अनंत अंतरकर
अनंत बाळकृष्ण अंतरकर (जन्म : डिसेंबर १, १९११ - - ऑक्टोबर ३, १९६६) हे एक मराठी संपादक होते. ते हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक होते.
बालपण
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये जन्मलेले अनंत अंतरकर यांना साहित्याचा वारसा आपल्या वडिलांकडूच मिळाला होता. शिक्षकी पेशातले त्यांचे वडील, बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे संस्कृतचे पंडित होते. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होतं. 'सरूप शाकुंतल' आणि 'मेघदूतच्छाया' हे त्यांचे अनुवादग्रंथ त्यावेळी महाराष्ट्रात खूपच गाजले होते. तोच साहित्यिक वारसा अनंतरावांकडे आला. आपल्या वडिलांच्या सहवासात अभिजात ग्रंथांच्या वाचनाने त्यांचा पिंड घडत गेला, साहित्यविषयक दृष्टी विकसित होऊ लागली. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे अनंतराव मुंबईत आले.
नोकऱ्या
१९३५ ते १९४२ या काळात अंतरकर लेखन, वाचन आणि संपादन याच्याशी संबंधित अशा नऊ नोकऱ्या करत होते. त्यामध्ये प्रभात, मौज, सत्यकथा, आहार, वसंत या नियतकालिकांचा समावेश होता. त्याच काळात ते आकाशवाणीसाठीही लेखन करत होते आणि 'भाषणेही सादर करत होते. याच काळात त्यांची 'चोरटे हल्ले' आणि 'गाळीव रत्ने' ही अभिजात विनोदाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
१९३८ सालामध्ये अनंतरावांवर सत्यकथा मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी ते केवळ २७ वर्षांचे होते. सत्यकथेचे कार्यकारी संपादक म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवीन लेखकांना संधी दिली. त्यांतले अरविंद गोखले, दि.बा. मोकाशी, जी.ए. कुलकर्णी हे लेखक पुढे मराठी साहित्याच्या क्षेत्रात नामवंत झाले.
हंसचा जन्म
पुढे, १९४२ सालात, अनंतरावांनी सत्यकथा सोडली आणि ते वसंत मासिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले. परंतु तिथे त्यांचे मतभेद होऊ लागले आणि मग स्वतंत्र बाण्याच्या अनंतरावांनी स्वतःचच मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते गिरगावातल्या गोरेगावकर चाळीत राहात होते. समोरच मौज-सत्यकथा यांचे कार्यालय होते. त्या नियतकालिकांनी स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले होते. त्यांचा असा एक खास वाचकवर्ग तयार झाला होता. अशावेळी त्या नियतकालिकांच्या कार्यालयाजवळूनच नवे मासिक सुरू करण्याचा अनंतरावांचा निर्णय धाडसीच होता. परंतु स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणाऱ्या अनंतरावांनी ते साहस केलेच, आणि ते विलक्षण यशस्वीही करून दाखवले.
त्यांच्या 'हंस' या मासिकाच्या पहिल्याच अंकात न.चिं. केळकर, पु.भा. भावे, बी. रघुनाथ, चिं.वि. जोशी, वि.सी. गुर्जर, अ.वा. वर्टी, जी.ए. कुलकर्णी, बा.द. सातोस्कर, वा.ग. तळवलकर अशा नामवंतांनी लेखन केले होते.
हंस-मोहिनी-नवल
थोड्याच काळात 'हंस' अतिशय लोकप्रिय झाले.त्यानंतर चार वर्षांनी (१९५० साल) अनंतरावांनी 'मोहिनी' आणि नंतर 'नवल' (१९५४ साल) ही मासिके सुरू केली. १९५४मध्ये त्यांनी मुंबईतून आपला मुक्काम पुण्यात हलवला.
पानशेतचे संकट आणि त्यातून बाहेर
त्यांची मासिके जोरात चालू असतानाच १९६१ च्या पानशेतच्या पुरात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. छापखान्यातली यंत्रेर कामातून गेली. हजारो रुपयांच्या कागदाचा पुराच्या पाण्याने लगदा केला आणि हस्तलिखितांची पार वाताहत करून टाकली. त्यांच्या राहत्या घराचीही अवस्था बिकट झाली. कोणाचाही धीर सुटावा असेच ते नुकसान होते. परंतु विपरीतापुढं नमून जाणे हा अनंतरावांचा पिंड नव्हता. आपल्याला हवी तशी परिस्थिती घडविण्याची विलक्षण जिद्द त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ते त्या संकटातून बाहेर आले; त्यांची तीनही मासिके पुन्हा डौलाने विहार करून रसिकांना वाचनानंद देऊ लागली.
त्या काळात अनेक लेखकांनी त्यांना धीर दिला, सांत्वन केले. माणुसकीचा हात पुढे केला. पु.ल. देशपांडे यांनी पत्र लिहिले, 'प्रिय अंतरकर, फक्त एका ओळीत तुम्ही सर्वजण सुखरूप आहात एवढे कळवावे. माझी काळजी दूर होईल.' अनेक लेखकांनी आपल्याला मानधन पाठवू नये, असे कळवले. पण त्या काळातही अनंतरावांनी कोणाचेच साहित्य मानधनाविना प्रसिद्ध केले नाही.
वाचनाची आवड
इंग्लिश-मराठी साहित्य हा अनंतरावांचा श्वास होता. अभिजात चित्रपट हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. इंग्लिश-मराठी समीक्षावाङ्मयाचे सातत्याने परिशीलन करणे हा त्यांचा ध्यास होता. विविध लेखकांच्या शैलीचा वेध घेणे आणि त्यावर चिंतन करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. बागकाम करणे हा त्यांचा विरंगुळा होता. नाटक, सर्कस आणि जादूचे प्रयोग याबद्दल त्यांच्या मनात एक विलक्षण ओढ होती. इंग्लिश-मराठीतील दुर्मीळ आणि अभिजात ग्रंथांचा संग्रह त्यांच्याकडे होता. आपली दर्जेदार नियतकालिके आणि साहित्यिक परिवार हीच त्यांची संपत्ती होती. अशा विविध पैलूंचा धनी असणाऱ्या अनंतरावांकडे जाहिरातदारांच्या मनमानीला झुगारून टाकण्याची जिद्द होती.
संपादनकौशल्य
अनंत अंतरकरांच्या संपादनकौशल्याने मराठी साहित्य अधिकच समृद्ध झाले. प्रसिद्ध लेखक पु.भा. भावे म्हणत, 'हंस लेखकाच्या नावांवर नाही, तर संपादकाच्या नावावर चालतो. अंतरकर लेखक घडविणारे संपादक आहेत. असे संपादक विरळाच असतात.'
अनंत अंतरकर यांच्या मदतीने चित्रकार शि.द. फडणीस पुण्यात आले.. तेव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून प्रसिद्ध होत राहिली. १९५२ सालापासून सलग साठ वर्षे अंतरकरांच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शि.द. फडणीसांनी केला.