Jump to content

अनुभववाद

इंद्रियसंवेदना किंवा इंद्रियानुभव (Sense Experience) आणि बुद्धी (Reason) ही माणसाची दोन प्रमुख ज्ञानाची साधने आहेत किंवा मार्ग आहेत, असा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मानला जातो.

ज्ञान केवळ इंद्रियांनी होते, इंद्रियांना प्राप्त होणारा अनुभव म्हणजेच 'इंद्रियानुभव हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे', असा सिद्धान्त मांडणारी तत्त्वज्ञानातील विचारसरणी म्हणजे अनुभववाद होय. तिच्या विरुद्ध 'बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे', असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद होय. जे तत्त्ववेत्ते अनुभववाद स्वीकारतात ते अनुभववादी (Empiricist) मानले जातात. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात. कधी कधी केवळ प्रत्यक्ष-प्रमाणावर उभारलेल्या ज्ञानशास्त्रीय सिद्धांत संग्रहालाहि अनुभववाद म्हणून संबोधण्याची प्रथा आहे.[]

इंद्रियानुभव

डोळा, कान, नाक, त्वचा आणि जीभ या माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांनी, आपणास अनुक्रमे रूप, शब्द, वास, स्पर्श आणि रसना यांचे ज्ञान होते, त्या ज्ञानास 'अनुभव' (Experience) म्हणतात. हा अनुभव इंद्रियांनी (Senses or sense-organs) मिळतो, त्यामुळे त्यास 'इंद्रियानुभव' (Sense Experience) म्हणतात. इंद्रियानुभवाचा विषय म्हणजे जग (World). ज्या जगात आपण राहातो ते आपले वास्तव (Reality) आहे. या वास्तवाचा अनुभव म्हणजे इंद्रियानुभव होय.

व्युत्पत्ति

'अनुभववाद' या नावातील 'अनुभव' या शब्दाचा नेमका अर्थ प्रथम लक्षात घेतला पाहिजे. इंग्रजीमधील Experience शब्दाचे मराठी भाषांतर 'अनुभव' असे केले जाते. Experience हा इंग्रजी शब्द "empirical" या इंग्लिश शब्दाचे निष्पादित स्वरूप आहे. "Empirical" हा शब्द अशा एका प्राचीन ग्रीक शब्दापासून बनतो, की ज्याचे लॅटीन भाषांतर आणि अर्थ "experientia" असे आहे. "Experientia" पासून इंग्लिशमधील Experience आणि experiment हे शब्द बनतात. Empirical पासून Empiricism हा शब्द बनतो. अन्य एका व्युत्पत्तिनुसार ग्रीक संज्ञा "empeiria" म्हणजे Experience या पासून Empiricism ही निष्पादित संज्ञा बनते.[] Empiricism चे मराठी भाषांतर "अनुभववाद" असे केले जाते.[]

इंद्रियानुभव आणि अनुभववाद

मानवी ज्ञानाचा उगम इंद्रियानुभवात होतो; इंद्रियानुभवाच्या क्षेत्रापलीकडे मानवी ज्ञानाचा विस्तार होऊ शकत नाही; अनुभवावर आधारलेल्या ह्या ज्ञानाची व्यवस्था लावणे, अनुभवापासून प्राप्त झालेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करणे ही आवश्यक पण दुय्यम कार्ये बुद्धी करते.

प्राचीन ग्रीक काळातील वैद्यांनी रुग्णांच्या आजाराचे निदान त्यांच्या लक्षणांचे निरीक्षण आणि अनुभव यांच्या आधारे केले. ग्रीक वैद्यांच्या या वैज्ञानिक दृष्टीचा प्रभाव इतका परिणामकारक ठरला की रोमन वैद्यांनीही त्यांच्या वैद्यक ज्ञानाची रचना निरीक्षण आणि अनुभव यांच्या आधारे केली. दोन्ही ठिकाणी ग्रंथापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व दिले गेले. अनुभवाने ज्ञान निर्माण होते, हे मत सर्व क्षेत्रात स्वीकारले गेले. अशा रितीने प्राचीन ग्रीक कालात अनुभव हे ज्ञानाचे मुख्य साधन मानले गेले. ही अनुभववादाची सुरुवात होती.

पर्शियन तत्त्ववेत्ता ॲव्हिसेना इब्न सिना

कोरी पाटी

आपले मन ही एक 'कोरी पाटी' ("tabula rasa" or "clean slate") आहे आणि केवळ अनुभवानेच त्यावर ज्ञान लिहिले जाते, अशी संकल्पना प्रथम अकराव्या शतकात पर्शियन तत्त्ववेत्ता ॲव्हिसेना (Avicenna) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इब्न सिना (९३०-१०३७ Ibn Sina Avicenna) याने मांडली. बाराव्या शतकातील अरब तत्त्ववेत्ता अबु बकर (इब्न तुफेल Ibn Tufail ११०५-११८५ ) याने 'कोरी पाटी' कशी लिहिली जाते, हे सिद्ध केले. एकाकी बेटावर संपूर्णपणे एकटे राहणाऱ्या एका मुलाने आपल्या मनाची कोरी पाटी केवळ अनुभवाने कशी भरली, हे त्याने दाखवून दिले.[]

आधुनिक अनुभववाद

प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात अनुभववादी मते प्रचलित होती. तथापि अनुभववादाचा खरा प्रारंभ आधुनिक निसर्ग-विज्ञानांच्या उदयाच्या सुमारास म्हणजे सोळाव्या शतकात झाला. ईश्वराने प्रकाशित केलेल्या किंवा ॲरिस्टॉटल सारख्या अधिकारी पुरूषांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाशी सुसंगत असतील, अशीच विधाने सत्य असतात, हा सत्याचा निकष नसून 'इंद्रियानुभवात ज्याची प्रतीती घेता येते अशी विधानेच सत्य असतात' हा निकष म्हणजे अनुभववादाचे आधुनिकीकरण होते.

आपल्या सर्व कल्पना, संकल्पना यांचा जन्म अनुभवातून होतो. ज्यांचा अनुभव घेता येतो किंवा ज्या श्रद्धा, विश्वास, समजुती किंवा भाषेतील विधाने केवळ अनुभवाच्या कसोटीवर सत्य व समर्थनीय ठरतात तीच सत्य मानली पाहिजेत, असे आधुनिक अनुभववाद सांगतो. त्यानुसार, (१) इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम आहे. (२) मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते. ही दोन तत्त्वे म्हणजे अनुभववादी विचारप्रणालीचा गाभा ठरली. आपले ज्ञान, भाषेत म्हणजे विधानात व्यक्त केलेले असते. म्हणून विधानात जे सांगितलेले असते, त्याची पडताळणी अनुभवद्वारा घेऊन मगच ते विधान खरे आहे की खोटे आहे, हे ठरविता येते. अनुभव आणि अनुभवाला बळ देणारा समर्थ पुरावा यांनीच ज्ञान निर्माण होते, हा आधुनिक अनुभववादाचा सिद्धान्त आहे.[]

जॉन लॉक अनुभववादाचा प्रवर्तक

अनुभववादाचे आधुनिकीकरण करण्यात सर फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६), ब्रिटिश तत्त्ववेत्ता जॉन लॉक (१६३२-१७०४) आयरिश तत्त्ववेत्ता जॉर्ज बर्कली (१६८५-१७५३), स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम (१७११-१७७६), ब्रिटिश तत्त्ववेत्ता जॉन स्ट्युअर्ट मिल (१८०६-१८७३) यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात सतराव्या शतकातील जॉन लॉक (१६३२-१७०४) या ब्रिटिश अनुभववादी तत्त्ववेत्त्याची कामगिरी मुलभूत पाया ठरली. त्याने 'कोरी पाटी सिद्धान्त' त्याच्या "मानवी आकलनासंबंधी निबंध" (An Essay Concerning Human Understanding) हा त्याने १६९० साली लिहिलेला निबंधात आधुनिक परिभाषेत मांडला. त्याच्या मते, 'जगाविषयी आपण तेच आणि तेवढेच जाणू शकतो, जे आणि जेवढे जग आपणास सांगण्याचा प्रयत्‍न करीत आहे; आपण ते त्याच नैसर्गिकरित्या आणि त्यापासून कोणत्याही अपेक्षा न ठेवता, जगात न गुंतता समजावून घेतले पाहिजे. आपण जगाचे आकलन होण्यात कोणतीही ढवळाढवळ केली, ते देत असलेली माहिती बदलण्याचा प्रयत्‍न केला तर त्याचा परिणाम फक्त विकृत आणि दिशाभूल करणाऱ्या स्वैरकल्पना निर्माण होतात.[]' लॉकची कामगिरी अधिक पद्धतशीर, विस्तृत आणि मूलगामी असल्यामुळे त्याला "अनुभववादाचा प्रवर्तक" समजण्यात येते.[] विज्ञान हेच लॉकच्या मते खरेखुरे ज्ञान आहे. त्याच्या मते, माणसाच्या ठिकाणी कोणकोणत्या ज्ञानशक्ती आहेत, त्यांचे परस्परसंबंध काय आहेत, याचा शोध घेऊन माणसाला कोणत्या प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेणे शक्य आहे, हे स्पष्ट करणे; हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे. ते कळाले की माणसे अप्राप्य ज्ञानाच्या मागे धावणार नाहीत आणि जे ज्ञान मिळविणे शक्य आहे त्याची हेळसांड करणार नाहीत.

पाश्चा्त्त्य-युरोपीय प्रबोधनककाळात डेव्हिड हार्टली (१७०७-५७), जेरेमी बेंथॅम (१७४८-१८३२), जेम्स मिल (१७७३-१८३६), जॉन स्ट्युअर्ट मिल (१८०६-१८७३) या अनुभववादी तत्त्ववेत्त्यांनी ‘मानवी ज्ञानाचे स्वरूप काय आहे?’ या प्रश्नाऐवजी ‘नीतीचे स्वरूप काय आहे?’आणि ‘नैतिक नियमांचे प्रामाण्य कशावर आधारलेले असते?’ या सामाजिक या प्रश्नांना महत्त्व दिले. नैतिक संकल्पना आणि आचार, सामाजिक संस्था, कायदे यांची अनुभववादी भूमिकेच्या आधाराने पुनर्रचना करण्याचाया तत्त्ववेत्त्यांचा प्रयत्‍न होता. जॉन स्ट्युअर्ट मिलने अनुभववादाच्या मूलतत्त्वांना अनुसरून मानवी ज्ञानाच्या, विशेषतः वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि वैज्ञानिक रीतीच्या, स्वरूपाचे स्पष्टीकरण करण्याच्या पद्धतशीर प्रयत्‍न केला.[]

या साऱ्याचे विज्ञानात पडसाद उमटून अनुभवावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीत निरीक्षण आणि प्रयोग ही दोन मुख्य तत्त्वे मानली गेली. सर फ्रान्सिस बेकनने त्यांना विगमन पद्धतीची जोड दिली. अनुभव किंवा निरीक्षण व प्रयोग आणि विगमन यावर विज्ञान विकसित झाले. निसर्गातील आणि समाजातील विविध घटना, प्रसंग यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि त्यावर आधारित प्रयोग करणे या पद्धतीतून निसर्ग विज्ञाने आणि सामाजिक विज्ञाने यांची रचना होते तसेच त्यांची संशोधन पद्धती अस्तित्वात येते. थोडक्यात, वैज्ञानिक ज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती विकसित झाली.

अनुभववादाचे अभिजात अनुभववाद आणि आधुनिक व अत्याधुनिक अनुभववाद तसेच अतिरेकी अनुभववाद, मानसशास्त्रीय अनुभववाद, तार्किक प्रत्ययक्षार्थवाद, तार्किक अनुभववाद, मॉरिस श्लिकचा सुसंगत अनुभववाद, विल्यम जेम्सचा मौलिक अनुभववाद, बास फॉन फ्रास्सेनचा रचनात्मक अनुभववाद असे अनेक प्रकारभेद होतात. ज्या तत्त्ववेत्त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला त्यानुसार हे प्रकार अस्तित्वात आले,असे अलन लेसी हा तत्त्वज्ञानाचा ज्येष्ठ प्राध्यापक नमूद करतो[]. लॉकचा अनुभववाद हा 'अभिजात अनुभववाद' म्हणून ओळखला जातो.

या साऱ्या प्रयत्‍नांमधून विसाव्या शतकात 'संकल्पनात्मक ज्ञानाचे कार्य केवळ संकल्पनांच्या आशयांचे विश्लेषण करणे व स्पष्टीकरण करणे एवढेच असते', ही कल्पना विसाव्या शतकातील तत्त्वज्ञानात उदयाला आली.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ सुरेंद्र शिवदास बारलिंगे, "अनुभववाद", मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड १ पान ९, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, प्रकाशन काळ १९७४ प्रमुख संपादक प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर
  2. ^ Fumerton, Richard, "Empiricism", http://www.britannica.com/topic/empiricism=1 [मृत दुवा]
  3. ^ दि. य. देशपांडे, "उपोद्घात", अनुभववाद: अर्वाचीन पाश्चात्य तत्त्वज्ञान, प्रकाशन- दि. य. देशपांडे, ३/४, कर्मयोग अपार्टमेंट, सुशिला बलराज मार्ग,धंतोली, नागपूर, पहिली आवृत्ती –मार्च १९९९, मूल्य रु. १८०/- =
  4. ^ https://en.wikipedia.org/wiki/Empiricism=
  5. ^ a b c मे. पुं. रेगे, "अनुभववाद", मराठी विश्वकोश, https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/?id=1518=
  6. ^ Alan Dr., Lacey, "Empiricism", The Oxford Companion To Philosophy- New Edition, Ed. Ted Honderich, OUP, 2005 ISBN0-19-9264321, pp. 242-45=
  7. ^ Alan Dr., Lacey, "Empiricism", The Oxford Companion To Philosophy- New Edition, Ed. Ted Honderich, OUP, 2005 ISBN0-19-9264321, pp. 242-45=2
  8. ^ रेगे मे. पुं. तत्त्वमीमांसा", मराठी विश्वकोशhttps://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand7/index.php/23-2015-01-14-05-21-30/12752-2012-01-06-06-36-23?showall=1&limitstart=