अग्यारी
अग्यारी हे पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ आहे. याला अग्निमंदिरही म्हणतात.
मुंबईत बऱ्याच ठिकाणी पारशी लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी ही प्रार्थनास्थळे आहेत. यात चर्चगेट, दादर, ग्रँट रोड, मरीन लाइन्स अश्या अनेक ठिकाणी आहे. ठाण्यामध्ये पश्चिमेला टेंभीनाक्याकडै जाणाऱ्या रस्त्यावर आनंद मठीच्या आधी अग्यारी आहे. ती सेठ कावसजी पटेल अग्यारी म्हणून ओळखली जाते.
इतिहास
ठाण्यावर पूर्वी पोर्तुगीजांचा ताबा होता.ठाणे शहरात पारशी लोकांची वस्ती होती. पोर्तुगीजांनी धर्मपरिवर्तनाची बळजबरी करावयास सुरुवात केल्यावर बरेच पारशी लोक ठाणे सोडून निघून गेले.नंतर ब्रिटिशांनी इसवी सन १७७४ मध्ये ठाण्याचा ताबा घेतला.ठाणे शहराचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्पन्न म्हणून ब्रिटिशांनी मालावर जकात कर बसवला. जकातीचे संकलन करून हिशोब ठेवण्यासाठी एक सरकारी अधिकारी नेमण्यात आला.ब्रिटिशांनी कावजी जहांगीर या पारशी माणसाची त्यासाठी निवड केली.कावसजी जहांगीर ह्यांना मुंबईतून ठाण्यात आणले.त्यानंतर बरीच पारशी कुटुंबे ठाण्यात येऊन स्थायिक झाली. ठाण्यातील पारशी नागरिकांच्या सोयीसाठी कावसजींनी पुढाकार घेऊन स्वतःच्या कमाईचे पैसे खर्च करून इसवी सन १७८० मध्ये ठाण्यात पारशी लोकांसाठी अग्यारी बांधली.पारशी लोक अग्निपूजक असल्याने त्यांच्या प्रार्थना मंदिरात सतत अग्नी प्रज्वलित असतो.आजही २४१ वर्षांपूर्वी प्रज्वलित करण्यात आलेला पवित्र अग्नी त्या अग्यारीत जळत असतो. इसवी सन १८८१ च्या जनगणनेनुसार ठाण्याची लोकसंख्या चौदा हजार चारशे छप्पन होती.पारशी लोकांची संख्या त्यावेळी दोनशे साठ होती.इसवी सन १८६३ मध्ये ठाण्यात नगरपालिका स्थापन झाली.नगरपालिकेत रूस्तमजी कावसजी, दादाभाई होमरसजी हे सभासद होते.
संदर्भ
- महाराष्ट्र टाईम्स रविवार पंचवीस जुलै दोन हजार एकवीस.