अधिशोषण
काही घन किंवा द्रव पदार्थ त्यांच्या पृष्ठभागाशी संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या घन, द्रव किंवा वायूरूप पदार्थांतील (रेणू, अणू, आयन यांसारखे) घटक आकृष्ट करून स्वतःच्या पृष्ठभागावर साचवून ठेवतात. या क्रियेला अधिशोषण म्हणतात. ज्या पदार्थाच्या पृष्ठभागावर अधिशोषणाची क्रिया होते, त्या पदार्थाला अधिशोषक (adsorbent) असे म्हणतात, तर आकृष्ट झालेल्या पदार्थाला अधिशोषित द्रव्य (adsorbate) असे म्हणतात.
अधिशोषण हे शोषणाहून वेगळे असते. शोषणात संपूर्ण घन किंवा द्रव पदार्थ भाग घेत असतो. उलट अधिशोषण हे पदार्थाच्या पृष्ठापुरतेच मर्यादित असते. अधिशोषण ही एक पृष्ठीय, भौतिक-रासायनिक क्रिया आहे.
प्रकार
भौतिक अधिशोषण (Physisorption): जेव्हा अधिशोषक व अधिशोषित द्रव्य व्हॅन डर वॉल बलाद्वारे आकृष्ट होतात, तेव्हा या क्रियेला भौतिक अधिशोषण म्हणतात. यामध्ये अधिशोषणाद्वारे एक किंवा अनेक थर तयार होऊ शकतात. ही प्रक्रिया व्युत्क्रमी (reversible) आहे. (आ) रासायनिक अधिशोषण (Chemisorption) : जेव्हा अधिशोषक आणि अधिशोषित द्रव्य यांमध्ये रासायनिक बंध तयार होतात, तेव्हा या क्रियेला रासायनिक अधिशोषण म्हणतात. यामध्ये अधिशोषणाद्वारे एक थर तयार होऊ शकतो. ही प्रक्रिया अव्युत्क्रमी (irreversible) आहे.