Jump to content

अधिमानस

अधिमानस (Overmind)

चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये अधिमानसाचे स्थान

श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभाभूत विचार म्हणजे चेतनेची उत्क्रांती.

श्रीअरविंद यांच्या प्रतिपादनानुसार, मूळ सच्चिदानंद ब्रह्मापासून चेतना अंतर्लीन (involution) होत गेली - तिचे अवरोहण झाले आणि सृष्टीची निर्मिती झाली. पुन्हा तिचे आरोहण होऊन ती आपल्या मूळ स्वरूपाकडे चालली आहे. चेतनेची उत्क्रांती समजावून घेण्यासाठी आरोहण (ascent) आणि अवरोहण (descent) या दोन संज्ञादेखील महत्त्वाच्या आहेत.

निसर्गामध्ये पुढील क्रमाने चेतनेची उत्क्रांती झाली आहे असे ते म्हणतात.

०१) जडभौतिक / अचेतन (Physical) - अन्नमय कोश

०२) प्राण (Vital) - प्राणमय कोश

०३) मन (Mind) - मनोमय कोश - भौतिक मन (Physical Mind)

०४) उच्च मन (Higher Mind)

०५) प्रदीप्त मन (Illuminded Mind)

०६) अंतर्ज्ञानात्मक मन (Intuitive Mind)

०७) अधिमानस (Overmind)

०८) अतिमानस (Supramental Consciousness) - यालाच तत्त्वज्ञानामध्ये विज्ञान अशी संज्ञा आहे. - विज्ञान कोश

०९) आनंद - (Bliss) आनंद कोश

१०) चित - (Consciousness)

११) सत - (Truth)

मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी 'अतिमानस' (Supermind) असे संबोधले आहे, ते 'सत्या'चे विश्व आहे. परंतु पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान जे विश्व आहे त्याला श्रीअरविंद यांनी 'अधिमानस' (Overmind) हे नाव दिले. []

अधिमानस विश्वाचे स्वरूप

  • श्रीअरविंद यांच्या प्रतिपादनानुसार, ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत विश्वाचे शासन या अधिमानसाने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तोच 'परमेश्वर' आहे असे समजण्यात येत होते. परंतु वैश्विक देवदेवता 'सत्यचेतने'मध्ये (Truth-consciousness) पूर्णतः 'वसती' करत नाहीत, तर त्या केवळ त्या सत्यचेतनेच्या 'संपर्कात' असतात आणि त्या देवदेवता अधिमानसाच्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.
  • अधिमानसामध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते. ती क्षमता अतिमानसामध्ये असते. []
  • व्यक्ती अधिमानस दशेपर्यंत उत्क्रांत झाली की चोहो बाजूंनी तिच्यावर ज्ञानाचा वर्षाव होतो, कोणतीही वस्तू सर्व बाजूंनी ती पाहू शकते. येथे व्यक्तीला वैश्विक चेतनेच्या स्थिर बाजूप्रमाणेच गतिमान बाजूचेही ज्ञान होते.[]

श्रीअरविंद आणि अधिमानस

दि.२४ नोव्हेंबर १९२६ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साधनेच्या माध्यमातून अधिमानसाचे अवतरण घडून आले.

जडभौतिकामध्ये श्रीकृष्णाचे अवतरण घडले म्हणून श्रीअरविंद आश्रमात हा दिवस 'सिद्धी दिन' म्हणून मानण्यात येतो. [][] यानंतर श्रीअरविंद अधिक उच्च साधनेसाठी एकांतवासात राहू लागले आणि आश्रमाची जबाबदारी श्रीमाताजी यांच्यावर सोपविण्यात आली.

संदर्भ

  1. ^ श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन, ले. डॉ.गजानन नारायण जोशी, पुणे विद्यापीठ, प्रकाशन वर्ष १९८२
  2. ^ The Mother (2003). COLLECTED WORKS OF THE MOTHER : Vol 03 (2nd ed.). Pondicherry - 605 002: Sri Aurobindo Ashram Publication Department. pp. 173–174. ISBN 81-7058-670-4.CS1 maint: location (link)
  3. ^ A.B.Purani (1995). Evening Talks of Sri Aurobindo (3rd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Society, Pondicherry. ISBN 81-7060-093-6.
  4. ^ "the-significance-of-the-24th-november". incarnateword.in.
  5. ^ "new-chapter-sri-aurobindos-yoga". auromaa.org.