अटल टिंकरींग प्रयोगशाळा
अटल टिंकरींग प्रयोगशाळा हा भारतात विज्ञान संशोधनास चालना देण्यासाठीचा एक उपक्रम आहे.
भारतात दहा लाख बाल संशोधक निर्माण करण्याच्या हेतूने अटल टिंकरींग प्रयोगशाळा (ए.टी.एल. - अटल) या उपक्रमाची सुरुवात अटल संशोधन मिशनतर्फे करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत भारतभर ९०० पेक्षा जास्त शाळा अटल टिंकरींग प्रयोगशाळांची स्थापना करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. या योजनेचा उद्देश बालकांमध्ये कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पकता निर्माण करणे असा आहे.
अटल टिंकरींग प्रयोगशाळांची ठळक वैशिष्ट्ये
अटल प्रयोगाशाळांमध्ये विद्यार्थी अनेक गोष्टी स्वतः करून बघून मनातील कल्पनांना मूर्त रूप देऊ शकतील आणि संशोधन कौशल्ये शिकतील. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यातील संकल्पना समजण्यासाठी मुलांना अनेक हत्यारे आणि उपकरणे वापरण्याची संधी याद्वारे मिळेल. अटलमध्ये शैक्षणिक आणि अध्ययनाची 'स्वतः करून पहा' पद्धतीची किट आणि विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ओपन सोर्स मायक्रो कंट्रोलर बोर्ड्स, संवेदक आणि त्रिमितीय प्रिंटर उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांमधील संशोधक वृती वाढवण्यासाठी अटल राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा, प्रदर्शने, समस्या सोडवण्यासाठी कार्यशाळा, व्याख्याने इ. गोष्टी आयोजित करेल.
आर्थिक पाठबळ
अटल प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी अटल संशोधन मिशनतर्फे प्रत्येक अटल प्रयोगशाळेला सुरुवातीला रू.10 लाख आणि नंतर प्रयोगशाळा चालवण्याच्या खर्चासाठी जास्तीत जास्त पाच वर्षे रू.10 लाख दिले जातील.
अर्हता
अटल प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सरकारी, स्थानिक संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या किंवा खाजगी ट्रस्ट /सोसायट्यांच्या कमीत कमी सहावी ते दहावीचे वर्ग असलेल्या शाळा पात्र असतील.