अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन
चौथे अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन ५, ६ मे २०१२ रोजी वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले.. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. पुरुषोत्तम महाजन होते. महाजन यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून, अंधांसाठीच्या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सहभागी होत असतात.
या वसईत भरलेल्या संमेलनात प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याचे महाभारत’ या पुस्तकाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन झाले. वसई-विरार महानगरपालिकेने या संमेलनाला एक लाख रुपयांची मदत केली होती.
पहिले अंध-अपंग साहित्य संमेलन प्रा. स. गो. वर्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरुषोत्तम महाजन यांच्या पुढाकाराने, १९९० साली वसईत भरवले होते. या संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते. अंध-अपंगाचे दुसरे साहित्य संमेलन १९९१ साली पुण्याला, आणि तिसरे १९९५ साली नाशिकला भरले होते. ही तीनही संमेलने बाळ राणे आणि पुरुषोत्तम महाजन या जोडगोळीने भरवली होती.
असे असले, तरी विदर्भातले पहिले अंध-अपंग साहित्य संमेलन अशोक वासुदेव ठाकरे यांनी नागपूरला २३ ते २५ एप्रिल २००४ या दिवसात भरवले होते, असे अशोक ठाकरे म्हणतात. त्यांच्या त्या संमेलनात अकरा सत्रे होती,आणि ग्रंथदिडीपासून कविसंमेलन, कथाकथन आदी सर्व गोष्टी होत्या.
तसे पाहिले तर, महाराष्ट्रात सन १९८०पासून अंध-अपंगांची साहित्य चळवळ सुरू आहे. त्यामुळेच अंधांचे पहिले कविसंमेलन १९८०मध्ये वसईत होऊ शकले होते.
महाराष्ट्रात अन्यत्र होणारे अपंग साहित्य संमेलन म्हणजे अंध-अपंग संमेलन नव्हे.
पहा: मराठी साहित्य संमेलने ; अपंग साहित्य संमेलन