अनंत कान्हेरे
अनंत कान्हेरे | |
---|---|
जन्म: | जानेवारी ७, इ.स. १८९२ |
मृत्यू: | एप्रिल १९, इ.स. १९१० ठाणे, महाराष्ट्र, भारत (फाशी) |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अभिनव भारत |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | विनायक दामोदर सावरकर |
वडील: | लक्ष्मण कान्हेरे |
अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा, ७ जानेवारी १८९२; - ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
पूर्वायुष्य
अनंत कान्हेरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात १८९२ मध्ये झाला. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर येथे तर माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. [१]त्यांच्या मोठ्या भावाचे नाव गणपतराव आणि धाकट्या भावाचे नाव शंकरराव होते.
क्रांतीकार्य
कान्हेरे १९०३ मध्ये आपल्या काकांकडे पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होते. त्यांच्याकडे काही काळ राहून १९०८ मध्ये ते पुन्हा औरंगाबादला परत गेले. तेव्हा ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत.[२]गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी केले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल ‘मित्र प्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. [२]सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.
जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.
ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.
बाह्य दुवे
- अनंत कान्हेरे (मराठी पुस्तक, प्रकाशक - आपलं प्रकाशन )
- क्रांतिवेदीवरील समिधा (प्रकरण ६) (दुर्गेश परुळकर, अक्षयविद्या प्रकाशन )
संदर्भ आणि नोंदी
- ^ घुले, माधव (२०१७). चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश -खंड २. मुंबई: मौज प्रकाशन. pp. ४४.
- ^ a b "Jackson Murder Case". https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/004%20BritishPeriod.htm. १६ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)