अजित कौर
ज्येष्ठ पंजाबी कथाकार आणि पत्रकार. अजित कौर यांचे लेखन मानवी जीवनातील विसंगती दर्शवून त्यातील वास्तव चित्रण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. त्यांच्या लेखनातून महिलांच्या संघर्षावर आणि समाजाच्या त्यांच्याबद्दलच्या विसंगत वृत्तीवर प्रकाश पडतो तसेच सामाजिक – राजकीय विकृती, सत्तेच्या आणि राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भ्रष्टाचाराविरूद्धही जोरदार प्रहार आढळतो. त्यांचा जन्म लाहोर येथे झाला. फाळणीपूर्व काळात त्यांचे बालपण लाहोरला व्यतीत झाले. त्यानंतर दिल्ली येथे स्थायिक झाल्यावर त्यांच्या जीवानानुभवाला वेगळे आयाम मिळाले. त्यांनी तिने दिल्ली विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पत्रकारितेला कार्य म्हणून स्वीकारले. रुपी ट्रेडचे (इंडो रशियन ट्रेड) या नियतकालिकाचे त्यांनी सुमारे ३१ वर्ष संपादन केले असून दरम्यान त्या वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी पत्रकार म्हणून लेखन करीत राहिल्या.
अजित कौर यांची पहिली लघुकथा वयाच्या सोळाव्या वर्षी प्रकाशित झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या कथांनी स्त्रीवादी भूमिका प्रकट केली.
अजित कौर यांची साहित्य संपदा :
लघुकथा :-
- गुलबानो (१९६०)
- माहिक दी मौत (१९६६ )
- बूतशिकन (१९६६)
- फालतू औरत (१९७२)
- सावियन चिडियां (१९८१)
- मौत अली बाबा दी (१९८५)
- ना मारो (१९९०)
- अपने अपने जंगल (१९९४)
- नोव्हेंबर चौरासी (१९९५ )
कादंबरी :-
धुप वाला शहर (१९६८ ), पोस्ट मॉर्टेम (१९७३ ), गौरी (१९९१);
आत्मचरित्र :-
खानाबादोश (१९८२ ); कूड़ा-कबाड़ा (द्वितीय खंड). व्यक्तीरेखाचित्रे:- तकिये दा पीर (१९८७);
प्रवासवर्णन:-
कच्चे रंग दा शहर: लंडन; अनुवादित :- पोर्ट्रेट ऑफ अ लेडी, रिटर्न ऑफ द रेड रोज (हेन्री जेम्स), द स्कार्लेट लेटर, द सिख्स या साहित्यकृतींचे त्यांनी अनुवाद केले असून खुशवंत सिंग, सीताकांत महापात्रा, रमाकांत रथ या भारतीय साहित्यकारांचेही साहित्य अनुवादित केले आहे.
अजित कौर यांनी इंडियन वुमन टुडेची पहिली डिरेक्टरी संपादित केली, जी प्रकाशनाच्या २० वर्षांनंतरही एक प्रामाणिक संदर्भ आहे.
अजित कौर यांच्या सुरुवातीच्या कथांनी आपल्या पुरुषप्रधान समाजातील स्त्रीच्या असमान स्थितीवर प्रकाश टाकला आहे. त्यांची कथा म्हणजे जीवनातील कठोर वास्तविकतेचे चित्र आहे. पंजाबी कथांमध्ये पहिल्यांदाच त्यांनी स्त्री-पुरुष संबंधांच्या शारीरिक बाजूंबद्दल धैर्याने लिहिले, ज्यासाठी त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. नंतरच्या काळात त्यांची जाणीव जीवनातील अधिक जटिल समस्यांभोवती विकसित झाली आणि तिला विविध स्तरांवरील अत्याचारांबद्दल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय आणि सामाजिक – आर्थिक परिस्थितीची जाणीव झाली. त्यांच्या लेखनात मानवी स्थितीची ही नवजाणीव दिसून येते. त्यांच्या लेखनातील भावनात्मक भाग त्यांच्या खानबादोश या आत्मचरित्रात सापडतो. त्यांचे कथा निवेदन हे त्यांना स्वतःला सआदत हसन मंटोसारख्या लेखकाच्या जवळचे वाटते. राजिंदर सिंग बेदी, इस्मत चुगताई आणि कुलवंत सिंग विर्क यांसारख्या कथाकारांचा तिच्या लेखनावर प्रभाव आहे. त्यांच्या अनेक कथांवर दूरदर्शनवर मालिका प्रसारित आहेत. तिच्या कथांचे विविध भारतीय त्यांच्या कथा विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांचे आत्मचरित्र खानाबदोश हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा, आठवणींचा एक आकर्षक संग्रह आहे. एक उत्कृष्ट अनुवादक म्हणून अजित कौर यांनी इमर्सन, हेन्री जेम्स यांच्यासह जगातील काही महान साहित्यकृतींचे पंजाबीमध्ये भाषांतर आणि रूपांतर केले आहे.
एक कष्टाळू आणि संवेदनाक्षम पत्रकार म्हणून त्यांची राष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. हिंसाचार आणि सांप्रदायिकता, राजकीय-सामाजिक-आर्थिक परिस्थिती, चित्रपट महोत्सव यासारख्या घटकांवर त्या सातत्याने प्रकट होत राहिल्या. अजित कौर यांनी अकादमी ऑफ फाइन आर्ट्स अँड लिटरेचरचे अध्यक्षपद भूषविले आहे एका या संस्थेमध्ये विचारवंत, कलाकार, संगीतकार, पत्रकार, लेखक आणि शिक्षणतज्ञांच्या गटाला त्यांनी सदैव प्रेरित केले आहे. त्या साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलच्या आणि पंजाबी अकादमी, दिल्लीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्याही होत्या.
दोन खंडांमध्ये प्रकाशित झालेले त्आयांचे त्मचरित्र अद्वितीय आहे. १९८६ चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘खानाबादोश’ या आत्मचरित्रासाठी देण्यात आला. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांततेसाठी केलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ नोबेल शांतता पुरस्कारासाठी जगभरातून एक हजार महिला एकत्र आल्या, तेव्हा अजित कौरही त्यांच्यात होत्या. पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आहे. त्यांनी दिल्लीत सार्क कला आणि संस्कृती अकादमीची स्थापना केली आहे. येथील कलादालन केवळ थोर लोकांसाठीच नाही तर समाजातील गरीब घटक, झोपडपट्टीतील मुले आणि महिलांसाठी खुले आहे.