अखिल शर्मा
प्रा. अखिल शर्मा (जन्म : दिल्ली, २२ जुलै, १९७१) हे नेवार्कमधील रुटजर्स विद्यापीठात सर्जनशील लेखन या विषयाचे अध्यापक असून इंग्लिश भाषेत लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत.
अखिल शर्मा हे वयाच्या आठव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाले. तेथे व्रुडो विल्सन शाळेत असताना त्यांनी जॉइस कॅरोल ओट्स, पॉल ऑस्टर, जॉन मॅक्फी, टोनी कुशनर, टोनी मॉरिसन यांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. प्रिन्सटन विद्यापीठातून त्यांनी बी.ए. केले. अखिल शर्मा यांनी बँकेत नोकरी केली., चित्रपट कथालेखक म्हणून काम केले, पण त्यात ते रमले नाहीत. पुढे न्यू यॉर्कर, अॅटलांटिक अशा नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. सन २००० मध्ये लिहिलेली 'ॲन ओबिडियन्ट फादर' ही त्यांची पहिली कादंबरी.
अखिल शर्मा यांच्या 'फॅमिली लाइफ' या कादंबरीला ब्रिटनमध्ये नुकताच चाळीस हजार पौंडांचा फोलिओ पुरस्कार मिळाला आहे.
'फॅमिली लाइफ'ची हकीकत
'फॅमिली लाइफ' या कादंबरीत दिल्ली ते न्यू यॉर्कमधील क्वीन्सपर्यंतचा प्रवास उलगडत गेला आहे. अखिल शर्मा, आई-वडील व भावासमवेत तेथे गेले व नंतर त्यांच्या भावाला पोहताना डोक्याला जबर जखम झाली. त्या तीन मिनिटांत शर्मांचे सगळे जगच बदलून गेले. कर्तव्य आणि अस्तित्वाचा लढा यात दुभंगलेल्या तरुणाची गोष्ट त्यातून साकारत गेली. दुर्दैवी घटना कुणाच्याही आयुष्यात घडू शकते तशी त्यांच्या भावाच्या आयुष्यात घडली, पण त्याचा परिणाम म्हणून तो शेवटची तीस वर्षे अंथरुणाला खिळून होता. ही कादंबरी म्हणजे अखिल शर्मांचे त्यांचा भाऊ आणि आई-वडील यांच्यावरचे अजरामर प्रेमगीत आहे, असे म्हणले जाते.
अखिल शर्मा यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबऱ्या
- ॲन ओबिडियन्ट फादर (२०००)
- फॅमिली लाइफ (२०१४)
अखिल शर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- ’ॲन ओबिडियन्ट फादर’साठी पेन/हेमिंग्वे पुरस्कार (२००१)
- ’ॲन ओबिडियन्ट फादर’साठी व्हाइटिंग रायटर्स पुरस्कार
- ’फॅमिली लाइफ’साठी फोलिओ पारितोषिक (२०१५)
- न्यू यॉर्क टाइम्सनेव व न्यूयोर्क मॅगेझिनने ’फॅमिली लाइफ’ या पुस्तकाची ’वर्षातल्या १० उत्कृष्ट पुस्तका’मध्ये निवड केली. (२०१४)
इ.स. १९७१ मधील जन्म