Jump to content

अणुकेंद्रीय भौतिकी

अणुकेंद्रीय भौतिकी भौतिकशास्त्रातील विषय आहे.

अणुकेंद्रासंबंधी रचना, विस्तार, आकार, प्रेरणा, प्रतिमान (मॉडेल), विक्रिया, परिवलन (स्वतःभोवती फिरणे) आणि चुंबकत्व एवढे विषय अणुकेंद्रीय भौतिकीत मोडतात.

अणुकेंद्राचे घटक

प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणुकेंद्राचे घटक आहेत. त्यांपैकी प्रोटॉन हा H1 (हायड्रोजन अणुकेंद्र) आहे. त्याच्यावर एक एकक धन विद्युत् भार असतो (आणवीय भौतिकीत एकक विद्युत् भार म्हणजे इलेक्ट्रॉनावरील विद्युत् भार होय). मुक्त प्रोटॉन अगर अणुकेंद्रातील प्रोटॉन स्थिर असतो. न्यूट्रॉनावर विद्युत् भार नसतो. त्याचे द्रव्यमान प्रोटॉनापेक्षा किंचित अधिक असते. मुक्त न्यूट्रॉन किरणोत्सर्गी असून त्याचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गाची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) सु. १२ मिनिटांचे आहे. न्यूट्रॉनाचे रूपांतर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रतिन्यूट्रिनो अशा तीन ⇨ मूलकणांत होते. न्यूक्लिऑन ही संज्ञा प्रामुख्याने अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना वापरतात. अणुकेंद्रातील न्यूक्लिऑनांच्या संख्येस ⇨ द्रव्यमानांक म्हणतात. हा अंक A या अक्षराने दाखवतात. अणुकेंद्रातील प्रोटॉनांच्या संख्येस ⇨ अणुक्रमांक म्हणतात व तो Z या अक्षराने दाखवतात.

अणुकेंद्राची संरचना : यासंबंधीची माहिती अणुकेंद्राची घनता, कवच प्रतिमान आणि सामूहिक प्रतिमान या परिच्छेदांत पुढे दिली आहे.

अणुकेंद्राची बंधनऊर्जा : यासंबंधी काही उपयुक्त संज्ञांचे अर्थ खाली दिले आहेत.

(१) आणवीय द्रव्यमानाचे एकक µ हा C12 या कार्बनाच्या समस्थानिकाच्या (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराच्या) द्रव्यमानाच्या १/१२ एवढे असते.

१ आणवीय द्रव्यामानाचे एकक = १·६६०४ ×१०-२७ किलोग्रॅम.

(२) अणुकेंद्रीय ऊर्जा एकक (Mev). १ Mev = १०६ इलेक्ट्रॉन व्होल्ट (ev) = १·६० × १०-६ अर्ग. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे १ व्होल्ट विद्युत् दाबाखाली प्रवेगित केलेल्या इलेक्ट्रॉनाची ऊर्जा.

(३) अणुकेंद्रीय संकुलन अंक : समस्थानिकात आढळणारी द्रव्यामान घट (M–A) आणि त्याचा द्रव्यमानांक यांचे गुणोत्तर. याचे चिन्ह ƒ आहे. ƒ = (M–A)/A. या समीकरणात M = अणुकेंद्राचे तौलनिक आणवीय द्रव्यमान-एकक (µ) व्यक्त केलेले द्रव्यमान.