Jump to content

अघोरी

अघोरी

अघोरी हे शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही नावे आढळतात. अथर्ववेदात व यजुर्वेदात शिवाच्या अघोर तनूचे उल्लेख आहेत. ‘अघोरीश्वर’ या नावाने शिवाची उपासना म्हैसूर व इतर भागांतही केली जाते. यावरून प्रस्तूत पंथाचा संबंध शैव संप्रदायातील पाशुपत व कालमुख या पंथांशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंथाशी व तंत्रमार्गाशी जोडण्यात येतो. पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते.[][]

दुसरा एक अघोरी

यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे लोक राहत. काही लोक झाडांच्या साली किंवा पाने, तर काही व्याघ्रचर्म नेसत. चामुंडा ही त्यांची देवता असून ते तिला नरबली देत. प्रेताचे मांसही ते खात. आनंदगिरीनेही शांकरदिग्विजयात त्यांचे असेच वर्णन केलेले आहे. घोड्याचे मांस वर्ज्य करून इतर सर्व प्रकारचे मांस ते खात.[]

एक प्रकारचा शैव पंथ अनुचरणारे साधु असतात. यांचे वास्तव्य स्मशानात असते व तेथील जळालेल्या मृतदेहाची राख ते आपल्या अंगास फासतात. ते आपली विद्या सिद्ध करण्यासाठी मानवाची कवटी व हाडे वापरतात. त्यांचे दागिनेही हाडांपासून बनविलेले असतात. त्यांना साधारण जनमानसाद्वारे विरोधाचा सामना करावा लागतो.

पंथाच्या आचाराबाबत आणि तत्त्वज्ञानाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. निर्गुण अद्वैत मताशी त्यांची तत्त्वे जुळतात. हठयोग व ध्यानयोग यांस त्यांच्या साधनेत प्राधान्य आहे. तंत्रमार्गी साहित्यावर त्यांचा आचार आधारित आहे. गुरूला विभूती मानून ते त्याची पूजा करतात. मद्यमांससेवनास पंथात मुभा आहे. गोरखनाथ हा त्यांचा मूळ पुरूष असल्याचे सांगितले जाते. जादूटोणा व मंत्रतंत्रादी प्रकार पंथात वैपुल्याने आढळतात. पंथातील सर्वांची वेशभूषा एकसारखी आढळत नाही. काही पांढरे, तर काही रंगीत कपडे वापरतात. त्यांच्यात संन्यस्त व गृहस्थ अशा दोन्ही वृत्तीने राहणारे अनुयायी आहेत. भटकत भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. जटा, रूद्राक्षांच्या माळा, कमरेवर घागरा व हातात त्रिशूळ असे त्यांचे ध्यान सर्वसामान्य माणसास भयप्रह वाटते.

त्यांची संख्या थोडी असली, तरी ती सर्व भारतभर विखुरलेली आहे. काही मुसलमानही ह्या पंथांचे अनुयायी आहेत. बिहार व राजस्थानमध्ये त्यांची संख्या विशेष आहे. अलीकडे ते वस्त्रे वापरू लागले आहेत. त्यांच्या स्त्रिया टोळ्या करून भटकतात. इंगजी अमदानीत नरबलीची प्रथा व नग्नसंचार बंद झाला. माणसांच्या हाडांच्या माळांऐवजी आता ते स्फटिकांच्या व रूद्राक्षांच्या माळा वापरू लागले आहेत.[]

संदर्भ यादी

  1. ^ "अघोर पंथ". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-11-25.
  2. ^ a b c "अघोरी पंथ". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-05 रोजी पाहिले.