Jump to content

अताकामा वाळवंट

अताकामा वाळवंट हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मरुस्थल आहे. अक्षांश ५० ते ३०० दरम्यान पेरू देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून चिलेमधील कोप्यापो नदीपर्यंत हे सु. ९६० किमी. लांब व पश्चिमेस पॅसिफिक किनाऱ्यावरील पर्वतश्रेणीपासून पूर्वेस अँडीज पर्वताच्या डोमेको श्रेणीपर्यंत सुमारे ३३ ते ८० किमी. रुंद आहे. येथील पॅसिफिकचा किनारा ९०० मी पर्यंत उंच व अवघड कड्यांचा बनलेला असल्यामुळे येथे नैसर्गिक बंदरे फारशी नाहीत.

अताकामाचे वाळवंट सरासरीने ६००–९०० मी. उंचीवर आहे. उथळ, वाळूची बेटे असलेली खारी सरोवरे व सभोवताली टेकड्या अशा बोल्सन प्रकारचे हे वाळवंट असून कॅक्टस व तशा प्रकारच्या फारच थोड्या मरुवासी वनस्पती येथे आढळतात. जगातील हा सर्वांत शुष्क भाग समजला जातो.

किनाऱ्याजवळून हंबोल्ट हा थंड महासागरी प्रवाह जात असल्याने तेथे धुके, थराथरांचे ढग, आर्द्रता व सम हवामान असते. अंतर्भागात मात्र शुष्कता व विषम हवामान जाणवते. पॅसिफिक किनाऱ्यावरील ईकीक या बंदरावर १९४८–६८ या वीस वर्षांत चौदा वर्ष पावसाचा एक थेंबही पडला नाही; आणि सहा वर्षांत फक्त २·७ सेंमी. पाऊस पडला. कालामा या अंतर्गत भागातील ठिकाणी अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. अँडीजवरून हजारो पाण्चाये प्रवाह पश्चिमेकडे उतरतात. परंतु अताकामामध्ये येताच हे लुप्त होतात. त्या पाण्याचा पुरवठा काही मरूद्यानांस होतो. लोआ नदी ही ४२२ किमी. वाहणारी या भागातील एकुलती एक नदी होय. पिण्यासाठी, मरूद्यानांसाठी आणि हल्ली जलविद्युतशक्तीसाठी हिचा उपयोग केला आहे. ही जलवाहतुकीस उपयुक्त नाही आणि ती पॅसिफिकला मिळते तो भाग अवघड कड्यांचा असल्याने तेथे बंदरही बनू शकले नाही.