Jump to content

अगस्ती (तारा)

एक्स्पीडिशन ६ या अवकाशस्थानकातून चितारलेली अगस्तीची प्रतिमा

अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति/अगस्त्य ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिनी ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा कराइना सौरमंडलाचा सर्वात तेजस्वी (प्रकाशमान) तारा आहे आणि पृथ्वीपासून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये व्याध ताऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. हा F श्रेणीचा तारा आहे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा-पांढरा आहे. याची पृथ्वीपासून प्रतीत होणारी चमक (म्हणजेच "सापेक्ष कांतिमानता") - ०.७२ मैग्निट्यूड इतकी आहे, तसेच याची स्वतःतील चमक (म्हणजेच "निरपेक्ष कांतिमानता") - ५.५३ मापले जाते. अगस्ती पृथ्वीपासून जवळजवळ ३१० प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे.

अगस्ति-उदय

अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो.

दर वर्षी साधारणपणे २८-२९ ऑगस्टला मुंबईच्या आकाशात अगस्तीचा उदय होतो आणि ३० मे/१ जूनला अस्त होतो. कन्याकुमारीला हे दिवस अनुक्रमे ८ ऑगस्ट-१९ जून, आणि श्रीनगरला ३० सप्टेंबर-२७ एप्रिल असतात.

अगस्ती ताऱ्याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते, अशी समजूत आहे. यामागची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे असावी.:- पावसाळ्यात खूप पावसाने नद्या, सरोवरे यातील पाणी गढूळ होत असते. हळूहळू पाऊस जसाजसा कमी होतो तसतसे नद्या, जलाशयांतील पाणी स्थिर होते, गाळ, पाचोळा या स्थिर पाण्यात खाली बसतो. वर स्वच्छ पाणी रहाते, ते वापरास योग्य असते.

समुद्रप्राशन

महाभारतात अगस्ती ऋषींनी समुद्रप्राशन केल्याची कथा आहे. देव-दानवांमधील युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्तीने अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले.

आख्यायिका

अगस्ती हा विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेकडे आलेला पहिला संस्कृतिप्रसारक होय. त्यानेच विंध्यपर्वतास वाढू नकोस, असे सांगितले. अगस्तीने फार प्रवास केलेला असावा. तीन आचमने करून त्याने सात समुद्र प्राशन केले, यातील अर्थ हा असेल की, तीन पर्यटनांत तो सात जलाशये ओलांडून आला. दंडकारण्यात प्रवेश करणारा पहिला ऋषी अगस्तीच होय.

बाह्य दुवे