Jump to content

अजय-अतुल

अजय अशोक गोगावले,
अतुल अशोक गोगावले

अजय-अतुल
आयुष्य
जन्म अजय- ऑगस्ट २१, इ.स. १९७६
अतुल- सप्टेंबर ११, इ.स. १९७४
जन्म स्थान डेक्कन पुणे पुणे जिल्हा, महाराष्ट्र
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीतदिग्दर्शन, गायन

अजय- अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी भाषा, मराठी, तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. "विश्वविनायक" या संगीत गीतसंग्रहाद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केले. अजय अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात. अजय अतुल या जोडगोळीने सावरखेड एक गाव, अगं बाई अरेच्या!, जत्रा, जबरदस्त, चेकमेट, साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा आणि नटरंग सारखे मराठी चित्रपट तर विरुद्ध, गायब, सिंघम सारखे हिंदी व शॉक सारख्या तेलुगू चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. राजीव पाटील दिग्दर्शित जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी २००९ च्या उत्कृष्ठ संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांचे नाव शिक्कामोर्तब केले गेले.

बालपण

अतुल अशोक गोगावले (सप्टेंबर ११, इ.स. १९७४) आणि अजय अशोक गोगावले (ऑगस्ट २१, इ.स. १९७६) यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतुल दोघांपैकी थोरला. वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे. त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती. दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्रे काढली होती. सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व कलाकार दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल, श्रीफळ वा हार देऊन कौतुक केले गेले होते, त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिंपडून जतन करून ठेवले होते. एन सी सी च्या एका कार्यक्रमात शिकवलेली धुन न वाजवता त्यांनी मनाला वाटलेली धुन वाजवून पुरस्कार पटकावला होता. सांगीतिक जडण घडणीची ही सुरुवात होती. संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण संगीत वाद्ये विकत घेणे त्यांना शक्य नव्हते, म्हणून ते ज्या मित्रांकडे वाद्ये असत त्यांच्याशी मैत्री करत. मंदिरात, शाळेत व बॅंड पथकांसोबत फिरून सांगीतिक भूक भागवत. कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी की बोर्ड आणून दिला जी त्यांची सर्वांत आवडती भेट ठरली व संगीताचे प्रयोग सुरू झाले. शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली व टाइम्स म्यूज़िकच्या विश्वविनायक या गणपतीच्या संचीकेने त्यांचा संगीत क्षेत्रात श्री गणेशा झाला.

संगीत शिक्षण

अजय अतुल यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. पण काळानुरूप व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. इलयाराजा यांना ते आपले गुरुस्थानी मानतात.

संगीत कारकीर्द

शिक्षणानंतर त्यांनी(?) मुंबईत येऊन टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या संगीत संचिके(सीडी)साठी काम सुरू केले. त्यात एस. पी. बालसुब्रमणीयम, शंकर महादेवन सारख्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश होता. या संचिकेत आदिदैवत श्री गणेशावर संस्कृत गीते गायली गेली आहेत. त्या काळी चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आधारित भक्तिगीतांची लाट सुरू असल्याकारणाने यात नवीनपणा जपण्याचा प्रयत्न त्यांनी या संचिकेद्वारे केला. ही संचिका प्रसिद्ध व्हायला काही काळ गेला. व त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या. यानंतर तोंडी प्रसिद्धीने या संचिकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. यातले श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गीत खूप गाजले.

यानंतर त्यांनी(?) राम गोपाळ वर्मा यांच्या गायब व महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध या चित्रपटास संगीत दिग्दर्शन केले. या सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट व रंगभूमी वरील नाटकांकडे कल घेतला.या वेळी त्यांनी केदार शिंदेच्या सही रे सही हे नाटक संगीतबद्ध केले. व यासाठी त्यांनी अल्फा गौरव(नंतर झी गौरव) चा पुरस्कार पटकावला. याच काळात त्यांची वर्ल्ड म्युझिक निर्मित मीराबाईच्या पारसी भजनांची मीरा कहे नावाने व सही रे सही व तरुणाईसाठी बनलेली सागरिका म्युझिक निर्मित बेधुंद या दोन संचिका बाजारात आल्या. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा! चित्रपटाच्या संगीतानंतर त्यांनी रसिकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेल्या मन उधाण वाऱ्याचे , अजय गोगावलेशाहीर साबळे यांच्या आवाजातले मल्हारवारी , व वैशाली सामंत च्या आवाजातले चम चम सारखी गीते रसिकांच्या पसंतीस उतरली. यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती त्यांना(?) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून गाऊन घ्यावयाची होती पण काही कारणास्तव योग जुळाला नाही व ते गीत अजय गोगावले च्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. त्यांनी याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे व बेधुंद मनाच्या लहरी सारख्या झी मराठी व ई टीव्ही मराठीच्या बहुचर्चित मालिकांसाठी पार्श्वसंगीत दिले.

राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात कुणाल गांजावाला यांनी वाऱ्यावरती गंध पसरला हे गाणे गायले जे रसिकांना भावले. तर याच चित्रपटातील आई भवानी हे अजय गोगावले ने गायलेले गोंधळ खूप गाजले. केदार शिंदे यांच्या जत्रा या विनोदी चित्रपटातील अजय गोगावले च्या आवाजातले ये गो ये मैना वैशाली सामंतआनंद शिंदे यांचे कोंबडी पळाली ही गाणी तुफान गाजली.

नंतर त्यांनी(?) संग संग हो तुम, कॉलेज कॉलेज व तेलुगू भक्तिगीतांचा विश्वात्मा अश्या संचिका बाजारात आणल्या. बेधुंद संचिकेतले स्वप्निल बांदोडकर याने गायलेले गालावर खळी (जे परत मराठीत बनवले गेले) हे गाणे तरुण पिढीला खूपच पसंत पडले. याच काळात त्यांनी दाक्षिणात्य संगीत क्षेत्रात उडी घेतली व राम गोपाळ वर्मा यांच्या शॉक या चित्रपटास संगीतबद्ध केले.ज्यात चक्रि,चित्रा, श्वेता पंडित, एस. पी. बालसुब्रमणीयम, कौशल्या सारख्या नामवंत पार्श्वगायकांचा समावेश होता.ज्यांची गाणीही विक्रमी खपाने प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी महेश कोठारे यांच्या जबरदस्त या चित्रपटास संगीत दिले. या संगीतात त्यांनी(?) पाश्चात्य संगीतावर भर दिला.. ज्यात प्रामुख्याने स्वप्निल बांदोडकर ,अजय गोगावले व रॅपर अर्ल डीसुझा यांच्या गाण्यांचा समावेश होता. याच चित्रपटातले आयचा घो हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. त्याच वर्षी त्यांनी बंध प्रेमाचे नावाच्या चित्रपटाला संगीतबद्ध केले ज्यात शंकर महादेवन, सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रीती कामत सारख्या गायकांचा समावेश होता. तर २००७ चे विशेष आकर्षण ठरलेला झी टॉकीजच्या साडे माडे तीन या चित्रपटाच्या शीर्षक गीतास त्यांनी संगीत दिले.

२००८ मध्ये संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात त्यांनी(?) संगीत शैलीमध्ये विविधता राखली. प्रसिद्ध छायाचित्रकार,दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चेकमेट या चित्रपटाचे शीर्षक गीत त्यांनी वेस्टर्न व रॅप पद्धतीने रॅपर अर्ल डिसूझा कडून गाऊन घेतले. तर याउलट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सारख्या चित्रपटात नवरी आली सारखी टाळ्यांच्या आधारावरली व काळी धरती, चांगभलं सारखी पारंपरिक गीते देखील त्यांनी साकारली. त्याच वर्षी त्यांनी मुंबई आमचीच सारख्या वादग्रस्त चित्रपटास देखील संगीतबद्ध केले. अजय सरपोतदार निर्मित उलाढाल या चित्रपटात त्यांनी मोरया मोरया सारख्या श्री गणेशाच्या आरतीचे धविमुद्रण प्रसिद्ध ढोल पथक शिवगर्जनाच्या गजरात केले.हे गीत आजही सर्व ठिकाणी गणपतीच्या नावाने जल्लोषात वाजवले जाते. तर त्याच चित्रपटातील दे ना पैसा देना,सब धोखा हैं सारखी पाश्चिमात्य संगीतावर आधारलेली हिंदी गीते गायक कुणाल गांजावाला कडून गाऊन घेतली.

२००९ हे वर्ष त्यांच्या(?)साठी मैलाचा दगड ठरले. सतीश राजवाडे यांचा एक डाव धोबीपछाड, ज्ञानेश भालेकर यांचा बेधुंद व राजीव पाटील यांचा ऑक्सिजन व जोगवा हे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. बेधुंद मधले चायला तिच्या मायला हे कुणाल गांजावाला व अजय च्या आवाजातले गाणे प्रसिद्ध झाले. राजीव पाटील यांचा जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या कारकीर्दीतला सर्वांत विशेष चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याच चित्रपटातील जीव दंगला या गाण्यासाठी, मराठी संगीतात पदार्पण करणारे हरिहरन यांना उत्कृष्ठ पार्श्वगायक व श्रेया घोषाल यांना उत्कृष्ठ पार्श्वगायिका म्हणून सन्मानित करण्यात आले. जीव दंगला खेरीज या चित्रपटात अजय गोगावले यांच्या आवाजात लल्लाटी भंडार हे गोंधळ गीत, आनंद शिंदे यांच्या आवाजात हरीणीच्या दारातश्रेया घोषाल यांच्या आवाजात मन रानात गेलं ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली. याच चित्रपटासाठी त्यांना(?) संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याखेरीज त्यांनी(?) स्टार प्रवाहझी मराठी च्या अनेक बहुचर्चित मालिकांसाठी देखील संगीत दिले आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या राजा शिवछत्रपती या शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारलेल्या महामालिकेच्या शिवगौरव शीर्षक गीतासाठी त्यांना महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१० च्या सुरुवातीस त्यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट नटरंग प्रदर्शित झाला. ज्याच्या पारंपरिक तमाशा,लावणी, गवळण, कटाव या प्रकारात मोडणाऱ्या संगीतास समीक्षक, रसिक सगळ्यांकडून विशेष कौतुकाची दाद मिळाली. यात त्यांच्या,बेला शेंडे व अजय च्या आवाजातल्या वाजले की बारा, अप्सरा आली ह्या लावण्या विशेष लोकप्रिय ठरल्या. तसेच कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारीखेळ मांडला या गीतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव,महाराष्ट्र टाईम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण, राज्य शासन चित्रपट ई. पुरस्कार सन्मानित करण्यात आले.त्यानंतर छायाचित्रकार, दिग्दर्शक संजय जाधव यांच्या रिंगा रिंगा या चित्रपटास त्यांनी संगीत दिले ज्यात सुखविंदर सिंग यांनी घे सावरून हे गाणे, तर बायगो बायगो हे पाश्चात्य संगीतशैलीवर बेतलेले गाणे कुणाल गांजावाला यांनी गायले.

त्यांनी(?) आजपर्यंत गुरू ठाकूर, कवी दासु, संजय कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबूडकर सारख्या नामवंत गीतकारांची गीते संगीतबद्ध केली आहेत. संगीत दिग्दर्शनासोबतच अजय गोगावले इतर संगीतकारांसोबत पार्श्वगायन देखील करतात. त्यांनी अगदी आज संचिकेत सोसाट्याचा आला वारा , दिली कोंबड्याने बांग, गाणे तुझ्या अंतरीचे संचिकेत पावसाळी या ढगांनी ही गीते गायली आहेत तर दे धक्का चित्रपटाचे शीर्षक गीत, गाभ्रीचा पाऊस मध्ये सपान हिरवं, रंगीबेरंगी मध्ये दाही दिशा तर आगामी चित्रपट डावपेच मध्ये देवाराजीव पाटील यांच्या पांगीरा मध्ये घाव पडला ही गाणी गायली आहेत. ते अजय अतुल लाइव्ह या नावाने विविध पार्श्वगायकांसोबत आपला संगीत कार्यक्रम सादर करतात. ज्यात त्यांच्या बहुचर्चित व गाजलेल्या गाण्यांचा समावेश असतो.

२०१६ साली आलेल्या सैराट चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने जगभरातील सर्वांना अक्षरशः वेड लावले याड लागलं आणि आताच बया ही गाणीही सुपरहिट ठरली या गाण्यांसाठी त्यांनी परदेशातील बॅंडचा मराठी चित्रपट गीतांसाठी प्रथमच वापर केला. सैराट चित्रपटाच्या स्ंगीत दिग्दर्शन तसेच गायन (याड लागलं) करिता या जोडगोळीला झी गौरव पुरस्कार प्राप्त झाला. सैराट चित्रपटाचा कन्नड रिमेक "मनसु मल्लिगे" ह्या चित्रपटाकरिता देखिल ह्या दोघांनीच संगीत दिले असून, गाण्याच्या सर्व चाली आणि संगीत नियोजन हुबेहुब सैराटप्रमाणेच असून फक्त कन्नड शब्द वापरले गेले आहेत. सध्याच्या माहितीनुसार ही सर्व कन्नड गीते अल्प काळात अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत.

अजय अतुल थेट (अजय अतुल लाइव्ह इन्‌ कॉन्सर्ट)

अजय अतुल हे, ’अजय अतुल लाइव्ह इन्‌ कॉन्सर्ट’ या नावाने आपला कार्यक्रम थेट रसिकांपर्यंत पोहोचवतात. यात त्यांच्यासोबत प्रामुख्याने कुणाल गांजावाला, शंकर महादेवन, हरिहरन, आनंद शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अमृता नातू, योगिता गोडबोले पाठक , अर्ल डिसूझा इत्यादी पार्श्वगायकांचा समावेश असतो. यात त्यांची विश्वविनायकमधली गीते, वाऱ्यावरती गंध पसरला, चम चम, मन उधाण वाऱ्याचे, चिंब भिजलेले, कोंबडी पळाली, साडे माडे तीन, आयचा घो, चेकमेट, झी गौरव गीत, चायला तिच्या मायला, लख लख चंदेरी, सही रे सही , लल्लाटी भंडार, खेळ मांडला, शिवगौरव गीत, जीव दंगला , मोरया मोरया अशी गाजलेली गीते रसिकांसमोर सादर केली जातात.

समाजसेवा

चित्रपट/संचिका/मालिका/नाटक

चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग विशेष
२००४गायबहिंदीसंगीतदिग्दर्शन
२००४अगं बाई अरेच्च्या !मराठीसंगीतदिग्दर्शनसंस्कृती कला दर्पणपुरस्कार
२००५गोड गुपितमराठीसंगीतदिग्दर्शन,पार्श्वसंगीत
२००५जत्रामराठीसंगीतदिग्दर्शन
२००५सावरखेड एक गावमराठीसंगीतदिग्दर्शनमहाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार,महाराष्ट्र टाईम्स सन्मान
२००५विरुद्धहिंदीसंगीतदिग्दर्शन
२००५वाह! लाईफ हो तो ऐसीहिंदीसंगीतदिग्दर्शन, फकत हनुमान चालीसा
२००५स्ट्रगलरहिंदीसंगीतदिग्दर्शन
२००६शॉकतेलुगूसंगीतदिग्दर्शन
२००६रेस्टॉरंटमराठीपार्श्वसंगीत
२००७पद्मश्री लालू प्रसाद यादवहिंदीपार्श्वसंगीत
२००७जबरदस्तमराठीसंगीतदिग्दर्शनमहाराष्ट्र टाईम्स सन्मान
२००७बंध प्रेमाचेमराठीसंगीतदिग्दर्शनझी गौरव
२००७साडे माडे तीनमराठीसंगीतदिग्दर्शन, फकत शीर्षक गीत
२००८चेकमेटमराठीसंगीतदिग्दर्शन
२००८तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंमराठीसंगीतदिग्दर्शन
२००८मुंबई आमचीचमराठीसंगीतदिग्दर्शन
२००८उलाढालमराठीसंगीतदिग्दर्शनव्ही. शांताराम पुरस्कार
२००९एक डाव धोबीपछाडमराठीसंगीतदिग्दर्शन
२००९बेधुंदमराठीसंगीतदिग्दर्शन
२००९ऑक्सिजनमराठीसंगीतदिग्दर्शन
२००९जोगवामराठीसंगीतदिग्दर्शनसंस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२०१०नटरंगमराठीसंगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीतझी गौरव, व्ही. शांताराम,४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार
२०१०रिंगा रिंगामराठीसंगीतदिग्दर्शन
२०१०बाल शिवबा- एनिमेशन-संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत
२०११आत्ता गं बया !-संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत
२०११धतिंग धिंगाणा-संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत
२०११सिंघम[]हिंदीसंगीतदिग्दर्शनतमिळ सिंगम चित्रपटाची हिंदी पुनरावृत्‍ती
२०११माय फ्रेंड पिंटो[]हिंदीसंगीतदिग्दर्शनसंजय लीला भन्साली व यूटीव्हीद्वारे निर्मित
२०१२अग्नीपथ[]हिंदीसंगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत१९९० च्या अग्नीपथाची पुनःआवृत्‍ती
२०१२बोल बच्चनहिंदीसंगीतदिग्दर्शनरोहित शेट्टी द्वारा निर्देशित व अजय देवगण द्वारा निर्मित
२०१२भारतीयमराठीसंगीतदिग्दर्शनगिरीश मोहिते द्वारा निर्देशित व अभिजीत घोलप द्वारा निर्मित
२०१३ धतींग धिंगाणा  मराठी संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत
२०१४ फॅन्ड्री मराठी शीर्षक गीत
२०१४ पी के हिंदी संगीतदिग्दर्शन
२०१५ ब्रदर्स (२०१५) हिंदी संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत
२०१६ सैराट मराठी संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत

संगीत संचिका (अल्बम)

वर्ष (इ.स.) अल्बम भाषा सहभाग
१९९९कॉलेज कॉलेजहिंदीसंगीत दिग्दर्शन
२००१विश्वविनायकसंस्कृतसंगीत दिग्दर्शन
२००२श्री राम मंत्रसंस्कृतसंगीत संयोजन
२००३बेधुंदमराठीसंगीत दिग्दर्शन
२००३संग संग हो तुमहिंदीसंगीत दिग्दर्शन
२००३मीरा कहेंहिंदी, संस्कृतसंगीत दिग्दर्शन
२००६विश्वात्मासंस्कृतसंगीत दिग्दर्शन

मालिकागीते

क्रमांक वाहिनी मालिका/गीत
१.राजा शिवछत्रपतीस्टार प्रवाहमहाराष्ट्र टाईम्स सन्मान
२.झी गौरवझी मराठी
३.एका पेक्षा एकझी मराठी
४.लख लख चंदेरीझी टॉकिज
५.हास्यसम्राटझी मराठी
६.सा रे ग म पझी मराठी
७.हफ्ता बंदझी मराठी
८.क्रिकेट क्लबझी मराठी
९.भावांजलीमी मराठी
१०.क्या बात हैझी मराठी
११.मिशाझी मराठी
१२.आमच्यासारखे आम्हीचझी मराठी
१३.श्रियुत गंगाधर टिपरेझी मराठीपार्श्वसंगीत
१४.वादळवाटझी मराठीपार्श्वसंगीत
१५.बेधुंद मनाच्या लहरीई टीव्ही मराठीपार्श्वसंगीत

नाटक

क्रमांक नाटकाचे नाव ठळक गोष्टी
१.सही रे सहीअल्फा गौरव २००३ पुरस्कार
२.लोच्या झाला रेमहाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा पुरस्कार
३.रंग्या रंगीला रे
४.मि. नामदेव म्हणे
५.गोपाळा रे गोपाळा
६.कळा या लागल्या जीवा२००७ महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा पुरस्कार
७.जाहले छत्रपति शिवराय
८.मन उधाण वाऱ्याचे

पुरस्कार

वर्ष (इ.स.) पुरस्कार पुरस्कारांतर्गत गट निर्मितीसाठी
२००३अल्फा गौरव (नंतर झी गौरव)[]उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकनाटक : सही रे सही
२००५महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : सावरखेड एक गाव
२००५महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकनाटक  : लोच्या झाला रे
२००५महाराष्ट्र टाइम्स सन्मान []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : सावरखेड एक गाव
२००५संस्कृती कला दर्पण []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : अगं बाई अरेच्च्या !)
२००७महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकनाटक  : कळा या लागल्या जीवा
२००८महाराष्ट्र टाइम्स सन्मान []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : जबरदस्त
२००८झी गौरव []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : बंध प्रेमाचे
२००८अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ[]उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
२००८अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ []उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
२००८संस्कृती कला दर्पण []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
२००९महाराष्ट्र टाइम्स सन्मान []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकमालिका : राजा शिवछत्रपती
२००९व्ही. शांताराम पुरस्कार []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : उलाढाल
२००९व्ही. शांताराम पुरस्कार []उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : उलाढाल ,गीत- मोरया मोरया
२००९श्रीकांत ठाकरे पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शक-
२००९संस्कृती कला दर्पण[]उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : जोगवा
२००९महाराष्ट्र टाइम्स सन्मानउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : जोगवा
२००९महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : उलाढाल ,गीत- मोरया मोरया
२०१०राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : जोगवा
२०१०झी गौरव []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : नटरंग
२०१०झी गौरव[]उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०१०संस्कृती कला दर्पण []उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : नटरंग
२०१०महाराष्ट्र टाइम्स सन्मानउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : नटरंग
२०१०शिवगौरवप्रभावशाली व्यक्ति-
२०१०४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळाउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : नटरंग
२०१०४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळाउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०१०व्ही. शांताराम पुरस्कारउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०१०व्ही. शांताराम पुरस्कारउत्कृष्ट पार्श्वसंगीतचित्रपट  : नटरंग
२०१०व्ही. शांताराम पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : नटरंग
२०१०स्टार माझा " माझा सन्मान "उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०१०बाळ गंधर्व पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकजाहीर केले गेले आहे
२०१०बिग एफ एम बिग संगीतकार पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट : नटरंग
२०१०बिग एफ एम बिग पार्श्वगायक पुरस्कारउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०१०बिग एफ एम बिग गीत पुरस्कारउत्कृष्ट गीत वर्ष २०१०चित्रपट  : नटरंग, गीत- अप्सरा आली
२०१०पु. ल. तरुणाई सन्मानसंगीत क्षेत्र-
२०१०महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०१०महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणउत्कृष्ट गीतचित्रपट  : नटरंग, गीत- वाजले की बारा
२०११मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कारउत्कृष्ट संगीत दिग्दर्शकचित्रपट  : नटरंग
२०११मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कारउत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावलेचित्रपट  : नटरंग, गीत- खेळ मांडला
२०११राम कदम कलागौरव पुरस्कारसंगीत क्षेत्र-
२०१२झी गौरवमराठी पाऊल पडते पुढे

संदर्भ

  1. ^ "इंडियनएक्सप्रेस.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०2-25 रोजी पाहिले.
  2. ^ "मिड डे.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०2-25 रोजी पाहिले.
  3. ^ "टाइम्स ऑफ इंडिया.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०२-०२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e f g h i j k l m n "अजय अतुल" (इंग्रजी भाषेत). 2014-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-07 रोजी पाहिले.
  5. ^ a b "संस्कृती कला दर्पण" (इंग्रजी भाषेत). 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-07 रोजी पाहिले.
  6. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; loksatta नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे