Jump to content

अनुमान

अनुमान

तर्कशास्त्रातील व प्रमाणमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. ज्ञानप्राप्तीत तर्कशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण होय. अर्थात ही ज्ञानप्राप्ती ज्या साधनांद्वारे होते, त्या साधनांमध्ये अनुमान हे एक महत्त्वाचे ज्ञानसाधन किंवा ज्ञानप्रमाण मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात सर्वच आस्तिक व नास्तिक दर्शनांनी अनुमान हे महत्त्वाचे ज्ञानप्रमाण मानलेले आहे. चार्वाकाचे लोकायतदर्शनही संभवात्मक अनुमान मानते. प्रत्यक्ष किंवा शब्दप्रमाणाहून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा अनुमान-प्रमाणाने मिळणारे ज्ञान हे फारच विस्तृत असते. तर्कशास्त्राचा मुख्य विषय अनुमान हा असल्यामुळे काही प्रसंगी तर्कशास्त्रास अनुमानशास्त्रही म्हणले जाते.

अनुमान म्हणजे व्यंजक (इम्प्‍लाइंग) विधानांवरून व्यंजित (इम्प्‍लाइड) विधानाची बुद्धीस झालेली उपलब्धी होय. दुसऱ्या शब्दांत अनुमान म्हणजे पुरेशा पुराव्यावरून काढला जाणारा अंदाज किंवा निष्कर्ष होय. अनुमान ही विचारप्रक्रिया असून तीत एका किंवा अनेक सत्य मानलेल्या गृहीत विधानांवरून दुसऱ्या नवीन विधानाकडे किंवा विधानांकडे आपला विचार जातो. पारंपरिक तर्कशास्त्रात अनुमानाचे विगामी किंवा निगामी तसेच व्यवहित किंवा अव्यवहित आणि व्यवहित व अव्यवहित यांचे परत अनेक उपप्रकारात वर्गीकरण केले जाते. आधुनिक तर्कशास्त्रातील अनुमानविचार हा भाषेच्या तार्किक स्वरूपाचा सखोल व सूक्ष्म अभ्यास करून मांडण्यात आलेला आहे.[]


संदर्भ व नोंदी

तर्कशास्त्र; न्यायदर्शन; प्रमाणमीमांसा; सांख्यिकीय अनुमानशास्त्र.

  1. ^ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश खंड : १