाळले. या सर्व प्राण्यांचे करताना अनुराधा वैद्यांना लिहायला, वाचायला वेळ मिळत नव्हता. पण त्याचवेळी त्यांनी अमरेंद्र मासिकासाठी `वनवास हा सुखाचा’ ही कथा लिहिली. त्यांच्या प्राणी पाळण्यावरच ती कथा बेतलेली होती. ती कथा छापून आल्यावर लोकांना ती कथा आवडली, आणि त्या कथेला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मग अनुराधा वैद्यांच्या लेखनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

नियतकालिकांतले लेखन

अनुराधा वैद्य यांनी लेखनाची सुरुवात विनोदी कथांनी केली. `मोहिनी`, `श्यामसुंदर’, `माहेर’, `जत्रा’ अशा मासिकांमध्ये अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. विनोदी लेखनासाठी राज्य शासनाचा पहिला पुरस्कार त्यांना `अजुनी खुळा हा’ या विनोदी कथासंग्रहासाठी मिळाला. त्यानंतर मात्र खूप विनोदी लेखन केल्यानंतर मग त्या गंभीर लिखाणही करू लागल्या. मग कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका लेखनास सुरुवात झाली. चौफुला, श्वानप्रस्थ या कादंबऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. `माध्यम’ कादंबरीला पहिला ना. सी .फडके पुरस्कार मिळाला. कुत्रे, मांजरे, ससे, हरिण, पोपट काही प्राणी त्यांच्या घरात आणि घराच्या परिसरात होते. हे अनेकविध पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रे त्यांचे करता करता अनुराधा वैद्य यांनी स्वतःच्या अनुभवावर `श्वानप्रस्थ’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी विशेष गाजली.

काव्यांबरी

अनुराधा वैद्य यांनी मराठीत पहिल्यांदाच गद्यकाव्य रूपात एक कादंबरी लिहिली. तिचे नाव ’माझी चिंध्यांची बाहुली’. दत्तक आई-मुलीची ही काव्यकथा समीक्षकांना फार आवडली. या साहित्य प्रकाराला अनुराधा वैद्य काव्यांबरी म्हणत.

अनुराधा वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके (४३हून अधिक)

  • अजुनी खुळा हा (विनोदी कथासंग्रह)
  • अंतर (कथासंग्रह)
  • अस्तित्वरेषा (कथासंग्रह)
  • आजन्म
  • उजेडाचं दार (कादंबरी)
  • काजळ (कथासंग्रह)
  • गारूड
  • गुंफण (ना.घ. देशपांडे यांची याच नावाची एक कादंबरी आहे.)
  • चांदवा (कादंबरी)
  • चित्रफल
  • चौफुला (कादंबरी) (हिंदीतही अनुवाद झालेली कादंबरी)
  • जोगवा (कादंबरी)
  • तीन चमचे प्रोत्साहन (विनोदी कथा)
  • देहस्थ
  • निमिष
  • पंख (संकीर्ण लेखसंग्रह)
  • प्रवाह
  • बाकी क्षेम (कथासंग्रह)
  • भूमिका
  • मन जाई दिगंतरा
  • मनुष्यहाट (कथासंग्रह)
  • माझी चिंध्यांची बाहुली (काव्यांबरी)
  • माध्यम (हिंदी कादंबरी)
  • राणीवसा
  • विसर्जन (कथा)
  • श्वानप्रस्थ (कादंबरी)
  • सुमी आणि सोन्या (बालसाहित्य)
  • क्षणकाल (कादंबरी)

पुरस्कार आणि सन्मान

  • विनोदी लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार (’अजुनी खुळा हा’ या विनोदी कथासंग्रहासाठी)
  • `माध्यम’ कादंबरीला पहिला ना.सी फडके पुरस्कार मिळाला.
  • २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • अशोक उत्तमराव घोळवे यांनी अनुराधा वैद्य यांच्या साहित्यावर "सौ.अनुराधा वैद्य यांचे साहित्य : एक चिकित्सक अभ्यास" नावाचा ग्रंथ लिहिला आहे.