अनंतराव थोपटे
अनंतराव थोपटे (११जानेवारी १९३३) हे एक भारतीय राजकारणी आहेत.भोर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. ते तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केले.अनेक खात्यांचा त्यांना अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, कृषि, कामगार, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशी विविध खाती त्यांनी भूषवली.
अनंतराव नारायणराव थोपटे यांचा जन्म 11जानेवारी 1933 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हातनोशी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथील आर. आर. विद्यालयात झाले, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा विद्यालय, पुणे येथे झाले. पुणे येथील वाडिया व सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून जी.डी.सी. आणि ए ही बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
थोपटे यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीच सहकार क्षेत्राशी संबंध आला.सहायक तालुका सहकारी अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू होऊन त्यांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला.शासकीय सेवेत असताना महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले. त्यामुळे ग्रामीण, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील सर्व क्षेत्रातील सहकारी संस्थांशी त्यांचा संबंध आला.सहकारी संस्था अधिकाधिक लोकाभिमुख होऊन जनतेचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न या सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्हावे, याची जाणीव त्याचवेळी त्यांना झाली. 1958 ते 1971 या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली.ते पदवीधर तर झाले होतेच पण त्यानंतर सहकार क्षेत्राशी संबंधित असलेली जी.डी.सी.आणि ए. ही ए ही पदविका संपादन केली.तसेच ब्लॉक लेव्हल को- ऑप. ऑफिसर ट्रेड ही खात्याअंतर्गत परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. सहकार अधिकारी या पदाबरोबरच विविध संस्थामध्ये परसेवेवर प्रमुख पदावर काम केले.वेल्हे तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय नोकरीमध्ये थोपटे यांचे मन रमेना. ग्रामीण भागातील वास्तव बदलायचे असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास शासकीय सेवेत मर्यादा होत्या. म्हणून 1972 साली शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचे धाडस थोपटे यांनी केल आणि अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि निवडून आले.त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा सहकार,सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. सुमारे 36 वर्षे भोर-वेल्हे या दोन तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.तसेच 14 वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आपल्या अंगी असलेल्या अभ्यासू आणि अचूक निर्णयक्षमतेचा ठसा उमटिवला. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच एक अभ्यासू ,कार्यालयीन कामकाजबरोबरच प्रशासकीय कामाची तंतोतंत माहिती असलले मंत्री अशी प्रतिमा सर्व अधिकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली.
थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे राज्य स्तरावरील संचालक म्हणून व जिल्हा स्तरावरील अध्यक्ष म्हणून 1980 ते 1982 च्या दरम्यान काम केले. भू-विकास बँक या नावाने ही बैंक आजही प्रचलित आहे. या कालखंडात थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कर्जवाटप करून योग्यवेळी शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविली. त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिके घेऊन आणि शेतीपूरक व्यवसाय करून गरीब अशा शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली.
थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी दूध उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यांनी त्यावेळी दूधाचा महापूर योजना कार्यान्वित केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. महानंद डेअरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी 1981-1982 च्या दरम्यान काम पाहिले. सहकारी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या संस्थेचे संचालक म्हणून काम करताना त्यांना उपयोगी पडला. दूध संघाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले. त्यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून ते काम करीत होते. या संघामार्फत त्यांनी परदेश दौरा करून तेथील दूध उत्पादन आणि उत्पन्न यांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर या दौऱ्यात त्यावेळचे दूध संघाचे अध्यक्ष अशोक मोहोळ हे होते.
थोपटे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून तीन वेळा म्हणजेच 15 वर्षे काम पाहिले. पुणे जिल्हा भूविकास बँकेचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळीही त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला.
थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली. भोर व वेल्हे तालुक्यात वाहन चालक आणि वाहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसऱ्याच्या ट्रकवर काम करणाऱ्या सर्व वाहन चालक व वाहक यांना एकत्र करून या संस्थेचे सभासद केले. या सभासदांनी या संस्थेचा आधार घेऊन बँकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दूध वाहतुकीसाठी टँकर घेतले आणि संस्थेमार्फत दुधाची वाहतूक टँकरद्वारा करण्यास सुरुवात केली. त्यांनी वाहतुकीच्या उत्पन्नातून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.
थोपटे यांनी 1988 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राजगड सहकारी साखर कारखाना मर्या.अनंतनगर, निगडे, ता. भोर, जि. पुणेची नोंदणी केली. त्यांना 1981 ते 1988 या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कारखान्याच्या नोंदणीसाठी पाठपुरावा केल्यावर यश मिळाले.त्यावेळी भोर-वेल्हे तालुक्यासारख्या डोंगरी भागात साखर कारखाना उभा करून चालविणे धाडसाचे होते. पूर्व भागातील बोटावर मोजण्याइतकी गावे सोडली तर कोठेही ऊस उत्पादन नव्हते. परंतु दूरदृष्टीच्या आधारे आणि आमदार असताना त्यांनी गावोगावी कार्यान्वित केलेली शासकीय बंदरे आणि त्यायोगे ओलिताखाली आलेले क्षेत्र याचा लाभ त्यांना झाला. कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले. त्यामुळे तरुण वर्गास रोजगार उपलब्ध झाला. तालुक्यातील विशेषतः डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
थोपटे 1981 च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी कन्झ्युमर फेडरेशन मुंबई या संस्थेवर संचालक म्हणून निवडून आले. तेथेही त्यांनी संचालक म्हणून चांगल्याप्रकारे काम केले. थोपटे यांची 1999-2000 या वर्षात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सदर अध्यक्षपद मंत्री दर्जाचे आहे. त्यांनी या अध्यक्षपदाच्या काळात सहकार कायद्यात काही सुधारणा सूचविल्या. त्यामुळे सहकारी संस्थांचे काम गतिमान होण्यात मदत झाली.