Jump to content

अक्षरगण (वृत्त)

अक्षरगणवृत्ते म्हणजे लघु-गुरू अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार करणे होय. अक्षरगणवृत्तांमध्ये खालील उपप्रकार असतात. अक्षरगणवृत्तात लघू म्हणजे ऱ्हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे. रचनेतल्या प्रत्येक ओळीत यांचा क्रम पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण-रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते.

  • समवृत्त
  • अर्धसमवृत्त
  • विषमवृत्त

अक्षरगण वृत्तांची लक्षणगीते आणि उदाहरणे

इंद्रवज्रा

ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने
ता ता ज गा गा गण येति जीने
त्या अक्षरे येति पदात अक्रा
तारी हरी जो धरि शंखचक्रा

उपेंद्रवज्रा

उपेंद्रवज्रा म्हणतात तीला
ज ता ज गा गा गण येती जीला

पंचचामर

पंचचामर, पञ्चचामर किंवा चामर हे १६ अक्षरे प्रत्येक ओळीत असलेले अक्षरगणवृत्त आहे. दर आठ अक्षरांनंतर यती (अल्पविराम) असते. त्यात अनुक्रमे ज र ज र ज ग हे गण येतात.

लक्षणगीतः
१. जरौ जरौ ततो जगौच पञ्चचामरं वदेत् ।

२. जनास राधिका जनास राधिका जनास गा ।
जनास राधिका जनास राधिका जनास गा ॥

३.उदाहरण: -
रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्य पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके ।
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥

पृथ्वी

१. सदैव धरिते जसाजसयलाग पृथ्वी पदी

२. आहे वृत्त विशाल म्हणती सू़ज्ञ पृथ्वी तया |
आधी जसज त्या पुढे सयलगा ही येती तया ||
किंवा
बहू चांगले म्हणती सूज्ञ पृथ्वी तया |
आधी जस ज त्यापुढे स य ल गा ही येती जया |
पदात सतरा पहा असती अक्षरे मोजूनी |
पदा शरण येती ते तरती कीर्ती ऐशी जुनी |
(शेवटची ओळ उदाहरण)

उदाहरण: मोरोपंतांनी लिहिलेले "सुसंगती सदा घडो" हे पददेखील पृथ्वी वृत्तात आहे.

३. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ||

४. जनास समरा जनास समरा यमाचा लगा |

भुजंगप्रयात

१. म्हणावे तयाला भुजंगप्रयात,
क्रमानेच येती य चारी जयात,
पदी ज्याचिया अक्षरे येति बारा,
रमानायका, दुःख माझे निवारा.

२. भुजंगप्रयाती य चारीहि येती |

३. यमाचा यमाचा यमाचा यमाचा,
यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।

४. य ये चारदा ते भुजंगप्रयात।

उदाहरण: समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक हे भुजंग प्रयात वृत्तात आहेत.

भुजंगी

भुजंगप्रयातमधील शेवटचे गुरू अक्षर काढले असता ' भुजंगी ' निर्माण होते. उदा.

१.पक्षी स्वैर संचारती अंबरी,
तसे चित्त हे स्वार वाऱ्यावरी

मंदाक्रांता

१. मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ नतत हे, आणि गा दोन आले ||

२. मंदाक्रान्ता मभनततगा गागणी मंद चाले ||

३. मेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रांता सरस (की ललित?) कविता कालिदासी विलासी
~माधव ज्युलियन

मंदारमाला

१. मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असे
साता तकारी जिथे हा घडे पाद तेथे गुरू एक अंती वसे.

२. ताराप ताराप ताराप ताराप, ताराप ताराप ताराप गा

३. गागाल गागाल गागाल गागाल, गागाल गागाल गागाल गा

मालिनी

न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. उदा०

अनुदिनि अनुतापे, तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोह माया |

वसंततिलका

१. जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त
येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त

२. येता वसंततिलकी तभजाजगागी

३. ताराप भास्कर जना सजनास गा गा ।
ताराप भास्कर जनास जनास गा गा ॥

सुमंदारमाला

मंदारमालेच्या आधी एक लघू अक्षर जोडले की सुमंदारमाला तयार होते.
किंवा एक ओळ भुजंगप्रयात आणि एक ओळ भुजंगी असे मिळून देखील सुमंदारमाला तयार होते.

१. युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत राहू तुझ्या मी, कितीदा करू प्रितीची याचना
~कवी कुसुमाग्रज (कविता: पृथ्वीचे प्रेमगीत)

२. यमाचा यमाचा यमाचा यमाचा, यमाचा यमाचा यमाचा यमा

३. लगागा लगागा लगागा लगागा,
लगागा लगागा लगागा लगा

४. सुमंदारमाले य सातीहि येती, तयाला लगा शेवटी जोडती

शार्दूलविक्रीडित

१. आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जासत ता ग येति गण हे पादास की जोडित.

२. मासाजा सतताग येति गण ते शार्दूलविक्रीडिती

३. मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा

४. म्हातारी उडता न येचि तिजला माता मदीया अशी।
कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी॥

मंगलाष्टके शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.

शिखरिणी

१. तया वृत्ता देती विबुधजन संज्ञा शिखरिणी
जयामध्ये येती य म नस भला गा गण गणी.

२. जयामध्ये येती य म नस भला गा शिखरिणी|

३. यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी ।

४. यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ।

आक्षेप

वृत्तांच्या गण मात्रा वगैरे बंधनांमुळे काव्य नियमबद्ध होते व त्यातला सहजभाव नष्ट होतो जातो असा आक्षेप यावर येतो. परंतु सहजतेने काव्य प्रसवणाऱ्या अनेक कवींनी वृत्तबंधनात राहून सुमधुर गेय कविता लिहून त्या लोकप्रिय केल्या आहेत.

हेही पहा

बाह्य दुवे